

Anganwadi Sevika Reshma Pardhe: पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील ठाकरवाडी-चासनंबरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील निकृष्ट पोषण आहाराचा पदार्फाश करणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा शिवाजी पारधे यांच्या एका व्हिडिओमुळं प्रशासन खडबडून जागं झालं आहे. सरकारचा कारभार चव्हाट्यावर आणल्यामुळं इथं अंगणवाडी सेविका म्हणून १८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या पारधे यांच्यावर आधी जिल्हा परिषदेनं निलंबनाची कारवाई केली नंतर या कारवाईला जोरदार विरोध व्हायला लागल्यानंतर ती मागे घेण्याची नामुष्कीही ओढवून घेतली.
जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळं या अंगणावाडी सेविकाला दिलासा मिळाला असला तरी आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कोर्टात चेंडू गेला आहे. ते या प्रकरणात काय कारवाई करणार याकडं आता सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा पुराव्यासहित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या रेश्मा पारधे यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली. तसंच सोमवारपर्यंत या पोषण आहार प्रकरणातील कच्च्या मालाच्या तपासणीची मोहिम राबवून सगळी माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
अंगणवाडी सेविका रेश्मा शिवाजी पारधे यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की, आमच्या अंगणवाडीसाठी फेडरेशनकडून येणारा पुरक पोषण आहारात भरडा, साखर, वाटाणा, मूगडाळ, तांदूळ, हळद-मीठ-मिरची आणि तेल हा कच्चा माल येत असतो. या आहारात येणारा पांढरा वाटाणा जर मुलांना दुसऱ्या दिवशीच्या मध्यान्ह भोजनात द्यायचा असेल तर तो आम्ही आदल्या दिवशी भिजत घालतो. एक दिवस भिजवल्यानंतरही दुसऱ्या दिवशी ९ ते १० शिट्ट्या दिल्यानंतरही हा वाटाणा व्यवस्थित शिजत नाही. हा असा वाटाणा खाल्यानं मुलांना पोटदुखीचा त्रास होतो. मग आता तुम्हीच सांगा असा आहार आम्ही मुलांना खाऊ घालायचा का?
वाटाण्याप्रमाणंच लाफशीसाठी दिला जाणारा भरडा देखील ५ ते ६ शिट्ट्या घेतल्या तरी शिजत नाही. यात आम्ही जी साखर टाकतो त्याचं पाणी होतं पण भरडा शिजला जात नाही. मग त्यात तुम्ही कितीही तेल टाका किंवा काहीही करा. त्यामुळं या अंगणावाडीतली मुलं लाफशी आणि उसळ खाण्यास नको म्हणतात. हे खायला ते कंटाळा करतात, मग तुम्ही तरी तुमच्या मुलांना असा न शिजलेला आहार खायला घालाल का? त्यामुळं माझी शासनाला ही विनंती आहे की तुम्ही आम्हाला जो फेडरेशनचा जो आहार देता ना तो थोडाच द्या पण चांगल्या दर्जाचा द्या. असा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना.
अंगणवाडी सेविका रेश्मा शिवाजी पारधे यांनी निलंबनाच्या कारवाईनंतर पुन्हा एक व्हिडिओ केला होता यात त्यांनी सांगितलं की, "आमच्या मुलांना जो आहार येतो तो चांगला यावा, बदलून यावा अशी विनंती मी तुकाराम मुंढे यांच्याकडं आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून केली होती." आज माझ्या मुलांच्या आहाराबाबत जर मला कळकळ वाटत असेल तर यात मी चुकीचं काय बोलले? त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना मी शासनावर टीका केली, ना मी शासनाच्या विरोधात गेले, ना मी शासनाबद्दल अपशब्द वापरले. मला जी काळजी वाटली ती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली.
जर अंगणवाडीच्या मुलांना काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी सेविकांना धरतात, अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाहीत. मुलांना काहीही होऊ नये, आपल्या मुलांना चांगला आहार यावा, खाऊ मिळावा यासाठी मी तो व्हिडिओ केला. पण यामुळं मला अधिकाऱ्यांनी मला कामावरुन कमी करण्याची नोटीस काढली, अशी माहिती रेश्मा शिवाजी पारधे या अंगणवाडी सेविकेनं दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.