महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार उर्फ सर्वांना परिचित असणाऱ्या ‘अजित दादा’ यांचा 22 जुलै हा वाढदिवस. एक शिस्तप्रिय नेता, प्रशासनावर मजबुत पकड, कामाचा प्रचंड उरक, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, छोटे-मोठे कार्यकर्ते यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच सर्वांना उपलब्ध. काम होणार असेल तर होईल आणि त्यात काही अडचणी असल्यास होणार नाही असे रोखठोख सांगणारे अजित दादा सर्वांना वरकरणी कडक स्वभावाचे वाटत असले तरी सेन्सेटिव्ह आणि मायाळू सुद्धा आहेत. मित्रपरिवार, नातेवाईक, जवळचे कार्यकर्ते यांच्या सुख-दु:खात सहभागी होतात हा त्यांचा स्वभाव तितकाच सर्वांना भावतो. दादांचा जनसंपर्क खूपच दांडगा असल्याने रोज त्यांना शेकडो लोक राज्यभरातून भेटण्यासाठी गर्दी करतात. मुंबईतील त्यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी भल्या पहाटेच कार्यकर्ते भेटण्यासाठी गर्दी करतात. मंत्रालयातील दालन असो की पक्ष कार्यालय सर्वत्र कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पाहायला मिळतेच.
राष्ट्रीय राजकारणात आघाडीचे राजकारणी म्हणून संपूर्ण देशाला ज्यांची ओळख आहे त्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांचे अजित दादा हे पुतणे. थोरले बंधू अनंतराव गोविंदराव पवार यांचे थोरले चिरंजीव. शरदचंद्र पवार हे राजकारणातील मुरब्बी नेते, दृष्टे, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या प्रश्नाची चांगली जाण त्यांना आहे. त्यांच्याच मुशीत अजितदादांचे नेतृत्व घडले, बहरले. त्यामुळे अजितदादा सुद्धा काकांच्या पावलावर पाउल टाकून कामे करतात. सकाळी लवकर उठून लोकांना भेटणे, त्यांची कामे करणे तसेच नियोजित कार्यक्रमांना वेळेत पोहचणे हा वक्तशीरपणा आणि शिस्त हे गुण आपल्या काकांकडून अजित दादांनी घेतले आहेत. कार्यक्रमास वेळेत पोहचणे किंबहुना अर्धा तास अगोदरच पोहचणे हा कटाक्ष अजित दादा आजही काटेकोरपणे पाळतात.
अजित दादांचे आजोळ ‘देवळाली-प्रवरा’ येथील प्रगतीशील शेतकरी कदम कुटुंब. आजोळीच अजितदादांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला. शालेय शिक्षण बारामती येथे झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले. तेथे बी.कॉम. ला प्रवेश घेतला. बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला असतांना वडिलांचे निधन झाल्याने अजित दादा यांनी पदवीचे शिक्षण अर्थवट सोडले. ते बारामती येथे शेती करायला लागले. वडील हाडाचे शेतकरी असल्याने त्यांच्यामुळेच अजित दादांना सुद्धा शेती करण्याची गोडी लागली. अजितदादा हे उन्हाळी सुट्टीसाठी बारामतीला आल्यावर शेती करायचे. शेतात नांगरणी, वखारणी करण्याबरोबरच शेताला पाणी भरणे, गायीच्या दुधाच्या धारा काढणे, दूध डेअरीला नेऊन पोहचविणे ही सर्व कामे अजितदादा लीलया करीत असे.
त्यामुळेच आजही दादांना शेतात कोणते पिक घेतले पाहिजे. पिकांना कोणती खते दिली पाहिजेत. पिकावर कुठली किटकनाशके फवारली पाहिजेत याचे उत्तम जाण त्यांना आहे. आजही ते सवड काढून शेतात आवर्जून जातात. तेथे आपल्या सालगड्यांना शेतात काय काय करायचे याचा सल्ला देत असतात. अजित पवार यांचा विवाह माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा यांच्याशी झाला. त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. अजितदादा यांना पार्थ आणि जय अशी 2 उच्च शिक्षित मुलं आहेत. दोघेही राजकारणापेक्षा व्यवसायात अधिक सक्रिय आहेत.
अजितदादांच्या राजकीय जडणघडणीला 1982 साली प्रारंभ झाला. सहकारी साखर कारखाना, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांची एन्ट्री झाली. दादा साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले. सहकाराच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. पुढे 1991 मध्ये संसदीय राजकारणात उडी घेतली. ते बारामतीचे खासदार म्हणून निवडून आले. लगेचच पुणे जिल्हा सहकारी बँकेवर निवडून गेले. ते बँकेचे अध्यक्षही झाले आणि सलग 16 वर्ष अध्यक्षपदी काम केले.
