Balasaheb Thackeray Jayanti : ...त्यामुळेच 'संभाजीनगर' हेचं नाव हवं, असं बाळासाहेब ठणकावून सांगायचे!

Balasaheb Thackeray Jayanti 2024 : 'आरक्षणाच्या कुबड्या फेकून द्या, हे खणखणीत सांगण्याची हिंमत असणारे एकमेव नेते म्हणजेच बाळासाहेब ठाकरे.'
Balasaheb Thackeray
Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 व्या जयंती यानिमित्त केवळ राजकीय पक्षाचे नेतेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्ती ज्यांनी बाळासाहेबांना ऐकलंय, अनुभवलंय, पाहिलंय आणि त्यांच्याबाबत वाचलंय असे सर्वचजण त्यांना अभिवादन करत आहेत, त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेना युतीच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलेले भाजपचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी त्यांच्या आठवणींना लेखातून उजाळा दिला आहे. यामध्ये त्यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगरच का पाहिजे, याबाबत बाळासाहेबांचे रोखठोक मत आणि आरक्षणाबाबतचे विचारही मांडले आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती! या निमित्त त्यांच्या सहवासातील काही आठवणी जागृत झाल्या आहेत. अशा आठवणी ज्यांनी माझ्या राजकीय जीवनातील माझ्या विचार प्रवाहाला नवं वळण दिलं. आज आदरणीय बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्या जरूर विदित करू इच्छितो.

मी लहानपानापासूनच संघाचा स्वयंसेवक होतो. माझा भारतीय जनता पार्टीमध्ये समावेश झाला तोच मुळी जेव्हा संभाजीनगर शहरात भारतीय जनता पार्टीचं महापालिकेत अस्तित्व शून्य झालं तेव्हा आणि मग संघाचं काम करत असताना काही वरिष्ठ लोकांनी सांगितलं कि, 'तू आता भाजपाचं काम कर. पक्षाला चांगल्या सक्रिय माणसांची गरज आहे.' त्यावेळचे संघटन मंत्री शरदभाऊ कुलकर्णी यांच्याशी माझी भेट घालून देण्यात आली आणि त्यांच्याबरोबर मला संपूर्ण मराठवाड्यात काम करण्याची संधी मिळाली. नंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झाली. त्यामुळे निवडणुकीच्या काळात या बाळासाहेबांच्या सामायिक सभेला मी उपस्थित राहिलो आणि त्यावेळी मला बाळासाहेबांचा सहवास लाभला.

परंतु त्यांचा खरा परिचय झाला तो 1995च्या निवडणुकीदरम्यान. खरं तर मुंबई पातळीवर झालेली भाजपा - शिवसेना युती ही स्थानिक पातळीवर आपली जादू दाखवू शकेल का? असा प्रश्न माझ्यासह अनेक नेत्यांना भेडसावत होता. कारण युतीमुळे ठराविक जागा ठराविक उमेदवारांसाठी सुटल्या होत्या.

त्यामुळं त्या विशिष्ट जागेसाठी आस धरून बसलेले उमेदवार आणि त्यांचे हितचिंतक युतीच्या उमेदवारासाठी त्याच निष्ठेनं लढतील का? ही खरी भीती होती आणि त्यातही शिवसेनेचे तरुण तडफदार कार्यकर्ते आणि भाजपाचे वयानं वरिष्ठ असलेले निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार यांच्यात 'जनरेशन गॅप' असल्यामुळं कुठेतरी सुसंवादाचा सूर दिसत नव्हता. त्यामुळं या सर्वांमध्ये एक स्नेहबंध निर्माण करण्याची जबाबदारी आमच्या सारख्यांवर होती.

त्यावेळी सिल्लोड आणि संभाजीनगर पूर्व म्हणजे आत्ताचा फुलंब्री मतदारसंघ हे दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लढवत असे. या मतदारसंघातून त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे माननीय हरिभाऊ बागडे हे निवडणुकीला उभे होते. 1995च्या निवडणुकीत ते विजयी झाले असते तर ती त्यांची हॅट्ट्रिक होणार होती. त्यांचं कामही खूप चांगलं होतं. त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेचे तरुण कार्यकर्ते सक्रिय होणं गरजेचं होतं.

