'जायका'वर 1 हजार 473 कोटी खर्च करुनही मुळा-मुठा स्वच्छ होणार का?

महापालिकेच्या दिरंगाईमुळे पुणेकरांवर 550 कोटींचा अतिरिंक्त भार पडला आहे.
Vivek Welankar
Vivek Welankarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : गेल्या सहा वर्षापासून रखडलेल्या शहरातील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने (PMC) राबविलेल्या निविदा प्रक्रियेला जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) ने आज (ता.२१ फेब्रुवारी) मान्यता दिली आहे. त्यामुळे हा १ हजार ४७३ कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव स्थायी समितीच्या (Standing Committee) मान्यतेनंतर लगेच सुरू होणार आहे. हा प्रकल्प सात वर्षे रखरला, त्यामुळे पुणेकरांवर ५५० कोटींचा अधिक भार पडणार आहे. त्यावरुन सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Welankar) यांनी सवाल उपस्थित केले आहेत.

वेलणकर म्हणाले ''पुणे शहरात निर्माण होणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, पुणे महापालिका आणि जपानमधील जायका कंपनी यांमध्ये फेब्रुवारी २०१५ मध्ये करार झाला. या ९९० कोटी रुपयांच्या प्रकल्पातील ८५% म्हणजे ८४२ कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार (Central Government) करणार होते. तर उर्वरित १५ % म्हणजे १४८ कोटी रुपयांचा खर्च पुणे महापालिका करणार होती. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार होता. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या प्रकल्पाची फक्त टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला तब्बल सात वर्षे लागली. अर्थातच प्रकल्पाचा खर्च साडेपाचशे कोटी रुपयांनी वाढला, असा आरोप त्यांनी केला आहे.

Vivek Welankar
भाजपची मुदत संपता-संपता 'जायका'ला मिळाली मंजुरी

केंद्र सरकार ८४२ कोटी रुपयेच देणार असल्याने हा वाढीव खर्च पुणे महापालिकेच्या अर्थात पुणेकर नागरीकांच्या बोकांडी बसणार आहे. खरे तर याची चौकशी करून जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असताना टेंडर मंजुरीपर्यंत प्रकल्प आल्याचा उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे अर्थातच या सात वर्षांत आलेली वाढीव दराची टेंडर्स रद्द करावी लागण्यापासून ते अक्षम्य प्रशासकीय दिरंगाईपर्यंत सर्व गोष्टींवर पांघरूण घातले जाणार आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासाप्रमाणे आता हा प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होऊन पूर्ण व्हायला नियोजित तीन वर्षांच्या कालावधीच्या किती पट जास्त वेळ लागेल हे परमेश्वरच जाणे, असेही ते म्हणाले.

२०१५ मध्ये या प्रकल्पाची घोषणा झाली त्यावेळी महापालिकेच्या रेकॅार्ड प्रमाणे ( जे मुळातच संशयास्पद होते ) पुण्यात ७७ कोटी लिटर प्रति दिनी सांडपाणी निर्माण होत होते. त्यावेळी पुण्याचा पाणी वापर १२० कोटी लिटर प्रति दिनी होता. त्यातील ८०% पाण्याचे सांडपाणी होते असे मानक गृहीत धरले तर हा आकडा मुळातच ९६ कोटी लिटर प्रति दिनी सांडपाणी निर्मिती असा असणे आवश्यक होते. यापैकी तेव्हा ५७ कोटी लिटर सांडपाणी प्रति दिनी प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येत होते. जायका प्रकल्पातून भविष्याचा विचार करून आणखी ३० कोटी लिटर सांडपाणी प्रतिदिनी प्रक्रिया करून नदीत सोडण्याचा संकल्प आहे. म्हणजेच जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एकूण ८७ कोटी लिटर सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येणार आहे.

Vivek Welankar
माजी महापौरांना हवेत आपल्या नावाचे नाहीसे झालेले उदघाटनाचे फलक

आज रोजी पुणे महापालिका १४५ कोटी लिटर पाणी प्रतिदिनी धरणांमधून उचलते आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांप्रमाणे यातील ८०% पाण्याचे सांडपाणी तयार होते. हे गृहीत धरले तर आजच पुण्यात प्रति दिनी ११५ कोटी लिटर सांडपाणी तयार होते आहे. अगदी हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल असे गृहित धरले तरी त्यावेळी सुध्दा फक्त प्रति दिनी ८७ कोटी लिटर सांडपाणी प्रक्रिया करुन नदीत सोडण्यात येईल. म्हणजे पुण्याचा पाणीवापर पुढचे तीन वर्ष आजच्या इतकाच राहिला तरी त्या वेळी ही प्रति दिनी ३० कोटी लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडण्यात येणार आहे. म्हणजेच स्वच्छ नदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाही, तरीही नदी पूर्ण स्वच्छ झाली असेल या गृहीतकावर पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने नदीकाठ सुंदर करण्यासाठी तब्बल ४७०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणण्याचा घाट घातला आहे. हे सगळेच अतर्क्य आणि उद्वेगजनक आहे. प्रश्न एवढाच आहे की पुणेकर नागरीक सजगतेने याचा जाब विचारणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com