Dr. Babasaheb Ambedkar: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती. खरंतर बाबासाहेबांच्या अनेक व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातील बारीकसारीक तपशील मिळेल तसा टिपण्यात आला. अशीच त्यांची एक आठवणीतली गोष्ट समोर आली आहे. तेव्हा बाबासाहेब वडगाव मावळ येथील न्यायालयात आले होते. (The judge's residence of Vadgaon is still preserved by Dr. Babasaheb's memories)
नक्की काय घडलं होतं तेव्हा?
वर्ष १९५२ देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी घोषित करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान ते लोणावळ्यास विश्रांतीसाठी थांबले होते. निवडणुकीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम अंतिम टप्प्यावर आले पण एका अर्जावर न्यायाधीशांची स्वाक्षरी आवश्यक होती.
बाबासाहेबांनी पोलीस जमादारास बोलावून घेत कोर्ट लोणावळ्यात येऊन फॉर्मवर स्वाक्षरी करतील का किंवा पुढील प्रक्रिया कशी करावी लागेल. याची विचारणा करण्यास सांगितले. त्यावेळी मावळ-वडगाव न्यायालयात दि. म. सापटणेकर हे न्यायाधीश होते. पोलिसांचा निरोप मिळाला पण न्यायालयाच्या प्रोटोकॉल पाळावा लागणार होता. फॉर्म भरताना, स्वाक्षरीची मोहर उमटवतांना नियमानुसार न्यायालयाच्या नोंदणी पुस्तकात त्यांची नोंद करावी लागते. पण तो दस्ताऐवज बाहेर नेता येत नाही.असा प्रशासकीय नियम होता. (Pune News)
पण दुसरीकडे दि.म सापटणेकर यांना बॅरिस्टर आंबेडकर व त्यांच्या कायद्याच्या अथांग ज्ञानाचेही कुतूहल होते. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचीही इच्छा होती. न्या. सापटणेकरांनी पोलिसांमार्फत, ‘साहेबांना फॉर्म भरण्यासाठी न्यायालयातच येणे उचित राहील’, असा निरोप दिला. तसेच, हा निरोप अत्यंत विनम्रतेने देण्यास सांगितले.पोलिसांनी बाबासाहेबांना वस्तुस्थिती सांगितली. बाबासाहेब बॅ. खोब्रागडे आणि त्यांच्या पत्नी माईसाहेब यांच्यासह त्याच्या खासगी मोटारीने वडगाव न्यायालयात हजर झाले. सापटणेकर यांनी स्वत: बाबासाहेबांचे स्वागत करत हस्तांदोलन केले. त्यांना न्यायालयाच्या चेंबरमध्ये आणले. फॉर्म भरून न्यायालयाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून स्वाक्षरी केली.
त्यानंतर न्या. सापटणेकरांनी माफी मागत म्हटले, ‘साहेब माफ करा. आपल्याला तसदी दिली.’ त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हसत म्हणाले की, ‘अहो सापटणेकर खरं तर मीच तुमचे आभार मानतो. न्यायासनाची शान राखलीत मला आवडले. न्यायाधिशांनी असाच ताठ कणा ठेवायला हवा. या न्यायासनाचा सम्राटांनीही मान राखायला हवा.’’
त्यानंतर सापटणेकरांनी बाबासाहेबांना जेवणाचे आमंत्रण देत नाही म्हणू नका अशी विनंती केली.त्यावर बाबासाहेबांनी माईसाहेबांकडे पाहिले, माईसाहेबांनीही होकारार्थी मान हलवली. खरतरं सापटणेकर ब्राह्मण समाजाचे होते. स्पृश्य-अस्पृश्यतेचा मोठा पगडा होता. त्यामुळे बाबासाहेबांनी पुन्हा विचारले.‘हा तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. पण तुमच्या कुटुंबाच्या सोवळ्या ओवळ्याला हे चालेल ना? त्यावर न्या. सापटणेकर म्हणाले, ‘डॉ.साहेब पत्नीनेच भोजनाचा घाट घातलाय. ती स्वतः तुम्हाला जेवायला वाढणार आणि आपल्या सोबत पंक्तीचा लाभही घेणार.’ मग बाबासाहेबांनीही होकार देत जेवणाचे आमंत्रण स्वीकारलं.
न्यायालयापासून जवळच असलेल्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी ते पोहचले. सापटणेकरांच्या पत्नी पार्वतीबाई यांनी पंचारतीने ओवाळत बाबासाहेबांचे स्वागत केलं. बाबासाहेबांच्या पथ्यपाण्याची माहिती काढूनच पार्वतीबाईंनी सुग्रास बेत केला होता. आवडीचे पदार्थ बघून बाबासाहेबही आश्चर्यचकित झाले.जेवताना भरपूर गप्पा झाल्या. मनात साठवलेले असंख्य प्रश्न कुतूहलाने सापटणेकर विचारत होते आणि बाबासाहेब त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. राज्यघटनेचे प्रारूप तयार करण्यापासून, कायद्याच्या त्रुटी, लोकशाहीची वाटचाल, न्यायालयाचे निवाडे आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा अनेक विषयांवर या भेटीत चर्चा झाल्या.
शेवटी सापटणेकरांनी बाबासाहेबांना,‘आपण बुद्धधर्म का स्वीकारत आहात’? असा प्रश्न विचारताच. त्यावर बाबासाहेब उत्तर देताना म्हणाले, ‘हिंदू धर्माच्या हितासाठी आणि लाखो अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी.’ जेवणाचा बेत झाल्यानंतर सापटणेकरांनी बाबासाहेबांना त्यांच्याजवळची कायद्याची पुस्तके दाखवली. ते पाहून बाबासाहेब भारावून गेले होते.
बाबासाहेबांनी सापटणेकर कुटुंबियांचा निरोप घेतला. पण डॉ. बाबासाहेबांनी आपल्याकडे स्नेहभोजनासाठी थांबणं ही सापटणेकर कुटुंबीयांसाठी मोठी पर्वणीच होती. निरोपाच्या वेळी सापटणेकर यांच्या पत्नीने नमस्कारासाठी वाकताच बाबासाहेब म्हणाले, ‘बाळ, तुला काय म्हणू, सून की लेक?’ ‘साहेब तुमची लेकच म्हणा’ असं पार्वतीबाईंनी उत्तर दिलं त्यांवर बाबासाहेबांनी, ‘आयुष्यमतीभव्!’ म्हणत प्रेमळ आशीर्वाद देत त्यांच्या निरोप घेतला. न्या. सापटणेकरांनी घडलेली ही आठवण आपल्या कथनात जतन करून ठेवली. आजही वडगावचे न्यायाधीश निवासस्थानाने या घटनेची स्मृती चिरंतन जपलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.