Pune News : गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे शहरात नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ उडाला. चार जण दगावले. अनेक मध्यमवर्गीयांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. या सर्व परिस्थितीला गेले सात वर्ष चाललेला भाजपचा भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
या पूरस्थितीला सामोरे जाताना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका स्वतंत्रपणे घेतल्या. बिकट प्रसंगातही दोन मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचेच अशा बैठकांमधून दिसून आले. आपापल्या पक्षाला श्रेय घेण्यासाठी पूरग्रस्त पुणेकर नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले. त्यामुळे पुणेकरांपुढे प्रश्न निर्माण झाला की, पालकमंत्री कोण?
अजितदादा की मोहोळ? खडकवासला धरणातून पाणी नदीत सोडले. त्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आल्या नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबतही दोन मंत्र्यांची विधाने विसंगत आहेत. पाणी नेमके किती? आणि किती वाजता सोडले? याची उत्तरे पुणेकरांना मिळालेली नाहीत, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी पत्रकात म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले. पण, सिटी स्मार्ट होणे राहू दे, ती बकालच झाली. 2017 पासून 5 वर्ष महापालिकेत सत्ता भाजपची होती. 2014 पासून 2019 पर्यंत आणि गेली दोन वर्षे राज्यात भाजपचे सरकार आहे. या सरकारांनी पुण्यासाठी ठोस मदत केली नाही. उलट महापालिकेच्या अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आहेत. भाजपचे लोकप्रतिनिधी टेंडरमध्येच रमल्याचे सर्रास बोलले जात होते. भाजपचे खासदार, आमदार पुणेकरांनी निवडून दिले. परंतु, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी निराशाच केली, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
मुळा-मुठा नदी सुधार योजनेचा गवगवा खूप केला. पण, त्या दृष्टीने काम तसूभरही झालेले नाही. शहरात साठणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम ड्रेनेज व्यवस्था नाही. नदीकाठी पूररेषा आखून नियोजन करण्याबाबतही ढिलाई दाखवलेली आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा, अशी परवड पुणेकरांची झालेली आहे.
पुणेकरांनी गेल्या 10 वर्षात प्रत्येक निवडणुकीत भाजपला कौल दिलेला आहे. त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? याचा विचार पुणेकरांनी करण्याची आता गरज आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.