Congress Party Challenges : काँग्रेसला घरातलं सोसेना, सरकारला घेरण्यासाठी मुद्यांची शोधाशोध

Congress internal conflicts 2025 : महाविकास आघाडीचे सर्वच नेते लाडक्या बहिणींच्या योजनेवर टीका करत होते. हे सत्तेवर आले तर माझे पैसे बंद होतील, म्हणून घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी आपली ताकद दाखवून दिली.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

प्रमोद बोडके

Congress News : काँग्रेस आता नव्या राजकीय मुद्द्यांच्या शोधात आहे. मित्रपक्ष दूर जाण्याची भीती, लाडकी बहीण योजनेच्या छाननीचा मुद्दा, सोयाबीन उत्पादकांना अपेक्षित दर नसल्याने निर्माण झालेली अस्वस्थता या मुद्द्यांवर आता सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेस करत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे सर्वच नेते लाडक्या बहिणींच्या योजनेवर टीका करत होते. हे सत्तेवर आले तर माझे पैसे बंद होतील, म्हणून घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी आपली ताकद दाखवून दिली. निवडणुकीच्या काळात राज्यातील शेतकरी कापूस अन्‌ सोयाबीनच्या चिंतेत होता.

तेव्हा काँग्रेस नेत्यांच्या मुखात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अन्‌ उद्योजक गौतम अदानी यांच्या मैत्रीची भाषा होती. आता राज्यातील महायुती सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या काही अर्जांची पडताळणी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे संकट वाढू शकते. दुसरीकडे बारदाना संपल्याने सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे. सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अन्‌ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्याची भीती असल्याने, सरकारविरोधात रस्त्यावर येऊन लढण्यासाठी लाडकी बहीण अन् सोयाबीन उत्पादक काँग्रेसला खुणावू लागल्याचे दिसत आहे.

बहुमत मिळाले पण मुख्यमंत्री ठरत नव्हता, मुख्यमंत्री ठरला परंतु मंत्रिमंडळ ठरत नव्हते, मंत्रिमंडळ ठरले परंतु खातेवाटप होत नव्हते, खातेवाटप झाले परंतु पालकमंत्री ठरेनात, अशा विचित्र स्थितीत सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी अडकल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाला काम करण्याची मोठी संधी दिसत आहे. ही संधी साधण्यासाठी सध्या काँग्रेस सज्ज दिसत नाही.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे (Congress) खासदार आणि त्या त्या भागातील महाविकास आघाडीचे विशेषतः काँग्रेसचे उमेदवार / आमदार यांच्यात योग्य तो समन्वय व संवाद दिसत नाही. मी तुमच्या विजयासाठी एवढे झटलो, तुम्ही माझ्या विजयासाठी गप्प का होतात? असाच प्रश्‍न विधानसभेचे बहुतांश पराभूत उमेदवार खासदारांना विचारताना दिसत आहेत. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सुरुवातीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी उघड भूमिका घेतली.

Congress
Congress Politics : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटलांचा नकार, ओबीसी फायरब्रँड नेत्याला मिळणार संधी?

आता मोहोळचे (जि. सोलापूर) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे व माढाचे (जि. सोलापूर) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील खासदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेवर जाहीरपणे संशय व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत राज्यभरात जिल्हा व तालुका पातळीवर एकमेकांमध्ये खरचं संवादाचे आणि सहकार्याचे वातावरण आहे का?, याचा लेखा-जोखा काँग्रेसच्या नेत्यांनी घेण्याची आवश्‍यकता आहे.

आदेश येईना, निर्णय होईना

विधिमंडळ पक्ष नेता, गट नेता व प्रतोद ठरवण्याचे सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्याचा ठराव २७ नोव्हेंबरला पाठविला आहे. महिना झाला तरीही दिल्लीचा आदेश अजूनही महाराष्ट्र काँग्रेसला (Congress) आलेला नाही. या ठरावाला काँग्रेसच्या सर्वच दिग्गज नेत्यांची किमान कागदोपत्री तरी संमती दर्शविली आहे. तरी देखील दिल्ली काँग्रेसने अद्यापही महाराष्ट्र काँग्रेसला काहीच आदेश दिलेला नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पडलेला काँग्रेसमधील दुखवटा संपणार तरी कधी?, अशी चर्चा आता खासगीत रंगू लागली आहे. मार्च-एप्रिलमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, त्या दृष्टीने तयारीला लागण्याचा आदेश भाजपने केव्हाच तालुका, गाव पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविला आहे. त्यांची संघटना कामाला लागली आहे.

Congress
Rohit Pawar News : फडणवीस आणि दादांनी गुळगुळीत, मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा..! शरद पवारांच्या नेत्याचा सरकारवर हल्लाबोल

जुनं मोडलं, नवं नाही घडलं?

महाराष्ट्रातील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रातील एनएसयूआयनंतर महिला काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय समित्या तातडीने विसर्जित केल्या आहेत. महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी संध्या सव्वालाखे यांच्या सोबत विधानसभा क्षेत्रनिहाय महिला पदाधिकारी नियुक्त केले आहेत.

संभाजीनगरसाठी दीपाली मिसाळ, ठाण्यासाठी आयशा खान, अमरावतीसाठी डॉ. अंजली ठाकरे, रामटेकसाठी सुनीता गावंडे, गडचिरोलीसाठी सीमा सहारे, नाशिकसाठी स्वाती जाधव, रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी साक्षी वंजारी, कल्याणसाठी सीमा आहुजा, साताऱ्यासाठी सुषमा राजेघोरपडे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसने एनएसयूआय व महिला कार्यकारिणी मोडली, नव्याने काय घडविले? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. युवकची जबाबदारी कुणाल राऊत यांच्यावर आहे, फादर बॉडीच शांत असल्याने काँग्रेसचा युवकही सध्या शांतच दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com