पुणे : आपल्यावरील कारवाईचे वृत्त हे नजरचुकीने छापले गेले आहे. याबाबत पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत कारवाई मागे घेतली आहे, त्यामुळे आपण आता नाराज न होता पक्षाचे काम जोमाने करावे. ते आपण करत आहातच; पण आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, यासाठी मी स्वतः शिरूरचा दौरा करणार आहे, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांना दिले. (Uddhav Thackeray praised the work of Shivajirao Adhalrao Patil)
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर झालेल्या कारवाईच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंगळवारी (ता. ५ जुलै) शिवसेना भवन येथे भेटीसाठी बोलविले होते. त्यानुसार आढळराव पाटील व सोनवणे भेटीला गेले होते. या भेटीवेळी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, शिवसेना सचिव अनिल देसाई, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.
या भेटीत दोन दिवसांपूर्वी आढळराव यांच्यावर झालेल्या हकालपट्टीच्या कारवाईसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत झालेली कारवाई नजरचुकीने झाल्याचे ठाकरे यांनी सांगत पक्षाने दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते. आपण लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरदेखील खचून न जाता पक्षाचे काम निष्ठेने करत आहात. कोरोना संकट आणि निसर्ग चक्रीवादळाच्या संकट काळातही आपण सर्वसामान्य जनतेसाठी सदैव उपलब्ध होता, हे सच्च्या शिवसैनिकाची ओळख आहे. सध्या शिवसेनेवर आलेले हे संकटपण जाईल. आपण पक्षाचे काम जोमात करा. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील, यावर लक्ष केंद्रित करा. मी स्वतः शिरूरचा दौरा करणार आहे, असे ठाकरे यांनी आढळराव पाटील यांना सांगितले.
राष्ट्रवादीसोबत युती नकोच : सोनवणे
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधून बाहेर पडत, स्वबळावर निवडणुका लढवा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी बैठकीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. याबाबत बोलताना सोनवणे म्हणाले,‘‘महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आपण स्वबळावर लढू. जेवढे उमेदवार येतील तेवढे येतील. मात्र, पुढील पाच वर्षांत विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले सर्वाधिक उमेदवार विजयी होतील,’’ यावर तुम्ही सोबत असाल तर आपण सर्व ताकदीनिशी स्वबळावर निवडणुका लढू, असे आश्वासन दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.