
पिंपरी : मोठी प्रतीक्षा करायला लागलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) प्रभागरचना अखेर मंगळवारी (ता.१ फेब्रुवारी) जाहीर झाली. ती आमच्यासाठी अनुकूल आहे, असे भाजपच्या (BJP) आजी, माजी शहराध्यक्ष शहर कारभारी आमदारांनी काल लगेच सांगितले. त्याचवेळी काही प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) नेत्यांनी हस्तक्षेप करून ती असंविधानिक पद्धतीने केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी केला. होता. या कालच्या घडामोड़ीवर भाजपकडून आणखी घडामोड आज (ता.२ फेब्रुवारी) आली. दहा प्रभागात म्हणजे तीस जागांवर राज्यच नाही, तर केंद्रीय निवडणूक आय़ोगाकडेही हरकती नोंदविणार असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पिंपरी,चिंचवड आणि भोसरी अशा शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रभागांत म्हणजेच सर्वच शहरात ही प्रभागांची मोडतोड झाली असल्याचा दावा या मतदारसंघांच्या भाजप प्रभारींनी बुधवारी (ता.२) केला.तेथील १० प्रभागांत हरकती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातून एकूणच ही प्रभागरचना महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने अडचणीची व विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोईस्कर झाल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाताशी धरुन प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप केला गेला आहे,असा आरोप भाजपने आज केला.तो करताना ही प्रभागरचना पक्षाला पूरक आहे,असेही त्यांनी म्हटले आहे. ४६ पैकी १० प्रभागांमध्ये नियमबाह्यपणे तोडफोड केल्याने त्यावर हरकती घेणार असून, राज्य निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयातही दाद मागणार आहोत, अशी भूमिका भाजपा विधानसभा प्रभारींनी घेतली आहे. भोसरी,चिंचवडमध्ये तीन-चार,तर पिंपरींत ३ ठिकाणी असंवैधानिकपणे प्रभाग रचना केली असून ती निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात भाजपचे पिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रभारी सदाशिव खाडे म्हणाले की, पिंपरीतील काही प्रभाग चुकीच्या पद्धतीने केले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नगरसेवकांना फायदा होईल, अशी रचना केली आहे. याबाबत आम्ही आक्षेप घेणार आहोत. सत्तेचा गैरवापर करुन महाविकास आघाडी नियमबाह्य प्रभाग रचना करीत आहे. तर, चिंचवडचे प्रभारी संतोष कलाटे यांनी चिंचवडमध्ये भाजपाच्या ‘स्ट्रॉग’ उमेदवारांना त्रास होईल, अशी प्रभागरचना केली गेल्याचे सांगितले. आयोगाने दाद नाही दिली, तर न्यायालयात जाऊ,असा इशारा त्यांनी दिला आहे.
भोसरी ४ प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर तोडफोड केली असून त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे तेथील प्रभारी विजय फुगे यांनी सांगितले. चऱ्होली आणि परिसराचा लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहाता चऱ्होलीचा स्वतंत्र प्रभाग होवू शकतो. दिघी भोसरीशी संलग्न असल्यामुळे दिघीचे दिघी-भोसरी आणि दिघी- बोपखेल असे भाग होणे अपेक्षित आहे. पण, केवळ दिघी बोपखेल हा प्रभाग केला असून, दुसरा भाग थेट चऱ्होलीला जोडला आहे. हे नियमाला धरून नाही. मोशी गावठाण, शिवाजीवाडी, गंधर्वनगरी हा प्रभाग आठ किलोमीटरचा प्रवास करुन भोसरीपर्यंत जोडला आहे. भौगोलिकदृष्या नियमबाह्य आणि नागरिकांच्या दृष्टीने हे हिताचे नाही. त्या-त्या गावाचे प्रभाग त्या-त्या गावात झाले पाहिजेत,अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.