पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह हे आठवडाभराच्या परदेश `अभ्यास` दौऱ्यासाठी रविवारी (ता.१५) रात्री दुबईला रवाना झाले. त्यांच्या अनुपस्थितीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील हे २२ तारखेपर्यंत प्रभारी आयुक्त असणार आहेत.
दरम्यान,हंगामी आयुक्त म्हणून जांभळे यांनी मंगळवारी (ता.१६)जारी केलेला पहिलाच आदेश विलंबाने निघाल्याचे स्पष्ट झाले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासंदर्भात तो आहे. १४ जानेवारीलाच हा पंधरवडा राज्यभर सुरु झाला. मात्र,तो पिंपरी पालिकेत साजरा करण्याबाबतचा आदेश आज म्हणजे हा पंधरवडा सुरु झाल्यानंतर तीन दिवसांनी काढण्यात आला.
राज्याच्या मराठी भाषा विभागाने हा पंधरवडा साजरा करण्याबाबत दोन महिने अगोदर गेल्यावर्षी ११ नोव्हेंबरलाच परिपत्रक जारी केले होते. मात्र, दुबई दौऱ्याच्या धांदलीत पिंपरी पालिका आय़ुक्तांना हा पंधरवडा सुरु होण्यापूर्वी त्याअनुषंगाने आदेश काढले जमले नसावे,अशी चर्चा आता ऐकायला मिळते आहे. प्रशासन मराठी भाषेच्या वापराविषयी तेवढे गंभीर नसल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
पिंपरी पालिकेच्या वतीने १४ ते २८ जानेवारीदरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे,असे १६ जानेवारीला जांभळे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. पालिकेची सर्व कार्यालये तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठीमधील कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने तसेच कुठल्याही संगणकावर तयार केलेल्या शासकीय कामकाजाच्या नस्ती किंवा धारिका कुठल्याही संगणकावर वाचता याव्यात आणि त्या भविष्यासाठी व्यवस्थितरित्या जतन करणे सोयीचे व्हावे यासाठी युनिकोड मराठीचा वापर अनिवार्य करण्यास सांगण्यात आले आहे. ते शक्य व्हावे, म्हणून पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागास प्रशिक्षण घेण्याबाबतच्या सूचना पंधरवडा सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनी आज या आदेशान्वये देण्यात आल्या आहेत, हे विशेष.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.