

ठाणे : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमात अनेकांना खिसेकापू व पाकीटमारांचा चांगलाच झटका बसला आहे. यामध्ये ठाण्याच्या एका आमदारांचा खिसा रिकामा करत चोरट्याने दोन महागडे मोबाईल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या चोरट्याच्या हातसफाईतून पत्रकारही सुटले नाहीत. (Thieves cut MLA's pocket during Kapil Patil's Jana Aashirwad Yatra)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा आयोजित केली. या जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ सोमवारी (ता. १६ ऑगस्ट) ठाण्यात झाला. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा उठवत या वेळी चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले. तसेच मोबाईलही लंपास केले.
एका मोठ्या नेत्याचे दोन मोबाईल गायब झाले, तर मंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीच्या एक लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेवरही चोरट्यांनी हात मारला. एका पत्रकारालाही खिसेकापूंचा झटका बसला आहे. मुलीच्या शिकवणीसाठीचे शुल्क भरण्यासाठी असलेले १५ हजार रुपये पाकीटमारांनी लंपास केले. या कार्यक्रमात चोरट्यांनी आपला हिसका दाखवला असला तरी फारशी तक्रार कोणी नोंदवली नाही. मात्र, एका पत्रकाराने आणि एका फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यामुळे हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत करणे पडले महागात
ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी मनाई आदेश लागू केलेले असतानाही मास्क न घालता भारतीय जनता पक्षाच्या जनआशीर्वाद यात्रेत गर्दी करुन कोरोना महामारीच्या निमयमांचे उल्लंघन केले. तसेच, या यात्रेचे स्वागत करण्यासाठी फटाके लावून लोक एकत्रित जमा केल्याने कोरोनासारखा साथीचा आजार पसरविण्यासह हयगय तसेच घातकी कृती केल्याचा ठपका ठेवत भाजपचे ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस यांच्यासह दोन नगरसेवकांविरुद्ध ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे शहर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विलास साठे, नौपाड्यातील नगरसेवक संजय वाघुले आणि कोपरीतील नगरसेवक भरत चव्हाण यांना चांगलेच महागात पडले आहे. कोरोना महामारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने या तिघांसह इतरांवर कोपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जनआशीर्वाद कार्यक्रमाच्या ठिकाणी विनापरवाना स्टेज बांधणे. त्याठिकाणी वाद्य आणि गाणी वाजवून लोकांना आकर्षित करून मोठया प्रमाणात नागरिकांना एकत्र करणे, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. असे असतानाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर फटाके वाजवित त्यांचे स्वागत करण्यात आले. मर्यादेपेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते स्टेजवर एकत्र जमले. त्यातील काहींनी मास्कचा वापरही केला नव्हता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.