Maharashtra Politics : पवई 'आयआयटी'मधील विद्यार्थी दर्शन सोलंकी याने आत्महत्या केली. या घटनेला अनेकांनी 'इन्टिट्युशन मर्डर' असे संबोधले. तसेच या प्रकरणाला रोहित वेमुला प्रकरणाशी जोडून राजकारण करण्यात आले. दरम्यान, दर्शनने वर्गातील एका मुलाशी झालेल्या शाब्दिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. त्यांच्या सुसाईट नोटनुसार एका विद्यार्थ्याला अटकही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचे नाहक राजकारण करण्यात आल्याचे खंत माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी बोलताना माजी खासदार अमर साबळे (Amar Sabale) यांनी डाव्या संघटनांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आयआयटीचा विद्यार्थी दर्शनने १२ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. या मृत्यूची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासाला आता गती आली आहे. दरम्यान, दर्शन सोलंकीच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न डाव्या संघटनांनी केला. हा 'इन्स्टिट्युशनल मर्डर' आहे, असा आरोप करण्यात आला होता."
दरम्यान, साबळे यांनी सोलंकीने आत्महत्या का केली याचे कारणही सांगितले. साबळे म्हणाले, "आता दर्शनने आत्महत्या का केली हे उघड झाले आहे. दर्शन सोलंकी आणि अरमान खात्री यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी अरमानने दर्शनला खुनाची धमकी दिली होती. त्यातून दर्शन आजारी पडला होता. धमकीने घाबरलेल्या दर्शनने त्यानंतर आत्महत्या केली. दर्शनच्या खोलीत एक नोट सापडली आहे. त्या नोटची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. त्यात ती दर्शन यानेच लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी अरमान खत्री याला अटक करण्यात आली आहे."
या प्रकरणाचे कारण स्पष्ट झाल्यानंतर साबळे यांनी माजी खासदार मुणगेकर यांचाही समाचार घेतला. साबळे म्हणाले, "दर्शनने आत्महत्या का केली याचे आता दूध का दूध पानी का पानी झाल आहे. दरम्यान, माजी खासदार मुणगेकर यांनी हे प्रकरण म्हणजे इन्स्टिट्युशन मर्डर आहे, असे सांगितले होते. या प्रकरणाला रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाशी जोडले होते. ते सर्व चुकीचे होते, हे आता स्पष्ट झाले आहे."
आत्महत्येनंतर झालेल्या आंदोलनात समाजात फूट पाडणारी विधाने केल्याचा आरोपही माजी खासदार साबळे यांनी यावेळी केला आहे. ते म्हणाले, "दर्शनच्या मृत्यूनंतर जे आंदोलन झाले ज्यात संघटना होत्या. त्यांनी काही वादग्रस्त विधाने केलेली आहेत. अशा वक्तव्यातून जाती, धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाने अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे. जाती धर्मात फूट निर्माण करणे बरोबर नाही."
विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने कायदा करण्याची मागणी यावेळी साबळे यांनी केली आहे. ते म्हणाले, "दर्शनच्या आत्महत्येच्या प्रकरणी तक्रारही दाखल केलेली आहे. केंद्र आणि राज्याने अशा आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात त्या करायला पाहिजे. शक्य असेल तर यासंबंधी कायदा करा अशी आम्ही मागणी करणार आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.