अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री असतील. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत. केजरीवाल सरकारमध्ये आतिशी या 'बलाढ्य' अशा मंत्री आहेत. केजरीवाल यांनी पायउतार होण्याची घोषणा केल्यापासून आतिशी यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये सर्वांत पुढं होते.
मंगळवारी सकाळी 'आम आदमी पक्षा'च्या ( आप ) आमदारांची केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्या सिविल लायन्स येथील निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर 'फायनल' शिक्कामोर्तब झाला. आतिशी पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांचं शिक्षण झालं आहे.
2020 मध्ये आतिशी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. 2023 मध्ये मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर वर्षभरातच 2024 मध्ये आतिशी मुख्यमंत्री होणार आहेत. 2019 मध्ये आतिशी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. भाजपचे गौतम गंभीर यांनी आतिशी यांचा 4 लाख 77 हजार मतांनी पराभव केला होता. आतिशी थेट तिसऱ्या क्रमाकांवर फेकल्या होत्या.
आतिशी या केजरीवाल यांच्या निकटवर्तीय आणि विश्वासू मानल्या जातात. अन्ना हजारे यांच्या आंदोलनापासून त्या सक्रिय आहेत. मनिष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल तुरूंगात गेल्यानंतर आतिशी यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयाचा भार होता. तेव्हापासून पक्ष ते सरकारच्या प्रत्येक गोष्टी आतिशी यांनी कसोटीनं हाताळल्या.
आतिशी 2020 मध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार धर्मवीर सिंह यांचा 11 हजार 393 मतांनी पराभव केला होता. आतिशी यांचा जन्म 8 जून 1981मध्ये दिल्लीत झाला होता. त्यांचे वडील नामविजय सिंह हे दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक होते. आतिशी यांचं शालेय शिक्षण नवी दिल्लीतील स्प्रिंगडेल शाळेत झालं. सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासात पदवी मिळाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे गेल्या.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात सेंद्रीय शेती आणि प्रगतशील शिक्षण संस्थेत आतिशी यांनी काम करण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांची 'आप'च्या सदस्यांशी भेट झाली. त्यानंतर 'आप'च्या पक्ष स्थापनेवेळीही आतिशी होत्या.
2013 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'चा जाहीरनामा तयार करण्यात आला. त्या मसुदा समितीच्या आतिशी प्रमुख सदस्य होत्या. 'आप'च्या सुरवातीच्या टप्प्यात पक्षाची धोरणे तयार करण्यास आतिशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याशिवाय पक्षाचे प्रवक्ते म्हणून आतिशी यांनी मोठ्या ताकदीनं बाजू मांडली. केजरीवाल यांच्याप्रमाणे आतिशी सिसोदिया यांच्याही विश्वासू समजल्या जातात. आतिशी यांनी सिसोदिया यांचे सल्लागार म्हणून काम केलं आहे. तसेच, सिसोदिया यांना तुरुंगवारी झाल्यानंतर त्यांच्याजवळील शिक्षण खात्याचा कारभार आतिशी यांनी सांभाळला आहे.
दिल्ली पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांना थेट शिंगावर घेणं असो अथवा शाळांमध्ये अचानक भेट देऊन चौकशी केल्यामुळे आतिशी सोशल मीडियावर लोकप्रिय ठरल्या. केजरीवाल तुरुंगात असताना स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवायचा होता. तेव्हा, केजरीवाल यांनी आतिशी यांना फडकविण्याची परवानगी द्यावी म्हणून नायब राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. मात्र, नायब राज्यपालांनी कैलास गेलहोत यांचं तिरंगा फडकवण्याची परवानगी दिली होती.
केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार असताना 9 मार्च 2023 मध्ये आतिशी यांना पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. दिल्ली सरकारमध्ये त्या एकट्याच महिला मंत्री होत्या. त्यासह त्यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पाणी, महसूल, नियोजन आणि वित्त विभागाच्या मंत्रालयाचा कारभार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.