पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांसाठी ठरवून दिलेला एक वर्षाचा कालावधी संपला आहे. एवढेच नाही, तर एक महिना जास्त झाला आहे. त्यामुळे विद्यमान विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे (NCP) राजू मिसाळ यांचा राजीनामा घेऊन पक्ष दुसऱ्याला तेथे संधी देणार का, याकडे लक्ष लागले आहे. तो बदलायचा की कायम ठेवायचा याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होणार असल्याचे पक्षाच्या गोटातून आज सांगण्यात आले. तो बदलण्याचा निर्णय झाला. तर तेथे महिलेला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, आतापर्यंत योगेश बहल, दत्ता साने, नाना काटे आणि मिसाळ हे विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यापैकी दत्ताकाका साने वगळता इतरांना आपली छाप पाडता आलेली नाही. साने यांनीच आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत बहूमत असूनही सत्ताधारी भाजपला सळो की पळो करून सोडले होते. तर, विद्यमान विरोधी पक्षनेते हे शहर कारभारी आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे गेल्या कित्येक वर्षापासूनचे मित्र आहेत. बहल पहिल्यांदा या खुर्चीत बसले तेव्हाच या पदाचा कालावधी राष्ट्रवादीने एक वर्षे निश्चीत केला. त्यानुसार गेल्या चार वर्षात चार विरोधी पक्षनेते झाले. प्रत्येकाला वर्षापेक्षा थोडा अधिकच कालावधी मिळाला.
त्यानंतरही पहिल्या तिघांचे राजीनामे घेण्यात आले. त्याच धर्तीवर चौथ्या विरोधी पक्षनेत्यांचाही राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पुरुष नगरसेवकालाच पक्ष ही संधी देतो की महिलाकार्ड खेळले जाते, याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. शहरातील तिन्ही म्हणजे भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघात हे पद आतापर्यंत मिळाले आहे. त्यामुळे आता ते बदलायचा निर्णय झाला, तर पुन्हा ते कोणाकडे जाते, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीमुळे भाकरी फिरवली जाते की नाही. याविषयी पक्षाच्या एका गोटात सांशकता आहे. तर, तो बदलावा, असा सूर महिला नगरसेविकांत आहे. पुन्हा पुरुषच नेमण्याचा विचार झाला. तर मागील वेळी दावेदार असलेले भोसरीतील अजित गव्हाणे या तरुण चेहऱ्याला ही संधी मिळू शकते. महिला नगरसेविका म्हणून माजी महापौर वैशाली घोडेकर यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, यासंदर्भात अजितदादांकडून अद्याप कसलाही आदेश आला नसल्याचे पक्षाचे मुख्य शहर प्रवक्ते फजल शेख यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. त्याच्याकडून बदलाचा आदेश येताच मिसाळ राजीनामा देतील आणि नंतर इच्छूकांकडून अर्ज मागविले जातील, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.