पिंपरीः ओमीक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (Covid-19) नव्या उत्परिवर्तीत विषाणूने आता संपूर्ण जगाची झोप उडविण्यास सुरवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) युरोप व नंतर भारतासह (India) सर्वत्र या वेगाने प्रसार होणाऱ्या विषाणूचा तसाच जोरदार प्रार्दूभाव सुरु झाला आहे. पण, आता त्याने बळीही घेण्यास सुरवात केली आहे. राज्यातील ओमीक्रॉनचा पहिला बळी हा पिंपरी-चिंचवडमध्ये गेला. त्याला गुरुवारी (ता.३०डिसेंबर) पुष्टी मिळाली आहे.
ओमीक्रॉनचा पिंपरी-चिंचवडच नाही, तर राज्यातील पहिला बळी ठरलेला व्यक्ती हा नायजेरियाहून आला होता. पालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव स्मृती रुग्णालयाच्या रुबी अलकेअर कार्डिआक सेंटरमध्ये त्याचा मंगळवारी (ता.२८ डिसेंबर) ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला ओमीक्रॉन झाल्याचा अहवाल आज (ता.30 डिसेंबर) आला. या पुरुष रुग्णासह त्याच्या सहवासात आलेल्या दोन महिला अशा तिघांना ओमीक्रॉन झाल्याचे आज स्पष्ट झाले. तर, काल म्हणजे बुधवारी (ता.२९ डिसेंबर) शहरात ओमीक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळले होते. त्यात दोन पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलगा आहे. त्यापैकी एकेक जपान, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे. आता शहरातील या नव्या कोरोनाची रुग्णसंख्या २६ वर गेली आहे. त्यातील एकाचा बळी आज गेला. १५ जण ओमीक्रॉनमुक्त झाले असून दहाजण अद्यापही उपचार घेत आहेत.
आतापर्यंत परदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा १ हजार ५९१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. ३२ परदेशी प्रवासी व त्यांच्या संपर्कातील २८ अशा साठजणांना कोरोनाचा प्रार्दूभाव झाल्याचे आढळून आले. या साठपैकी परदेशातून आलेले १४ व त्यांच्या संपर्कात आलेले ११ व रॅंडम तपासणीत सापडलेला एक अशा २६ जणांना ओमीक्रॉन झाल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, तिसऱ्या लाटेचे संकेत मिळाल्याने नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याचे आवाहन पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. तसेच, त्यासंदर्भात राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याबाबतचा आदेश त्यांनी गुरुवारीच काढला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.