गिरीष बापटांनाही हवी शिवसेनेशी युती; उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडं लक्ष

भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईल, असं आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.
BJP MP Girish Bapat wants alliance with Shiv Sena in corporation election
BJP MP Girish Bapat wants alliance with Shiv Sena in corporation election
Published on: 
Updated on: 

पुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. या पत्रामुळं पुन्हा एकदा भाजप व शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या काही नेत्यांनाही ही युती व्हावी, असे वाटत आहे. पुण्यातील भाजपचे खासदार गिरीष बापट यांनीही युती झाल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, सरनाईक यांनी ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, परब, वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास थांबेल, असे त्यांनी म्हटले आहे.

यावर बोलताना बापट म्हणाले, भाजप कोणतीही कारवाई करत नाही. भाजप गरीब पक्ष असून लोकांना मदत करणारा पक्ष आहे. सरनाईक यांनी भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात अशा गोष्टी होऊ शकतात. आमची युती अनैसर्गिक आघाडीमुळं तुटली होती. भविष्यात युती होऊ शकते. आम्हाला त्याचा आनंद होईल, असे बापट यांनी सांगितले. 

सरनाईक आता जे बोलत आहेत, ते भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकार होण्याआधीपासूनच बोलत होते. सरनाईक यांच्या पत्राचा त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. यावर त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निर्णय घ्यायचा आहे, असेही बापट म्हणाले. 

पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्राधान्य

पुढील वर्षी राज्यात मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा आहे. त्यातच सरनाईक यांच्या पत्रामुळं भाजप व शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना बापट यांनी पालिका निवडणुकीत शिवसेनेशी युतीलाच प्राधान्य असेल, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील छोटा पक्ष आहे. तो अखिल भारतीय पक्ष नाही. या पक्षापेक्षा शिवसेनेला प्राधान्य राहील, असा टोलाही बापट यांनी लगावला.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.