राहुल गांधींच्या पसंतीस भाषण उतरल्याने कुणाल पाटील उमेदवार..! 

राहुल गांधींच्या पसंतीस भाषण उतरल्याने कुणाल पाटील उमेदवार..! 

धुळे : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर धुळे मतदारसंघात माजी मंत्री रोहिदास पाटील हेच कॉंग्रेसचे उमेदवार असतील, असे चित्र होते. नंतर त्यांचे सुपुत्र धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांचे नाव अग्रक्रमावर आले. ऐनवेळी असे का घडले, याचा वेध विविध पातळीवरून सुरू झाला. त्यात कॉंग्रेसच्या येथील सभेत आमदार पाटील यांनी प्रास्ताविकात खणखणीत भाषण केले अन्‌ ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे त्यांनी आमदार पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी निश्‍चित करण्याचे ठरविले.

येथील "एसएसव्हीपीएस' महाविद्यालयाच्या मैदानावर एक मार्चला राज्यातील कॉंग्रेसची पहिली सभा झाली. खासदार गांधी यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आमदार पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी हिंदी व मराठीत अनेक प्रभावी मुद्दे मांडत, भाजपसह संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा साडेचार वर्षांतील कामकाजाचा समाचार घेत टीकेची तोफ डागली होती.

त्यावेळी खासदार गांधी यांनी आमदार पाटील यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकले. त्यांचे भाषण खासदार गांधी यांच्या पसंतीस उतरले. दिल्लीला परतल्यावर धुळे मतदारसंघातील उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा खासदार गांधी यांनी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याऐवजी आमदार पाटील यांचे नाव अग्रस्थानी आणले.

तत्पूर्वी, सोनिया गांधी यांनी माजी मंत्री पाटील यांना पक्षाचे ज्येष्ठ व एकनिष्ठ नेते म्हणून उमेदवारीसाठी हिरवा कंदील दिला होता. परंतु, खासदार गांधी यांनी आमदार पाटील यांनाच उमेदवारी देण्याचा ठाम निर्णय बोलून दाखविला. खासदार गांधी यांचे मतपरिवर्तन होत नसल्याने आमदार पाटील हेच कॉंग्रेसचे उमेदवार असतील, असा पुनरुच्चार सूत्रांनी केला. सभेच्या दिवशी माजी मंत्री पाटील यांनी प्रास्ताविकपर भाषण केले असते तर ते उमेदवार म्हणून दिसले असते. त्यांच्याऐवजी आमदार पाटील यांना ही संधी मिळाल्याने कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांचीही गोची झाली.

आमदार पाटील यांच्या दृष्टीने धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ सुरक्षित असताना त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारपदी वर्णी लागत असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. माजी मंत्री पाटील यांच्यासाठी आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह अन्य नेत्यांनीही शक्ती पणाला लावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com