Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून 18 वर्षे संघटनेत काम करणारे पक्षाचे नेते आणि मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मंगळवारी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा देताना पक्षांतर्गत होत असलेल्या गटबाजी आणि कुरघोडीला कंटाळून पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे मोरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. यापुढील काळात कुणीही आणि कितीही मनधरणी केली तरी पुन्हा मनसेमध्ये जाणार नाही, असे मोरे यांनी स्पष्ट केले.
मनसेचे पुणे शहराचे फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेने रामराम केल्यानंतर त्यावेळी शिवसेनेत असलेले वसंत मोरे यांनी देखील शिवसेनेचा राजीनामा देत राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या मागे जाणे पसंत केले. मनसेच्या स्थापनेनंतरच्या पहिला फळीतील ते पदाधिकारी होते. महानगर पालिकेत तीन टर्म ते मनसेचे नगरसेवक होते. या दरम्यान महापालिकेतील मनसेचे गटनेते, विरोधी पक्षनेते, पुणे शहराचे अध्यक्ष, मनसेचे सरचिटणीस अशा विविध पदांवर मोरे यांनी काम केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुणे लोकसभेची निवडणूक मनसेच्या तिकिटावर लढविण्यासाठी वसंत मोरे(Vasant More) इच्छुक होते. गेल्या वर्ष दीड वर्षापासून ती याबाबत आग्रही होते. लोकसभा लढवण्याची इच्छा देखील त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील स्थानिक नेते पदाधिकारी यांच्याशी त्यांचे फारसे जमत नव्हते. यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात देखील काही वेळा भूमिका घेत मोरे हे चांगले चर्चेत देखील आले होते.
पक्षांतर्गत होणाऱ्या गटबाजी यामुळे आपण हैराण झालो असल्याची पोस्ट मोरे यांनी सोमवारी रात्री सोशल मीडियावर टाकली होती. मंगळवारी सकाळी अचानक पक्षाच्या शहर कार्यालयात जाऊन त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोला दंडवत घालत आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या राजीनामाचे पत्र सर्वत्र व्हायरल करत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट केले. या सर्व घटनेनंतर दुपारी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली भूमिका जाहीर केली.
मागील लोकसभेच्या निवडणुकीत पुणे शहरातील क्रमांक दोनचा पक्ष म्हणून मनसेची ओळख होती. पुण्यात पक्ष वाढवा यासाठी अनेक वर्ष मी काम करत आहे. मात्र पक्षातील काही व्यक्तींना माझ्या कामाबद्दल आक्षेप आहेत. गेल्या दोन वर्षांपासून माझ्या पक्ष निष्ठेबद्दल वारंवार शंका निर्माण केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अचानक तीन-चार जण इच्छुक उमेदवारांच्या यादीत आले.
पुणे कोअर कमिटीने राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्याकडे नकारात्मक अहवाल पाठवला. पुणे लोकसभा मनसे लढू शकत नाही असे सामान्य कार्यकर्त्यांकडून वदवून घेण्यात आले, असा आरोप मोरे यांनी केला. कोअर कमिटीमधील पाच ते सहा व्यक्तींना पक्ष वाढलेला पाहवत नाही. त्यांना पक्ष संपवायचा आहे. त्यामुळे अशा लोकांमध्ये यापुढील काळात आपण राहू शकत नाही असे स्पष्ट करत मोरे यांनी आपण पक्षातून बाहेर पडत असल्यास सांगितले. कोण पक्ष संपवित आहे? तुमचा कोणावर आक्षेप आहे. तुमच्या उमेदवारीला कोणाचा विरोध आहे याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर देखील मोरे यांनी पक्षातील कोणाचीही नाव जाहीर केले नाही.
मनसेच्या(MNS) पुणे शहर कोअर कमिटीमध्ये मोरे यांच्यासह मनसेचे नेते बाबू वागस्कर, किशोर शिंदे, हेमंत संभुस, साईनाथ बाबर, रणजीत शिरोळे, शहराध्यक्ष अजय शिंदे, गणेश सातपुते, बाळासाहेब शेडगे यांचा समावेश आहे. यांच्यातील काही व्यक्तींची मोरे यांचे पटत नसल्याचे समोर आले होते. त्यातच राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरें यांनी सर्व लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागितले होते. त्यात पुणे शहर मनसेची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. शहराचा निगेटीव्ह अहवाल ठाकरेंकडे पाठवण्यात आला. माझ्याच निष्ठांवर नेहमी प्रश्न चिन्ह उभे केले जाते. पंधरा वर्षांपासून मी ज्यांच्यासोबत काम करत होतो, तेच लोक माझा निगेटीव्ह अहवाल पाठवत होते, असा आरोप देखील वसंत मोरे यांनी राजीनामा देताना केला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.