मुंबई : राज्य विधीमंडळाच्या मागील अधिवेशनात विरोधी बाकांवरच्या डझनभर आमदारांना निलबंनाचा 'धडा' शिकविलेले तेव्हाचे तालिकाध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांवर अंगावर घेतले.
त्याला निमित्त ठरले, जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) नक्कल करण्याचे. देशाच्या प्रमुखांची नक्कल योग्य नसल्याचा आक्षेप घेत, विरोधकांनी जाधवांना 'सस्पेंड' करण्याची मागणी केली. यानिमित्ताने जाधव आणि विरोधकांमील नव्या संघर्षाची चुणूकही दिसून आली. अखेर आपले शब्द आणि अंगविक्षेप मागे घेत असल्याचे जाधवांनी सभागृहात जाहीर केले. तरीही जाधवांच्या माफीवर विरोधक ठाम राहिले. त्यावरून उडालेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.
झाले असे की, विधानसभेत विजेच्या मुद्यावरून चर्चेला सुरवात झाली; त्यानंतर केंद्र सरकारच्या जनधन योजनेवरून जाधवांनी मोदींची 'स्टाईल' करीत, ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचा मुद्दा उचलून धरला आणि विरोधकांवर निशाणा साधला. त्यावरून संतापलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या आमदारांनी जाधवांनी केलेल्या नक्कलेवर आक्षेप घेतला आणि पंतप्रधानाची नक्कल करणे लोकप्रतिनिधींना शोभणारे नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह काही मंत्र्यांनी जाधवांच्या भूमिकेवर बोट ठेवले. त्यामुळे बळ आलेल्या विरोधकांनी जाधव यांच्यावर हल्ला सुरूच ठेवला. तेवढ्यात पुन्हा बोलण्यासाठी उभे राहिलेल्या जाधवांनी शब्द आणि मी केलेले अंगविक्षेप मागे असल्याचे जाहीर केले.
अंगविक्षेप मागे घेता येत नसल्याची जाणीव करून देत फडणवीस पुन्हा आक्रमक झाले. त्यावर 'मी एवढेच करू शकतो' असे सांगून जाधव आपल्या खुर्चीत बसले. त्यानंतरही विरोध ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी झिरवाळ यांनी सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी थांबविले. कामकाज सुरू होताच फडणवीस आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. मात्र, जाधव माफी मागण्यास तयार झाले नसल्याने पुन्हा सभागृह तकबूक झाले.
"एखाद्या वरिष्ठ नेत्याबद्दल, तो सभागृहात असो अथवा नसो, त्याच्याबद्दल बोलू नको. विरोधकांच्या आरोपाप्रमाणे अंगविक्षेप करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत झिरवाळ यांनीही जाधव यांचे कान टोचले. तरीही जाधव आपल्या भूमिकेवरून तसूभरही मागे आले नाहीत.
मागील अधिवेशनात तालिकाध्यक्ष असताना सभागृहात गोंधळ घालून, त्यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ केल्यावरून भाजपच्या 12 आमदारांना जाधवांनी निलंबित केले होते. त्यामुळे जाधव आणि भाजप नेत्यांमध्ये सभागृहात आणि सभागृहात रणकंदन झाले होते. तेव्हापासूनच जाधव यांचे शिवसेनेत आणि महाविकास आघाडीत 'वजन' वाढले, तर दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही आमदारांचे निलंबन मागे न घेतल्याचा राग असलेल्या भाजपच्या रडावर जाधव कायम राहिले. अर्थात सभागृहात आजचा प्रकार झाल्यानंतर मुनगंटिवार आणि भास्कर जाधव हे सभागृहातून हसत बाहेर आल्याची छबी अनेकांनी टिपली.
या अधिवेशनात निलंबन मागे घेण्यासाठी आमदारांनी अर्ज केल्याची चर्चा विधीमंडळात सुरू असतानाच जाधव यांनी मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत पहिल्याच दिवशी जाधव आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली. जाधव यांच्यावरून वादंग निर्माण झाल्याने ते विधीमंडळात आज चर्चेत राहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.