शरद पवार यांना मुख्यमंत्री सोडून केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जावं लागल्याने अजित पवार यांनी त्यांच्यासाठी खासदारकीचा राजीनामा दिला. त्याचवेळी शरद पवार यांच्या विधानसभेच्या जागी अजित पवार निवडून गेले आणि राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली. ते जून 1991 ते नोव्हेंबर 1992 आणि नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 या दरम्यान ते कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, ऊर्जा, नियोजन अशा खात्याचे राज्यमंत्री होते. 1991 ते आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा इतिहास घडविणारे नेते म्हणून ओळखलं जातं.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 1 लाख 65 हजार मतांच्या मताधिक्याने अजित पवार निवडून गेले. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून अजितदादा यांची त्यावेळी नोंद झाली. मात्र पक्षात फाटाफूट झाल्यावर अजितदादा हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. आपल्या काकांचा हात सोडून त्यांनी भाजपसोबत जुळवून घेत सरकारात सत्तारूढ झाले. त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थ, नियोजन खात्याची जबाबदारी टाकण्यात आली.
राजकीय फाटाफुटीनंतर अजितदादा यांनी काका शरद पवार यांच्या पक्षाविरोधात 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविली. लोकसभेला दारूण पराभव झाल्यावर अजितदादा यांनी विधानसभेसाठी कंबर कसली. राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. प्रचंड मेहनत घेऊन 2024 ची विधानसभा निवडणूक प्रचंड ताकदीने लढविली. विधानसभेला 41 आमदार निवडून आणले. दादांनी, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढला. 1995 ते 1999 आणि 2014 ते 2019 हा शिवसेना-भाजपा युतीचा काळ वगळता आतापर्यंत अजित पवार यांनी सातत्याने विविध खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. वेगवेगळ्या सरकारात आतापर्यंत त्यांनी 6 वेळेस उपमुख्यमंत्री म्हणून कामं पाहिले.
याशिवाय बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्थ, छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर या तीन सहकारी साखर कारखान्याचे संचालक, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन अशा विविध ठिकाणी ते पदाधिकारी असल्याने अजितदादा हे 24*7 सार्वजनिक कामात व्यस्त असतात.
पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या मतदारसंघातील कामांना निधी उपलब्ध करून देणे. मतदारसंघातील विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी मदत करणे यामुळे अजित दादा हे आमदारां मध्ये लोकप्रिय आहेत. पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विविध योजना व विकास कामांना वेळोवेळी मोठा निधी देऊन त्यांना ताकत देतात. त्यामुळेच अजितदादा यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने आमदार उभे राहतात. विकास कामे करायची असतील त्यासाठी दादांच्या सोबत रहावेच लागेल अशी भावना पक्षातील लोकप्रतिनिधींची असते.
मंत्रिमंडळातील विविध खात्यांचा प्रदीर्घ अनुभव, सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सामजिक क्षेत्र, क्रीडा अशा विविध आघाड्यावर उल्लेखनीय केलेले काम असा भलामोठा अनुभव गाठी असल्याने आणि प्रशासनावर असलेली पकड, कामाची शिस्त, निर्णय क्षमता, प्रश्न सोडविण्याची हातोटी, दांडगा जनसंपर्क हे गुण त्यांच्या अंगी असल्याने महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची मोठी क्षमता अजितदादा यांचेकडे आहे. आज-ना-उद्या ते मुख्यमंत्री होतील, अशी राज्यातील जनतेची जन भावना आहे.
राज्यात सध्या कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. खून, महिला अत्याचार अशा घटना घडत आहेत. राज्यातील गुंडा-पुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी अजितदादा सारखे खमक्या नेतृत्वाकडे मुख्यमंत्रीपद देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रासाठी ती गरज आहे. मात्र हा सुदिन कधी उजाडेल हे आज तरी सांगता येणे अवघड वाटत असले तरी आमचा ‘अजित दादा’ एक दिवस नक्की मुख्यमंत्री होईल याची ‘आस’ आजही त्यांच्या कार्यकर्त्यांना ,चाहत्यांना लागून राहिली आहे. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात खरे ठरावे,यासाठी शुभेच्छा !
लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
tarachand.mhaske@gmail.com
9822422180 / 9823467676
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.