Pune News : दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेला राम राम ठोकला होता. मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विविध पक्षाच्या ऑफरदेखील त्यांना आल्या होत्या. त्यामुळे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडून खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतील, असे बोलले जात असतानाच गुरुवारी दुपारी वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आले. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला भेटीसाठी बोलवले होते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. मी अद्याप त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले नाही, त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगत ज्येष्ठ नेते वसंत मोरे यांनी त्यांच्या प्रवेशाबद्दल सस्पेन्स वाढवला आहे.
यावेळेसच्या निवडणुकीत पुण्याचे मैदान मारायचे ठरवल्याने मी शरद पवार यांच्या भेटीला आलो आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. यावेळेस मी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आहे. त्यासोबतच या वेळी खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
अमोल कोल्हे यांच्यासोबत मतदासंघाबाबत चर्चा झाली. मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. मी आता बोलून काहीच उपयोग नाही. मी फक्त शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी अजून काहीच सांगू शकत नाही. मला फक्त भेटण्यासाठी बोलावलं आहे. माझ्याकडे जे विषय आहेत, ते मी शरद पवार यांना दाखवण्यासाठी आलो आहे. ते विषय दाखवल्यानंतर मी जाताना सविस्तर सांगणार आहे . शरद पवार गटाच्या कार्यालयात आलोय. कार्यालयात माणूस भेटण्यासाठीदेखील येतो”, असं वसंत मोरे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, गुरुवारी नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर होणार आहे. याच दरम्यान शरद पवारदेखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जय्यत तयारी सुरू असून, स्टेज उभारण्यात आला आहे.
कोविड काळामध्ये लंके यांनी मोठे काम उभारले होते. या कामाचे मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच दरम्यान नीलेश लंके यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
R