महाराष्ट्रात 20 जूनच्या मध्यरात्रीपासून राजकीय भूकंपाचे धक्के बसले आहेत. सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार फुटले. विरोधी पक्षाचे आमदार फुटणे यात विशेष काही नाही. पण एकमुखी नेतृत्व असलेल्या शिवसेना सोडून आमदारांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामागे जावेसे वाटते, हे मोठेच आश्चर्यकारक आहे. बरे शिंदे हे गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांच्याप्रमाणे `मास लिडर` नाहीत. त्यांच्याकडे आकर्षक वक्तृत्व नाही. विशिष्ट समाज त्यांच्यामागे नाही. महाराष्ट्रभर त्यांचे समर्थक आहेत, असेही आतापर्यंत माहीत नव्हते. ठाणे शहरात जम बसविण्यापर्यंतच त्यांची ख्याती होती. रिक्षाचालक असलेला एक सामान्य कार्यकर्ता राज्याचा मंत्री होतो, हे त्यांचे यश थक्क करावे असेच आहे. पण भुजबळ, नारायण राणे यांच्याप्रमाणे त्यांना वलय नव्हते. तरीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. नुसते आव्हान दिले नाही तर 55 पैकी 40 आमदार आपल्या सोबत ठेवले आहेत. मुंडे, राणे आणि भुजबळ यांच्याही मागे इतक्या आमदारांचे बळ कधी नव्हते. महाराष्ट्रात अनेक राजकीय बंड झाली; पण दोन तृतीयांश आमदार फोडावेत, अशी ताकद आतापर्यंत कोणी दाखवली नव्हती. ती किमया शिंदे यांना कशी काय साधली? यात शिवसेना नेतृत्वाचा दोष किती, शिंदेंचे कौशल्य किती, हे शोधायला हवे. (Eknath Shinde News)
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे आमदार नाराज आहेत, हे सरकार स्थापनेनंतर पहिल्या काही महिन्यांतच कळू लागले होते. सुरवातीचे काही दिवस कौतुकाचे गेल्यानंतर ही खदखद पुढे येऊ लागली. कारण ज्यांच्या विरोधात आतापर्यंत लढलो त्यांच्याशी खुर्चीला खुर्ची लावून बसणे, हे स्थानिक पातळीवर अवघड होऊ लागले. मग काही महिन्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी हे पक्षाच्या मेळाव्यात तसे जाहीरपणे बोलवून दाखवत होते. पण कोरोनामुळे या आमदारांच्या नाराजीवर मार्ग निघाला नाही. त्यांच्या या वेदनेची दखल कोणी घ्यावी हा प्रश्नच होता. कारण ठाकरे हे सहजपणे उपलब्ध होत नव्हते. आदित्य ठाकरेंना त्यांच्या मर्यादा होत्या. मग ज्येष्ठ मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना आमदार मंडळी भेटू लागली. आमदारांची कामे त्यांच्या प्रयत्नातून मार्गी लागू लागली. त्यामुळे आमदारांशी त्यांचा स्नेह जुळला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सेनेची इतर मंत्री मात्र या आमदारांना इतके महत्व देत नव्हते. त्यामुळे शिंदेंनीही यातून आपले नेटवर्क बांधले.
विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आमदारांना सहजपणे भेटत होते. विलासराव तर सामान्य माणसाने केलेला मोबाईलवरील प्रत्येक फोन स्वतः उचलत होते. फडणवीस फोन घेत नसत पण ते एसएमएसद्वारे रात्री उशिरा का होईना प्रत्युत्तर द्यायचे. ठाकरे यांच्याशी संपर्काची आमदारांना काही सोय नव्हती. याउलट अजित पवार हे आमदारांना सहजपणे भेटायचे. त्यामुळे सेनेतील आमदारांना शिंदे यांचाच आधार वाटू लागला.
फडणविसांविषयी सेना आमदारांना सहानुभूती
शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यानंतर सेना आमदारांनी पाहिलेली अनेक स्वप्ने भंगली. या दोन्ही पक्षांची युती असताना सेनेचे अनेक आमदार फडणवीस यांच्याशी संपर्कात होते. काही जणांना तर तुम्ही शिवसेनेचे तिकिट घ्या, असा सल्लाही फडणवीसांना दिला होता. सेनेच्या काही आमदारांचा पराभव भाजपने केला असला तरी फडणविसांनी सेनेच्या अनेक आमदारांनी निवडणुकीत निधी पुरविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा आमदारांना सेनेशी बंड करून भाजपसोबत जाण्यात काहीच अडचण वाटत नाही.
मदार नाराज आहेत तर शिवसेनेचे नेतृत्व काय करत होते, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. बंडखोरांच्या तावडीतून सुटलेल्या कैलास पाटील आणि नितीन देशमुख या दोन आमदारांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर काही बाबी स्पष्ट होतात. एकनाथ शिंदे हे काही आमदार घेऊन निघाल्याची चर्चा वेळीच कानावर पडली होती. त्यांना थांबविण्यासाठी ठाकरे यांनी कोणते प्रयत्न केले, याचा काही उलगडा झाला नाही. शिंदे यांच्यासोबत सुरवातीला फक्त 18 आमदार होते. हा आकडा 46 होईपर्यंत सेनेचे नेते हातावर हात धरून का बसले, याचेही उत्तर मिळत नाही. राज्यात 2019 मध्ये राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केले होते. त्यावेळी अजितदादांसोबत गेलेले आमदार परत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबिले होते. आता शिंदेंना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना रोखण्यासाठी सेनेकडे कोणताच सक्षम नेता राहिला नाही का? सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दादर, कुर्ला, वांद्रे येथील सेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार बंडखोरांना सहभागी होतात आणि ते सहजपणे गुवाहटीला पोहोचतात तरी शिवसेनेचे नेते त्यांना अडवत नव्हते, या मागचे कारण काय?
शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश आमदार झाल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्याची प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत उशीर झाला होता. सारेच आमदार ईडीच्या दबावामुळे गेलेले नाहीत. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आमदारांना ईडीच्या कारवाईची भीती आहे. काहींना राष्ट्रवादी काॅग्रेसचा किंवा काॅंग्रेसचा स्थानिक पातळीवर त्रास असू शकतो. पण 55 पैकी 40 जण नाराज होते तरी त्याची कुणकूण ठाकरेंना कशी नव्हती, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. बंडखोर आमदारांनी आपला नेता म्हणून ज्या शिंदे यांना निवडले आहे. शिंदे यांच्या जिवावर पुढील निवडणूक आपण जिंकूच अशी खात्री या आमदारांना नसावी. तरी त्यांनी ठाकरेऐवजी आपला नेता म्हणून शिंदेंना पसंती द्यावी, हे विशेष. या आमदारांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी असावीच पण त्यापेक्षा युवा नेतृत्व म्हणून ज्यांना थोपविण्यात येत आहे, त्यांच्याविषयी देखील जास्त तक्रार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे सिनिअर ठाकरेंना हे सांगायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला असावा. तक्रारी करण्याऐवजी आपणच आपला मार्ग वेगळा शोधावा, असे या आमदारांनी ठरविले आणि शिवबंधन तोडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.