Political News : महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाभोवतीच त्या काळी फिरत होते. मातोश्रीवरून नेमका काय आदेश येणार, तो कसा पाळावा, हे शिवसैनिकांकडूनच शिकावे.
हिंदूत्वाचा झेंडा घेऊन लढाईत उतरलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांनी मात्र मुस्लिमधर्मीयांनादेखील पक्षात सामावून घेतले. नुसतेच पक्षात घेतले नाही तर त्यांना मंत्रिपदही दिले, असे एक नाव म्हणजे तत्कालीन कामगारमंत्री असलेले साबीर शेख. माजी मंत्री साबीर शेख आणि बाळासाहेबांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांच्या काही आठवणी साबीर शेख यांची कन्या अफ्रिन चौगुले आणि शिष्य विश्वास थोरात यांनी जागवल्या.
मूळचे नारायणगावचे असलेले साबीर शेख (Sabir Shaikh) हे कामानिमित्त कल्याण येथे आले अन् त्यानंतर तेथेच स्थायिक झाले. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते शिवसेनेत आले. त्यांनी शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागासह खेडोपाडी नेण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. इतकेच नव्हे, तर मुळात साबीर शेख हे मुस्लिम समाजाचे असले तरी ते ज्ञानेश्वरीचे कीर्तन आणि प्रवचनात रमणारे होते. गड-किल्ले सर करणे हे साबीरभाई यांना फार आवडत होते. हे सर्व हेरून बाळासाहेबांनी साबीरभाईना शिवभक्त ही पदवीदेखील दिली होती, असे विश्वास थोरात यांनी सांगितले.
साबीरभाई आणि मी एकाच गाडीत बसून कल्याण येथून ठाणे येथे असलेल्या बाळासाहेबांच्या सभेला जायला निघालो. मात्र, वाटेतील वाहतूककोंडी आणि छोट्या रस्त्यांमुळे आम्हाला पोहोचायला उशीर होत होता. पण बाळासाहेबांनी तोपर्यंत सभा थांबवली होती. जसे आम्ही पोहोचलो तसे साबीरभाई पळत बाळासाहेबांकडे गेले आणि बाळासाहेबांनी त्यांचे जंगी स्वागत केले, हे मी डोळ्यांनी पाहिल्याचे थोरात सांगत होते. बाळासाहेबांचं आणि साबीरभाईंचं नातं हे राम-लक्ष्मणच्या जोडीसारखं होत.
1995 ला शिवसेनेची सत्ता आली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी मनोहर जोशी (Manohar joshi) आणि साबीर शेख या दोन नावांचा बाळासाहेब विचार करीत होते. त्यावेळी ते हातात कवड्याची माळ घेऊन घरात फेऱ्या मारत होते. मात्र, त्यावेळी मीनाताई ठाकरे बाहेर आल्या अन् म्हणाल्या साबीरला मुख्यमंत्री करणे कठीण जात असेल तर त्यांना एखादे उच्च पद द्या, असे बाळासाहेबांना म्हणाल्या. त्यानंतर बाळासाहेबांनी राज्य मंत्रिमंडळात शेख यांना कामगारमंत्री बनवले. त्यामुळे आमचा एक कामगार कामगारमंत्री झाला, अशा आठवणी थोरात यांनी जागवल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संघटनाबांधणीची सगळी महत्त्वाची काम विश्वासाने बाळासाहेब साबीरभाईकडे देत असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर ते आजारी असताना बाळासाहेब त्यांना जे. जे. हॉस्पिटल येथे पाहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशीदेखील केली होती.
1995 मध्ये शिवसेनेची सत्ता आली होती. त्यावेळी बाबा कॅबिनेटमंत्री झाले. आम्ही सर्व कुटुंब बाळासाहेबांना भेटायला गेलो. त्यावेळी साहेबांनी बाबांना आशीर्वाद दिला. त्यावेळी बाळासाहेबांनी मातोश्री मीनाताई यांना आवाज दिला. मीना बाहेर ये, बघ तुझा साबीर आला आहे. आज तो मंत्री झाला आहे, असे म्हणताच मीनाताई बाहेर आल्या आणि त्यांनी बाबांना ओवाळले. त्यावेळी मी केवळ 13-14 वर्षांची होते. त्यामुळे ती आठवण मी कधीच विसरू शकत नाही, असे साबीर शेख यांची मुलगी अफ्रिन शेख-चौगुले यांनी सांगितले.
(Edited By : Sachin Waghmare)