या पार्श्वभूमीवर मी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद महाजन यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली कि, "बाळासाहेबांच्या सभा या संभाजीनगर पश्चिमला होतात त्या भाजपाच्या मतदारसंघात होत नाहीत. तर त्यांची एखादी तरी सभा ही भारतीय जनता पार्टीच्या मतदार संघात व्हायला हवी. शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम असतो आणि एकदा का बाळासाहेब आमच्या पाठीशी उभे आहेत म्हंटल्यावर आम्हाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी वेगळा संवाद साधण्याची गरज नाही." त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा एकच पक्ष असल्यामुळं आव्हान तगडं होतं.

बाळासाहेबांची सभा घेणं ही सोपी गोष्ट नव्हती -

माझं बोलणं ऐकून प्रमोदजी म्हणाले कि, "सभा घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. बाळासाहेबांच्या सभा या फार आधीच नियोजित झालेल्या असतात. त्यामुळं मी तुम्हाला खोटं आश्वासन देऊ शकत नाही." प्रमोदजी स्पष्टवक्ते होते, त्यामुळं त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा मी शक्कल लढवली. बाळासाहेब हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये थांबले होते. त्यासमोरच नानांचे कार्यालय सुरु करायचे ठरले होते, त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी बाळासाहेबांना घेऊन या अशी विनंती आम्ही प्रमोद महाजनांना केली आणि त्यांनी ती मान्य केली.

मी आणि विवेक देशपांडे बाळासाहेबांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाबरोबरच हरिभाऊ बागेडे यांच्या प्रचारकार्यालयाचंही उद्घाटन आपण करावं. तेव्हा दिलखुलासपणे ते म्हणाले की, "मी फक्त फीत कापेल आणि लगेच निघेल." आम्ही ते मान्य केलं.

बाळासाहेब येणार आहेत हे समजल्यावर युतीचे विशेषतः शिवसेनेचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने तिथं जमले. त्या सर्वांसाठीच हा आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का होता. उद्घाटनानंतरच्या आपल्या अगदी संक्षिप्त भाषणात त्यांनी युतीची गरज का आहे? हे सगळ्यांना ज्या पद्धतीनं समजून सांगितलं आणि कोणीही यात शहाणपणा केला तर माझ्याशी गाठ आहे ही जरब ज्या पद्धतीनं दिली, ते खरोखरंच वाखाणण्याजोगं होतं.

एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या शब्दाशी बांधील असते तेव्हा ती किती निष्ठेनं तो शब्द पाळते याचं बाळासाहेब हे आदर्श उदाहरण होते. त्यांच्या त्या एका संक्षिप्त सभेनं हरिभाऊ बागडे यांचा विजयाचा मार्ग सुकर होऊन गेला. बाळासाहेबांविषयी माझ्या मनात एक कुतुहल होतं मात्र या घटनेनंतर माझा त्यांच्या विषयीचा आदर खूपच वाढला.

...तेव्हा 440 व्होल्टचा झटका बसल्यासारखी माझी अवस्था झाली -

यानंतर माझ्या राजकीय विचार प्रवाहाला वळण देणारी घटना घडली ती अशी कि, बाळासाहेबांसोबत असताना जेव्हा संभाजीनगरचा उल्लेख झाला तेव्हा, मी त्यांना विचारलेलं कि, "औरंगाबादचं नाव संभाजीनगरच का? त्याऐवजी मूळ नाव खडकेश्वर किंवा खडकी असंही असू शकतं ना? आपला यामागे विचार काय आहे, ते कृपया समजून सांगावं." तेव्हा ते म्हणाले कि, "तू खूप सरळ विचार करतोस. राजकारणात इतकं सरळ राहून चालत नाही. प्रसंगी उद्दामपणाचं उत्तर त्याच पध्दतीनं द्यावं लागतं.

