Vasant More News : अखेरचा हा तुला दंडवत..! वसंत मोरेंनी 'खळखट्याक'शी नातं तोडलं

Vasant More Resign MNS : 'पुण्याची पसंत मोरे वसंत' हे त्यांचंच वाक्य सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारीही आता त्यांचीच.
Vasant More
Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

संदीप चव्हाण -

Pune MNS News : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक चेहरा, खंदा शिलेदार आणि निष्ठावान मनसैनिक म्हणजे वसंत (तात्या) मोरे... पण आज याच वसंत मोरेंनी, "अखेरचा जय महाराष्ट्र ! साहेब, मला माफ करा," असं म्हणत आणि पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या प्रतिमेला साष्टांग दंडवत घालत पक्षाशी असलेलं अठरा वर्षांचं नातं तोडलं.

मनसेचे सरचिटणीस वसंत मोरे(Vasant More) यांनी फेसबुक पोस्ट करत मंगळवारी दुपारी (12 मार्च) पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि पुण्यासह महाराष्ट्रातील मनसैनिकांमध्ये एकच खळबळ उडाली. वसंत मोरेंनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vasant More
Vasant More Resign MNS : राजकीय संन्यास घेईन, पण मनसे नको! राजीनाम्यानंतर तात्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

स्वपक्षातील वरिष्ठांकडून माझ्याविरोधात 'कोंडी तंत्र' -

"गेली दोन-तीन वर्षांपासून पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझी कोंडी करण्याचं तंत्र अवलंबलं जात आहे. एकीकडं पक्षांतर्गत राजकारण, तर दुसरीकडं पक्षाविषयीच्या माझ्या निष्ठेवर उपस्थित केले गेलेले प्रश्नचिन्ह या गोष्टी माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे," अशा आशयाचं पत्र राज ठाकरेंना लिहून मोरेंनी 'मनसे'ला राम राम केला.

Vasant More Letter
Vasant More LetterSarkarnama

वसंत मोरेंची यावेळची नाराजी ही 'फायनल' की...

वसंत मोरे नाराज ? वसंत मोरे मनसे सोडणार ? वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार ? वसंत मोरे शिवसेनेत जाणार ? अशा चर्चा याआधीही पुणेकरांच्या कानी पडल्या होत्या. 'पक्षातील काही अतृप्त आत्म्यांना मी खटकतो,' असं म्हणत मोरेंनी कित्येकदा आपली नाराजी माध्यमांसमोर उघडपणे बोलूनही दाखवली होती. पण त्यानंतर थोडा अवधी गेला की,'' काहीही झालं तरी मी राज ठाकरेंची साथ सोडणार नाही, मी राजमार्गावरच आहे,' असं म्हणून या चर्चा पेटीत बंद व्हायच्या.

या वेळी मात्र वसंत मोरेंनी थेट पक्षाचा राजीनामाच दिला आणि आता दस्तुरखुद्द राजसाहेबांनी जरी सांगितलं तरी मी पुन्हा 'मनसे'त जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगून टाकलं. आजच्या पत्रकार परिषदेदरम्यान वसंत मोरे ढसाढसा रडले, या आधी कधी नेत्यांचे फोन आले नाहीत, पण आता यायला लागले, असं म्हणून गहिवरले. त्यामुळं आक्रमक स्वभावाचा हा नेता तितकाच हळवा असल्याचं दर्शन आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला घडलं. म्हणूनच की काय, तात्यांची ही आजची नाराजी नक्की 'फायनल' आहे ना, असा सवाल मनसैनिकांमधून विचारला जातोय.

ठाकरेंचा भोंग्यांविरुद्धचा स्वर आणि मोरेंचा नाराजीचा सूर

2 एप्रिल 2022 रोजी राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात,'ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायचा,' असा 'आव्वाज' टाकला आणि इकडं वसंत मोरेंनी नाराजीचा सूर आळवला. राज ठाकरेंच्या आवाहनाला असहमती दर्शवली. या मुद्द्यावरून पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्याप्रकरणी वसंत मोरेंना पुणे शहरप्रमुख पदावरून तत्काळ दूर करण्यात आलं. त्याचदरम्यान, खुद्द अजित पवारांनीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याविषयी विचारणा केल्याचा दावा मोरेंकडून केला गेला. यामुळं मोरे मनसे(MNS) सोडणार का या चर्चेला सुरुवात झाली, जी आज थेट त्यांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन थांबली.

Vasant More
Vasant More : राज ठाकरेंनी बोलावले तरी आता पुन्हा मनसेत जाणार नाही; वसंत मोरेंनी कापले परतीचे दोर

वसंत मोरेंचं काम आणि विरोधकांना घाम!

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडताच वसंत मोरेंनीदेखील कँटाेन्मेंट विधानसभा मतदारसंघाचं उपविभाग अध्यक्षपद आणि कात्रजचं शाखाप्रमुखपद सोडत शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. मोरेंनी 2007, 2012 आणि 2017 मध्ये मनसेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली. 2007 व 2012 मध्ये ते निवडून तर आलेच, पण 2017 मध्ये मनसेकडून आलेल्या अवघ्या 2 नगरसेवकांमध्येही त्यांचा समावेश होता.

यामुळे पुणे शहराच्या राजकारणात वसंत मोरेंचं नाव नेहमीच चर्चेत राहिलं. वसंत मोरे यांनी कात्रज तलावाचं सुशोभीकरण, 'फुलराणी', सर्वांत उंच तिरंगा, उद्यानं, रस्ते, दवाखाना आदी केलेली विकासकामं कात्रजकरांच्या नजरेत भरली आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून महापालिका निवडणूक काळात वेळोवेळी पसंतीही दिली. तात्यांची कामं आणि पुणेकरांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर त्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनांनी विरोधकांनाही घाम फोडला.

Vasant More
Vasant More On Raj Thackeray : राज ठाकरेंचं प्रेम आटलं? वसंत मोरेंचा कंठ दाटला, राजीनाम्याचे कारणच सांगितलं

मार्केट में जो टिकता है, वो बिकता है...

वसंत मोरेंविषयीची मनसे सोडण्याची चर्चा आज त्यांच्या राजीनाम्यानं जरी थांबली असली तरी आता पुढं काय या प्रश्नांचं उत्तर त्यांना त्यांच्या समर्थकांना आज ना उद्या द्यावं लागणार आहेच. "मार्केट में जो टिकता है, वो बिकता है," असं जरी ते आज म्हणत असले तरी ब्रँड असलेला मालच मार्केटमध्ये टिकतो आणि तोच खपतो, हेही मोरेंना लक्षात घ्यावं लागेल. पुणे लोकसभेसाठी मनसेकडून लढण्यास इच्छुक असल्याचं वारंवार सांगूनही त्यांच्याकडं पक्ष अथवा पक्षप्रमुखांनी दुर्लक्ष केलं हे कारण त्यांचा राजीनामा बाहेर येण्यास पुरेसं ठरतं.

लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असल्यानं वसंत मोरे यांना लवकरात लवकर इतर कुठल्या तरी पक्षात प्रवेश करावा लागेल अथवा अपक्ष म्हणून स्वबळावर लढावं लागेल. एकूणच काय तर 'पुण्याची पसंत मोरे वसंत' हे त्यांचंच वाक्य सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारीही आता त्यांचीच.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com