
Chhagan Bhujbal Politics : "जहां नहीं चैना, वहां नहीं रहना" हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांचं विधान! भुजबळांच्या या विधानानं राष्ट्रवादीत उडालेला धुरळा अजून शांत झालेला नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले छगन भुजबळ राज्याच्या राजकारणातील 'बंडखोर' नेतृत्व! बाळासाहेबांकडून कडवट हिंदुत्वाचे, न्यायासाठी पेटवून उठण्याचे धडे घेऊन शरद पवार यांच्या तालमीत छगन भुजबळांनी चतूर राजकारणाचे धडे गिरवले.
छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांचा शब्द म्हणजे, शरद पवार यांची कृती, असचं काहीसं समीकरण राज्याच्या राजकारणात कधीकाळी होतं. पण, 4 मे 2014 मध्ये, 850 कोटींच्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात दोन वर्ष छगन भुजबळांना जेलवारी करावी लागली. यानंतर छगन भुजबळ हे शरद पवारांपासून दूर गेल्याचं सांगितलं जातं. याच काळात भाजपबरोबर जाण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू होत्या. तसा उल्लेख प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात केला. तसं तटकरेंच्या बोलण्यात यापूर्वी देखील अनेकदा उल्लेख आला होता.
जेलवारीनंतर सावध झालेले छगन भुजबळ नेहमीच सावध राजकारण केले. पण त्यांच्यातील आक्रमक स्वभाव त्यांना शांत बसू देत नाही. तो त्यांना त्यांचं मत तयार करायलाच लावतो. याच दरम्यान, युतीचा घोळ सुरू असतानाच अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 ला सकाळी सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकला. सकाळ-सकाळच्या या ब्रेकिंगमुळं त्या दिवशी सर्व वृत्तपत्रातील बातम्या सकाळीच शिळ्या झाल्या. पुढं हे सरकार साडेतीन दिवसात कोसळलं. अजितदादा अन् फडणवीसांचा हा शपथविधी राज्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम उमटून गेला. पक्ष नेतृत्वाशी बंड करण्याची आणि आमदार खेचून घेऊन जाण्याची अजितदादांची ही ताकद छगन भुजबळसारख्या नेत्याच्या नजरेतून सुटली नाही.
अजितदादांनी शरद पवार(Sharad Pawar) यांची साथ सोडून 2 जुलै 2023 मध्ये भाजपबरोबर गेले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य छगन भुजबळ यांनी अजितदादांना साथ दिली. अजितदादांनी हा निर्णय का घेतला, हे सांगण्याची पहिली हिंमत कुणी दाखवली असेल, तर ती छगन भुजबळांनी केली. हा म्हातारा सिंह, देशाच्या राजकारणात भल्या भल्यांना गार करणाऱ्या 'वस्तादा'समोर म्हणजे शरद पवारांसमोर उभा राहिला. अजितदादांची भूमिका कशी बरोबर आहे, हे जाहीरपणे भाषणातून सांगितले. त्यावेळी छगन भुजबळ यांच्यात शिवसैनिक आणि शरद पवार यांच्या तालमीतील मुरबी राजकारणी, या दोघाचं दर्शन झालं. भुजबळांना यामुळं शरद पवार यांच्या रोषाला समोरं जावं लागलं. अजितदादाच्या बंडाला साथ दिलेल्या भुजबळांच्या बालेकिल्ल्यात, येवल्यात त्यावेळी शरद पवार यांनी पहिली सभा घेतली.
महायुतीच्या सत्तेत राहून राजकीय वाटचाल करताना लोकसभा झाली. तत्पूर्वी राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला होता. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबरा धक्का बसला होता. महायुतीनं या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत भरून काढला. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना(Shivsena) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीनं 230 जागांवर यश मिळवलं. भाजप 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. महायुती प्रचंड बहुमतानं सत्तेत आल्यानं तिन्ही पक्षाची अडचण झाली. मंत्रिमंडळाचा विस्तार, खाते वाटप, पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या, त्यावरील मॉनिटरिंग, असे सर्वच प्रश्न आता निर्माण झालेत. महायुतीत असलेली शिवसेना अन् राष्ट्रवादीनं भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. या दोन्ही पक्षांत नाराजींची संख्या सर्वाधिक आहे. तसं पाहिलं गेल्यास महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेक्युलर विचारसरणीवर चालणारी संघटना आहे.
असा हा राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्ष कट्टर हिंदुत्वाच्या मुद्यावर संघटन करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेबरोबर महायुतीत सत्तेत आहे. याच पक्ष संघटनेत राहून ज्यांनी महात्मा फुलेंचा समतेचा विचारावर समाजकारण आणि राजकारण केले, अशा छगन भुजबळांना अजितदादांनी महायुतीच्या मंत्रिमंडळात डावललं. सहाजिकच त्याचे पडसाद उमटले. छगन भुजबळ यांच्यातील यामुळं शिवसैनिक जागा झाला. न्याय मागू लागला. ताकद दाखवू लागला. अजितदादांना थेट ललकारू लागला. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजितदादांना ज्या प्रश्नांची उत्तरं देता येत नव्हती, त्याकाळात छगन भुजबळ 'वस्तादां'समोर, म्हणजेच शरद पवारांसमोर उभे होते. महायुतीवर मनोज जरांगे यांच्या रुपानं मराठा आरक्षणाचं आंदोलनाच्या वादळाला, छगन भुजबळ ओबीसी नेते म्हणून खंबीरपणानं सामोरं गेले. अजूनही आरक्षणावरून छगन भुजबळ अन् मनोज जरांगे यांचा वाद उफाळतो. असं असताना महायुतीच्या यशावेळी छगन भुजबळ यांना बाजूला सावरलं गेलं. हा त्यांचा एकप्रकारे अपमानच होता.
