ZP Election: झेडपी जिंकण्यासाठी ‘पैशांचा पाऊस’! वारेमाप खर्चामुळे उमेदवारांची दमछाक, कर्जासाठी झिजवताहेत बँकांचे उंबरठे

Candidates in Maval Taluka Taking Bank Loans in ZP Election : नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही ‘पैशांचा पाऊस’ पडत आहे. खर्च कमी पडू नये म्हणून काही उमेदवारांनी थेट बँकांत जाऊन कर्ज काढल्याचीही चर्चा आहे.
Candidates in Maval Taluka Taking Bank Loans in ZP Election
Candidates in Maval Taluka Taking Bank Loans in ZP Election Sarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे मामा–भाचे पुन्हा एकदा आमने–सामने उभे ठाकले असून, या राजकीय संघर्षामुळे निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे.

नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांची धामधूम संपताच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ तालुक्यात या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींनी वेग घेतला असून प्रचारासाठी होणारा खर्च कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचल्याची जोरदार चर्चा आहे.

दहा वर्षांत बदलला खर्चाचा पॅटर्न

पूर्वी मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तुलनेने कमी खर्च होत असे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून, विशेषतः विधानसभेच्या निवडणुकांनंतर, निवडणूक खर्चाचा पॅटर्न पूर्णतः बदललेला दिसत आहे. नुकत्याच झालेल्या तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायत निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण झाल्याचे उघडपणे दिसून आले. त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही ‘पैशांचा पाऊस’ पडत असल्याचे चित्र आहे. खर्च कमी पडू नये म्हणून काही उमेदवारांनी थेट बँकांत जाऊन कर्ज काढल्याचीही चर्चा आहे.

धार्मिक सहलींचा सपाटा

निवडणूक प्रचारातील सर्वाधिक चर्चेचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे महिला मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सहली. मतदारांवर प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने काही इच्छुकांनी १०० ते १५० बसगाड्या उपलब्ध करून महिला मतदारांना विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी नेले आहे. त्याचबरोबर घरोघरी साड्या, भांडी वाटप, तसेच गावोगावी जेवणावळ्यांचे आयोजन सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आठ महिन्यांपासून प्रचाराचा खर्च सुरू

गेल्या आठ महिन्यांपासून अनेक इच्छुकांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रचाराला सुरुवात केली आहे. बैठका, गटबांधणी, कार्यक्रम, आखाडेबदल, मतदारांशी थेट संवाद, सोशल वॉर आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करण्यात आली आहे. या सर्वांवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात खुलेआम सुरू आहे.

Candidates in Maval Taluka Taking Bank Loans in ZP Election
Mahadev Jankar News : पुढच्या विधानसभेत रत्नाकर गुट्टे दिसणार नाहीत! आपल्याच पक्षाच्या आमदाराविरोधात महादेव जानकरांचा एल्गार

राष्ट्रवादी विरुद्ध भाजप

लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवत सत्ता मिळवली आहे. तळेगाव नगरपरिषदेत भाजपसोबत युती असली, तरी नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. निकालानंतर युतीतील अस्वस्थता आणि धुसपूस उघडपणे दिसून आली होती.

मामा–भाचे संघर्षाने राजकारण तापले

नगरपरिषद निवडणुका संपताच आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पूर्णतः प्रतिष्ठेची बनली आहे.या निवडणुकीत मामा की भाचा बाजी मारणार, याकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com