पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आय़ुक्त शेखरसिंह यांनी आता आपली टीम बांधण्यास सुरवात केली आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या मुदतपूर्व बदलीमुळे त्यांनी तीन अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांत नुकतेच फेरबदल केले. त्यात पालिका सेवेतील एकमेव अतिरिक्त आयुक्तांकडे गौण तथा दुय्यम, कमी महत्वाची खाती कायम ठेवली गेली असून राज्य सरकारच्या सेवेतून आलेल्यांकडे महत्वाचे विभाग देण्याची पालिकेतील जुनी प्रथा नव्या आयुक्तांच्या कारकिर्दीतही कायम राहिली आहे.
दरम्यान, पाटीलकीने कारभार केलेले कार्यक्षम व धडाकेबाज पालिका आयुक्त राजेश पाटील यांची गेल्या महिन्यात १६ तारखेला मुदतपूर्व बदली झाली. त्यांच्याजागी १८ ऑगस्टला शेखरसिंह आले. मात्र,महिन्याभरातच ते राजकीय दबावाला बळी पडले. राज्यातील सत्ताबदलानंतर पिंपरी-चिंचवड भाजपच्या तक्रारीवरून राज्य सरकारने ढाकणे यांची या महिन्याच्या १३ तारखेला मुदतपूर्व बदली केली. त्यांच्या जागी पिंपरी पालिकेच्याच उपायुक्त स्मिता झगडे (एलबीटी आणि सुरक्षा) यांची नियुक्ती नगरविकास विभागाने केली होती. मात्र,त्यांना नऊ दिवस नव्या पदाचा पदभारच आय़ुक्तांनी दिला नाही.
दरम्यान, शहरातील भाजपच्या एका वजनदार नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून झगडेंची नियुक्तीच रद्द केली.त्यामुळे राज्य सरकारने आपला आदेश फिरवीत २२ तारखेला ढाकणेंच्या जागी वसई-विरार पालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या बदली तथा नेमणुकीचा आदेश काढला. त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी पदभारही आयुक्तांनी दिला.त्यामुळे या नियुक्ती नाट्याची जोरदार चर्चा झाली.
पिंपरीची ब वर्ग महापालिका असल्याने येथे तीन अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यातील एक ढाकणे हे पूर्वीचे आयुक्त पाटील यांच्या मर्जीतील होते. त्यामुळे त्यांच्याकडे महत्वाचे विभाग होते. सरकारी सेवेतून पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्यांकडे पालिका सेवेतील अधिकाऱ्यांना डावलून महत्वाची मलईदार खाती देण्याची परंपरा पिंपरी पालिकेत आहे.दरम्यान,ढाकणे यांच्या बदलीनंतर आयुक्तांनी तिन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदारींचे फेरवाटप केले. त्यात ही प्रथा कायम राहिली आहे. पालिका सेवेतील अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे अभिलेख, कार्य़शाळा, सुरक्षा असे गौण विभाग कायम ठेवले गेले.
तसेच त्यांची संख्याही इतर दोघांच्या तुलनेत कमी (१३) आहे.तर,नवे अतिरिक्त आय़ुक्त जांभळे यांच्याकडे १५ विभाग सोपविण्यात आले आहेत. तिसरे अतिरिक्त जितेंद्र वाघे यांच्याकडे प्रशासन, बांधकाम परवानगी, स्थापत्य प्रकल्प अशा महत्वाच्या १४ खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.विशेष प्रकल्प,नगररचना,लेखा, दक्षता व गुणनियंत्रण हे विभाग आयुक्तांनी स्वताकडे ठेवले आहेत.दरम्यान, एका सहाय्यक आयुक्तांची आयुक्तांनी नुकतीच बदली केली असून आणखी काही सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांत ते लवकरच फेरबदल करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.