साहजिक छगन भुजबळांची ही नाराजी "जहां नहीं चैना, वहां नहीं रहना", या प्रतिक्रियेनं बाहेर आली. भुजबळांचा पहिला प्रहार थेट अजितदादांवर होता. अजितदादांसह राष्ट्रवादीमधील पहिल्या फळीतील नेते देखील छगन भुजबळांच्या या नाराजीचा आजही 'सामना' करू शकलेले नाहीत. या काळात भुजबळ नाराजी जाहीर करत असताना, अजितदादांनी मौन बाळगणं पसंत केलं. अजितदादांनी भुजबळांना थेट डिवचणं टाळलं. काही प्रतिक्रिया दिल्या. पण त्या सावरणाऱ्या होत्या. एकप्रकारे अजितदादांना भुजबळांची नाराजी परवडणारी नाही, हे लक्षातच आलं होतं.
अजितदादांच्या प्रतिक्रिया भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन रोखल्या. यातून भुजबळांनी एकप्रकारे अजितदादांसमोर आव्हानच ठेवलं. फडणवीसांच्या भेटीनंतर पुढं भुजबळांनी वस्ताद, शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे भुजबळांच्या या उघड चालीनं अजितदादांसह राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेते पुरते 'जायबंद' झाले. अधिकच सावध झाले. या काळात छगन भुजबळांना 'सबुरी'नं घेण्याचं राष्ट्रवादीनं ठरवलं. 'वेळ' सर्व प्रश्नांवर उत्तरं असतं, असंच काहीसं धोरण छगन भुजबळांबाबत राष्ट्रवादीनं आखलं. याकाळात अजितदादा भुजबळांपासून दूर राहिले.
छगन भुजबळ मात्र थांबले नाहीत, तर राष्ट्रीय पातळीवर ओबीसीच्या नेतृत्वासाठी दौरे करणार असल्याचं जाहीर केलं. यासाठी समता परिषदेच्या 'अलर्ट मोड'वर आणलं. राज्यात समता परिषदेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. बैठकांचा जोर वाढवला आहे. ओबीसींची जुळवाजुळव सुरू केली आहे. यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळी भूमिकेची चाचपणी केली जात आहे. समता परिषदेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आता खासगीत ही भाजपच्या दिशेनं वाटचाल असल्याचं सांगत आहेत. छगन भुजबळांच्या समता परिषदेची ही भूमिका राष्ट्रवादीला एकप्रकारे इशाराच आहे. समता परिषदेच्या या जोरबैठका राष्ट्रवादीच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. त्याची प्रचिती शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव संकल्प शिबिरात उमटलेली दिसते.
विधानसभेतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं शिर्डीत दोन दिवसांचे नवसंकल्प घेतलं. हे शिबिर म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढील पाच वर्षे सत्तेत राहून पक्षसंघटना वाढीचं दिव्य, कसं पेचालयचं, याच्यासाठी होतं. मात्र शिबिराच्या केंद्रस्थानी छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे राहिले. नाराज असलेले पक्षाचे संस्थापक सदस्य छगन भुजबळ शिबिरात सहभागी होणार की, नाही होणार, याचीच सर्वाधिक चर्चा होती. भुजबळ यांची नाराजी पक्षाला सत्तेच्या वाटचालीत परवडणारी नव्हती. त्यामुळे भुजबळांना शिबिरात सहभागी करून घेण्याचं दिव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांना पेलावं लागलं. अजितदादांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ते पार पाडलं. पण, यातून राष्ट्रवादीनं काय साध्य केलं, हे आगामी काळात समजेल. परंतु छगन भुजबळांनी शिबिराला हजेरी लावून 'युद्धा'बरोबरच आपण 'तह', देखील जिंकू शकतो, हे साधून नेलं.
छगन भुजबळांची शिबिरातील हजेरी ही केंद्रस्थानी ठरली. त्यांनी शिबिराला हजेरी लावून पक्षात आजही आपलं स्थान मजबूत आहे का? याची चाचपणी केली. शिबिरस्थळी त्यांची एन्ट्री एखाद्या सिंहासारखी ठरले. ते शिबिरात येताच सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. परंतु, शिबिराच्या प्रवेशद्वारावरच 'मी पक्षासाठी आलो आहे, कोणा व्यक्तीसाठी नाही', असे सांगून अजितदादांपेक्षा आपल्याला पक्षावर प्रेम असल्याचे संदेश दिला. छगन भुजबळांनी ही प्रतिक्रिया देत, आगामी काळात राष्ट्रवादीत राहिल्यास, ते फक्त पक्षहितासाठी राहील, असेच हे काहीसे संकेत आहेत.
तसंच भुजबळांनी शिबिरात सहभागी होताना, पुढच्या राजकीय चालींबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतलेली दिसते. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होणार, अशी त्यांनी कोणतीही कृती केली नाही. परिषदेच्या संघटनात्मक कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली. छगन भुजबळ शिबिरात सहभागी झाले, तरी ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत नव्हते. त्यांच्या या कृतीनं विरोधक दुखणार नाही, याची आपोआप खबरदारी घेतली गेली. छगन भुजबळांचा हा 'तह' आगामी अनेक राजकीय फायद्याची दारं उघडणार किंवा मोठी राजकीय मांडणीचा संकेत, तर नाही ना!
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.