Khed BJP vs NCP : राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. यात पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समितींचा समावेश होता. दरम्यान, खेड बाजार समितीसाठी तब्बल ९९ टक्के शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण ३८९६ मतदारांपैकी ३८३९ मतदारांनी मतदान केले आहे. आता या समितीच्या झालेल्या मतदानाची मोजणी सुरू असून लवकरच निकाल स्पष्ट होणार आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचा ताबा आहे. या निवडणुकीत आमदार मोहित यांच्या ताब्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी विरोधकांनी आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. या निवडणुकीसाठी चक्क भाजप आणि ठाकरे गट हे हाडवैरी एकत्र आले आहेत. त्यांना शिवसेनेचीही (शिंदे) साथ मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्यासह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. यावेळी खेड बाजार समितीसाठी (Khed APMC) तब्बल ९८.५४ टक्के मतदान झाले. सकाळासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, वाडा, शेलपिंपळगाव, कनेरसर, पाईट आणि आंबोली अशी सात मतदान केंद्र होती. राजगुरुनगर येथे कृषी पतसंस्था व ग्रामपंचायत मतदारसंघांसह आडते व्यापारी व हमाल तोलारी मतदारसंघातील आज मतदान होते. त्यामुळे बहुतेक उमेदवार राजगुरुनगर येथील मतदान केंद्राबाहेर थांबल्याचे दिसून आले.
दरम्यान, खेड तालुक्यावर (Khed) आमदार मोहिते यांचे २००४ पासून कायम वर्चस्व राहिले आहे. यावेळी निवडणुकीतून १२५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. आमदार मोहिते यांच्या विरोधातील सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व लक्ष्मण टोपे, भाजपचे (BJP) माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील (Sharad Butte Patil), अतुल देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, शिवसेनेचे पोखरकर, ठाकरे शिवसेनेचे अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, अमोल पवार, संजय घनवट तसेच विजय शिंदे नेतृत्व करत आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी तालुक्यातील ७ ठिकाणी १७ मतदान केंद्रावर उत्साहात मतदान झाले. कृषी पतसंस्था मतदारसंघांसाठी १२७४ पैकी १२६७, ग्रामपंचायतसाठी १४०६ पैकी १३९५, आडते व्यापारींसाठी ९६७ पैकी ९५१ तर हमाल तोलारी मतदारसंघांसाठी २४९ पैकी २२६ मतदान झाले आहे. सध्या या बाजार समितीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे लवकरच या बाजार समितीवर कुणाचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट होणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.