पिंपरी : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर झाले आहे. राज्यात सत्ताबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तो होऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर ते पिंपरी चिंचवड शहराच्या पथ्यावर पडणार आहे. कारण, त्यातून शहराला प्रथमच मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे शहराचा मंत्रीपदाचा बॅकलॉगही भरून निघणार आहे. (Will Eknath Shinde's revolt allow Pimpri-Chinchwad to get ministerial post?)
देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवडला किमान राज्यमंत्रीपद मिळेल, असे वाटत असताना मंत्रीमंडळ विस्तारात ते मावळला दिले गेले. शहरातील भाजपचे दोन मातब्बर आमदार चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे हे त्यासाठी प्रबळ दावेदार होते. त्यासाठी त्यांनी जोरदार व्यूहरचनाही केली होती. त्यामुळे आपल्याच आमदाराला मंत्रीपद मिळेल, अशी आशा दोन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. या रस्सीखेचातून कोणी नाराज होऊ नये; म्हणून ऐनवेळी मावळचे पक्षाचे निष्ठावंत आमदार बाळा भेगडे यांना भाजपने मंत्री करीत पिंपरी-चिंचवडमधील संभाव्य वाद हुशारीने टाळला होता. मात्र, त्यातून शहराची ही संधी हुकली. शहर मंत्रीपदापासून वंचित राहिले.
दरम्यान, २०१९ मध्ये पुन्हा भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. जगताप व लांडगे पुन्हा निवडून आले, त्यामुळे शहराला पुन्हा मंत्रीपद मिळण्याची आशा निर्माण झाली. पण, शेवटच्या क्षणी शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी भाजपऐवजी दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी केली आणि पिंपरी-चिंचवडला मंत्रीपदाने पुन्हा हुलकावणी दिली. योगायोगाने ही संधी पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंडामुळे चालून आली आहे.
शिवसेनेतील बंडखोरांचा हा गट भाजपला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. कारण, त्यांना त्यासाठीची रसद भाजपनेच पुरविलेली आहे. तसे झाले, तर पुन्हा भाजपचे सरकार राज्यात येऊन फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. आमदार लांडगे हे फडणवीसांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील आहेत. दुसरीकडे आमदार जगताप हे जीवघेण्या आजारामुळे सध्या त्रस्त आहेत, त्यामुळे आमदार लांडगेंना मंत्रीपदासाठी शहरातच नाही, तर मावळातसुद्धा दावेदार नाही. कारण मावळात आता भाजपचा आमदारच नाही, त्यामुळे लांडगेंचा खुंटा या वेळी बळकट झालेला आहे. त्यातून शहराला प्रथमच मंत्रीपद मिळण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. ती आमदार लांडगेंच्या काही समर्थकांकडून सोशल मिडियात व्यक्तही होत आहे. त्यात त्यांनी आपल्या आमदारांना थेट कॅबिनेट मंत्रीच बनवून टाकले आहे. एकूणच शिवसेनेच्या शिंदेंचं बंड यशस्वी झाले, तर ते भाजपच्या भोसरीच्या आमदारांच्या पथ्यावर पडेल, अशीच चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.