मुंबई : भाडेतत्वावर चालवायला देण्यासाठी राज्यात आजही ११ साखर कारखाने शिल्लक आहेत. ज्यांना कोणाला कारखाना चालविण्याची हौस असेल त्यांनी आता पुढे यावे. ‘प्रसाद लाड (prasad Lad) तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ते सांगा,’ असे म्हणून फिरकी घेत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनाही सोडले नाही. ‘जानकरसाहेब, दुसरे एक मित्र जवळ आल्यामुळे सध्या तुमच्याकडे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे तुम्हाला एखादा साखर कारखाना चालवायला घ्यायचा असेल तर बघा,’ असे म्हणत जानकरांच्या सद्यस्थितीवर अजितदादांनी बोट ठेवले. (Deputy Chief Minister Ajit Pawar's appeal to Mahadev Jankar to run a sugar factory)
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सभागृहात राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची विक्री आणि जिल्हा बॅंकांमधील भ्रष्टाचार याबाबत जोरदार टीकास्त्र सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आरोपाला आज विधान परिषदेत उत्तर दिले. राज्यातील ऊस शिल्लक राहू नये म्हणून जे कोणी इच्छूक आहेत, त्यांनी पुढे येऊन कारखाने चालवायला घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. त्यावेळी त्यांनी भाजप व त्यांच्या मित्रपक्षालाही चिमटे काढले.
अजित पवार म्हणाले की, राज्यातील सहकारी कारखानेजाणीवपूर्वक कोणीही विक्रीला काढलेले नाहीत. तशी परिस्थिती निर्माण झाली. आजदेखील राज्यात भाडेतत्वावर चालवायाला देण्यासाठी ११ साखर कारखाने शिल्लक आहेत, ज्याला कोणाला पाहिजेत, त्यांनी पुढे येऊन ते चालू करावेत. याचवेळी अजित पवार यांनी आमदार लाड आणि जानकर यांना आवाहन केले. ते करताना त्यांनी महादेव जानकर यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले जानकर सध्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे सध्या काहीसे बाजूला गेल्याचे दिसत आहे. तोच धागा पकडून पवारांनी जानकर यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला.
काहींनी कारखाने विकत घेतले, पण ते सध्या बंद आहेत. बंद कारखाने सुरू करण्यासाठी आम्हीही प्रयत्न केले. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील येथे आहेत, त्यांना विचारा. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी आपण किती वेळा प्रयत्न केले. अगदी मनापासून प्रयत्न केले. मदत करत असताना कधीही दुजाभाव केलेला नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यापुढे राज्यात साखर कारखान्याना परवानगी नाही
आगामी काळात राज्यात सहकारी साखर कारखान्याला परवानगी देण्यात येणार नाही. ज्याला कोणाला कारखाना काढायचा आहे, त्यांनी तो खासगी पद्धतीने काढून चालवावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर यापुढे साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी द्यायची नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यांची ती भूमिका पचवायला आम्हा थोडं अवघड गेलं, अशी कबुलीही अजितदादांनी विधान परिषदेत बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.