
Allegations Made Against Rajendra Hagawane : पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असून ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुक्यातील नेते राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा शशांक, पत्नी आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, वैष्णवीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. शिवाय, तिच्या शरिरावरही मारहाणीचे स्पष्ट व्रण आढळले असून, त्यामुळे तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आरोपींवर ठेवण्यात आला आहे. तर याप्रकरणात मुलगा शशांक, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली असली, तरी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं सक्रिय आहेत, असे बावधन पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरचं कस्पटे कुटुंब प्रचंड दुःखात आहे. तिच्या आठवणी सांगताना आई-वडिलांना अश्रू अनावर होत आहेत. वैष्णवीने मागील दोन वर्षांमध्ये सहन केलेल्या यातना, सातत्याने पैशाची मागणी करून तिचा छळ केला जात होता, असं सांगत वैष्णवीने आत्महत्या केल्या नसून तिची पैशासाठी हत्या केली असल्याचा देखील आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
या घटनेबाबत सांगताना वैष्णवीच्या आई-वडील म्हणाले, अजित पवार आणि राजेंद्र हगवणे यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळंच वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी राजेंद्र हगवणे यांना अटक होत नाही, असं आम्हाला वाटत आहे. पण आता अजितदादांनी त्यांची लाडकी बहीण वैष्णवी हिला मृत्यूनंतर तरी न्याय मिळवून द्यावा, अशी आमची मागणी आहे. तसेच या मागणीसाठी गरज पडल्यास आमची अजितदादांशी बोलण्याची आणि भेटण्याची देखील तयारी आहे, असं कस्पटे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.