सैतानाला फक्त जोड्याची भाषा समजते आणि औरंगजेब हा सैतान होता. त्यानं आपली सगळी मंदिरं उध्दवस्त केली. तो आपला धर्म बुडवायला निघाला होता. म्हणून औरंगाबादचं नामकरण हे संभाजीनगरच व्हायला हवं. समजलं का तुला?" 440 होल्टचा झटका बसल्यानंतर व्हावी तशी माझी अवस्था झाली आणि मला समजलं कि एखाद्या व्यक्तीचा वैचारिक पराभव करायचा असेल, तर तेवढ्याच ताकदीचा, जालीम आणि तेवढाच उग्र विचार दिल्याशिवाय अशा क्रूर विचारप्रवाहाचं निर्मूलन होऊ शकत नाही.

या शहराचं नाव हे कधीच औरंगाबाद नव्हतं. औरंगाबाद हे नाव जाणीवपूर्वक देण्यात आलं. इथल्या मराठेशाहीच्या पराक्रमाच्या महाराष्ट्रीयन खुणा मिटाव्यात आणि औरंगजेबाचं नाव इथं यावं हा संस्कार त्यांना द्यायचा होता. त्यामुळं हा विचार मुळापासून उखडायचा असेल तर संभाजीनगरच पाहिजे कारण संभाजी महाराजच त्याला पुरून उरले ज्यांनी त्याला ठणकावून सांगितलं होतं कि, "प्राण गेले तरी बेहत्तर पण मी माझा धर्म सोडणार नाही!"

असा नेताच होणं नाही जो... -

आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल आपलं भारतीयत्व टिकवायचं असेल तर असा बाणेदारपणा हाच परकीय विचारांना मुळापासून उखडू देऊ शकतो, हे अत्यंत छान पध्दतीनं त्यांनी मला सांगितलं. बाळासाहेबांनी दिलेला हा मोलाचा विचार आजही माझ्या सोबत आहे आणि माझ्या डोक्यातील काही संकल्पना स्पष्ट झाल्या की एखाद्या वेळी जशास तसे उत्तर देणंही गरजेचं असतं. राजकीय जीवनात याचा मला फार फायदा झाला.

6 डिसेंबर 1992 रोजी तर आम्ही अगदी भारावून गेलो. जेव्हा आम्ही कारसेवक म्हणून तिथं होतो . परंतु त्याचं श्रेय घ्यायला कोणीही तयार नव्हतं, उलट कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली असे सर्वत्र बोलले जात होते. तेव्हा रोखठोक पणे बाळासाहेबांनी सांगितलं की, "जर ती शिवसैनिकांनी पाडली असेल किंवा इतर कोणीही पाडली असेल तरी मला त्याचा सार्थ अभिमान आहे." या एका वाक्यानं बाळासाहेब खूप मोठे झाले आणि खरोखरच त्यांनी ज्या पद्धतीनं ते सांगितलं ते कौतुकास्पद आहे, अभूतपूर्व आहे. असा नेताच होणं नाही जो एखादी गोष्ट अंगावर घेतो, स्वीकारतो!

मी आमदार झाल्यानंतर तर प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मधुकर सरपोतदार विशेषतः जुन्या शिवसेनेतील लोकांकडून बाळासाहेबांचे गुणवैशीष्ट्ये सांगणारे खूप किस्से ऐकले जायचे. बाळासाहेब कसे दिलखुलास होते, ते कसं सामान्य कार्यकर्त्यांवर मनापासून लक्ष ठेवायचे आणि त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या अत्यंत जागरूक असायचे आणि कुठलाही निर्णय स्वतःकडे सर्वाधिकार असले तरी कधी ते एकट्याने घ्यायचे नाहीत. त्यासाठी इतरांशी चर्चा करायचे. ही त्यांची खुबी होती.

सर्वसाधारण माणसांना सुध्दा त्यांनी अत्यंत प्रेमानं प्रेरणा देत खूप मोठ्या पदावर नेलं. ही त्यांची किमया होती. तसेच अत्यंत स्पष्ट विचार व रोखठोक बोलने हे जबरदस्तच आरक्षणाच्या कुबड्या फेकून द्या, हे खणखणीत सांगण्याची हिंमत असणारे व जातपात न बघणारे एकमेव नेते म्हणूनच बाळासाहेब ठाकरे हे थोर होते आणि कायम थोरच राहतील. जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

(लेखक - श्रीकांत जोशी, माजी आमदार, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com