Anand Paranjpe Shiv Sena : शिवसेनेत प्रवेशानंतर तीन महिन्यांतच आनंद परांजपे यांच्याकडे मोठी जबाबदारी; 29 महापालिकांसाठी प्रशिक्षण मोहीम

Anand Paranjpe gets key organisational role in Eknath Shinde led Shiv Sena : श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातील प्रशिक्षण उपक्रमाचा समन्वय परांजपे यांच्याकडे; पुढे आमदार-खासदारांसाठीही शिबिरांची तयारी
Anand Paranjpe Shiv Sena
Anand Paranjpe Shiv SenaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena Training Camp : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून अवघे तीन महिने झाले असतानाच ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी पक्षसंघटनेत सक्रिय भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील 29 महापालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण आणि चिंतन शिबिरांचे नियोजन करण्यात येत असून, या उपक्रमाच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

नगरसेवकांनंतर आमदार, खासदार आणि विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांसाठीही अशाच प्रकारची शिबिरे आयोजित करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेत (Shivsena) पुनरागमन केल्यानंतर परांजपे यांची राजकीय वाटचाल आता कोणत्या दिशेने जाणार, याबाबत पक्षांतर्गत उत्सुकता वाढली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित संस्थांच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या बौद्धिक आणि प्रशिक्षण वर्गांच्या धर्तीवर आता शिवसेनेनेही लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे. उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे शिवसेनेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर आणि उपमहापौर यांच्यासाठी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले. प्रशासनाची कार्यपद्धती, विविध सरकारी योजना, विकास आराखडा, निधीचे नियोजन तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय कसा साधावा, यासह विविध विषयांवर या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले.

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच्या समन्वयाची जबाबदारी आनंद परांजपे यांच्याकडे आहे. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरातील शिवसेनेच्या 150 हून अधिक नगरसेवकांनी या शिबिरात सहभाग घेतला. आता याच धर्तीवर राज्यातील 29 महापालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती परांजपे यांनी दिली आहे.

14 वर्षांनंतर शिवसेनेत पुनरागमन

आनंद परांजपे यांनी 14 मे 2026 रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. परांजपे यांची सुरुवातीची राजकीय वाटचाल शिवसेनेतूनच झाली होती. तब्बल 14 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

काही महिन्यांतच मोठी जबाबदारी

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या दोन गटांपैकी परांजपे यांनी सत्तेत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची निवड केली. प्रवेशानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्याकडे राज्यव्यापी स्वरूपाच्या प्रशिक्षण उपक्रमाचा समन्वय सोपविण्यात आल्याने त्यांच्या वाढत्या भूमिकेकडे लक्ष वेधले जात आहे.

‘ऑपरेशन टायगर’ आणि संघटन विस्ताराची मोहीम

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून राज्यात संघटन विस्तारावर भर दिला जात आहे. विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना पक्षात आणण्याची मोहीम सुरू असून, त्याला पक्षांतर्गत ‘ऑपरेशन टायगर’ असे संबोधले जात आहे.

शिवसेना ठाकरे पक्ष सर्वाधिक लक्ष्य

विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क सुरू असल्याचे दावे सातत्याने करण्यात येत आहेत. काही खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी पक्षाच्या संपर्कात असल्याचेही शिंदे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संघटन विस्तारासोबतच विद्यमान लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यावरही पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

परांजपे यांच्यावर मोठ्या जबाबदारीची चर्चा

राज्यात संघटन विस्ताराची मोहीम वेगाने सुरू असताना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची राज्यव्यापी जबाबदारी आनंद परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी परांजपे या उपक्रमातून सक्रियपणे काम करत असल्याचे दिसत आहे.

लवकरच आमदार अन् खासदारांसाठी प्रशिक्षण

29 महापालिकांतील नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिरे राबविल्यानंतर हा उपक्रम आमदार, खासदार आणि पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांपर्यंत विस्तारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेत पुनरागमनानंतर आनंद परांजपे यांच्याकडे भविष्यात आणखी मोठी संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Amravati teachers constituency
Uddhav thackeray, eknath shinde, jaykumar gore
Shiv Sena will launch farmer help centres to assist farmers with crop insurance, compensation claims and government schemes.
Uddhav Thackeray Ekanth Shinde
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com