
Mumbai News : काँग्रेसने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदाची निवड करताना पहिल्यांदाच धक्कातंत्र अवलंबले आहे. यापूर्वी निवड करताना चर्चेतील चेहऱ्यांना संधी देण्याचा पायंडा पाडण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्याने काँग्रेस खडबडून जागी झाली आहे. त्यामुळेच त्यांनी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख या बड्या चेहऱ्यांना संधी दिली नाही. त्याऐवजी काँग्रेसने 'विक पॉइंट' वरच घाव घालत तळागळातल्या कार्यकर्ते असलेले व संपूर्ण संघटनात्मक जबाबदारी संभाळणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना थेट प्रदेशाध्यक्षच बनवलं.
काँग्रेसने नाना पटोले (Nana Patole) यांच्या जागी कारकिर्दीत प्रथमच प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करताना सोशल इंजिनीअरिंगचा वापर करत ओबीसी चेहऱ्याकडे राज्याच्या राजकारणाची धुरा सोपवली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे शेतकरी कुटूंबातून आलेले व्यक्तिमहत्व आहे. सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात ते सुरुवातीपासून कार्यरत होते. महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले होते. सपकाळ यांची गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress) संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. संघटनात्मक पातळीवरील त्यांना मोठा अनुभव आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसच्या संघटनात्मक वाढीसाठी हा अनुभव महत्वपूर्ण ठरणार आहे.
त्यासोबतच मधल्या काळात त्यांनी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयुआय) च्या माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रीय झाले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी. कॉम व बी. पी. एड पदवी घेतली आहे. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती. तसेच 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
आमदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी ही त्यांनी पेलली आहे. त्यामुळे हा सर्व तळागळातल्या कार्यकर्त्याची माहिती असलेल्या नेत्याकडे काँग्रेसच्या वाढीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे युवा सदस्य वाढीसाठी त्यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी सपकाळ यांनी मोठे कार्य केले आहे. त्याचा फायदा त्यांना होणार आहे. त्यासोबतच काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुध्दा त्यांनी काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. आतापर्यंत पक्षाने सोपविलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. त्यामुळे येत्या काळात त्याचा मोठा फायदा पक्षाला होणार आहे.
यासोबतच सपकाळ यांनी विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापन केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत. त्यामुळे उमेदवार निवडीचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्या या अनुभवाचा मोठा फायदा काँग्रेसला होणार आहे. विधिमंडळ पातळीवरही अभ्यासू, आक्रमक आमदार म्हणून ते परिचित आहेत. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसला त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.