

मुंबई : नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहेत. तर स्थानिकांकडून प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्या नावावरच जोर देण्यात आल्याने मुख्यमंत्री दोनदा बैठकीतून उठून गेले. त्यामुळं सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. (CM Uddhav Thackeray insists on naming Navi Mumbai Airport after Balasaheb Thackeray)
बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये कृती समितीच्या शिष्टमंडळाची बाजू ऐकून न घेताच मुख्यमंत्री निघून गेल्याचा दावा समितीने केला. त्यामुळं येत्या २४ जून रोजी आंदोलन करण्याचा निर्धार समितीच्या नेत्यांनी केला.
विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २००८ पासून कली जात आहे. तर राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. या ठरावाला रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील अनेकांनी तीव्र विरोध केला आहे.
येत्या २४ जूनला प्रकल्पग्रस्तांच्या सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीकडून सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी दि. बां.चे नाव देण्यास वेगळा पर्याय असेल तर सुचवा, अशी सूचना केली. समितीने दि. बां.च्या नावाचा पुनरुच्चार केल्यानंतर मुख्यमंत्री उठून निघून गेले.
एकनाथ शिंदे यांच्यासमोर समितीच्या नेत्यांनी दि. बां.चे नाव का, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १५ मिनिटांनी मुख्यमंत्री पुन्हा बैठकीत आल्यावर नेत्यांनी दि. बां.च्याच नावाचा आग्रह धरला. पण मुख्यमंत्र्यांनी विमानतळ सोडून इतर कोणत्याही वास्तूला नाव देण्याचा पर्याय सुचवला. अखेर मुख्यमंत्री यावर ठाम राहिल्याने बैठकीत तोडगा निघाला नाही. राज्य सरकार आमच्यावर दबाव टाकणार असेल तर आमचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.