
महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, असे मी म्हणेन. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शहरीकरण, गुंतवणूक, पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, कृषी उद्योग आणि आरोग्य यासारख्या सर्व क्षेत्रांत उत्तम प्रगती केली आहे. कार्यकुशलता, प्रशासनावरची पकड आणि जनतेशी असलेले नाते हे आजच्या राजकारणातील वेगळे उदाहरण आहे.
वयाच्या 22 व्या वर्षी नगरसेवक, 27 व्या वर्षी महापौर आणि त्यानंतर आमदार, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, काही काळ उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही कारकीर्द आहे. कारकिर्दीतील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली. फडणवीस हे भाजपच्या परंपरेतून आलेले असे नेतृत्व आहे, ज्याला संघटनात्मक बांधिलकी आणि लोकाभिमुख काम यांचा उत्तम समन्वय साधणे जमते.
एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते अफाट क्षमता असलेले नेतृत्व हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि पुढे महापालिका व विधिमंडळातील प्रतिनिधीत्व, आमदार म्हणून असो वा, मुख्यमंत्री म्हणून असो, त्यांच्यातील कार्यकर्ता अन् सेवाभाव कायम अग्रस्थानी राहिलेला आहे, हे कार्यकर्तेपणच त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे.
फडणवीस यांचे राजकारण कुठल्याही सत्ताकांक्षेवर नव्हे, तर मूल्याधिष्टित सेवाभावावर आधारित आहे. गेल्या दशकापासून महाराष्ट्रात भाजपचा संघटनात्मक विस्तार फार मजबुतीने आणि वेगाने होतोय. त्यातील मोठे श्रेय फडणवीस यांना दिले पाहिजे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांच्या मनोबलातील वृद्धी आणि जनतेशी संवाद यावर त्यांचा नेहमी भर असतो. त्यांचा अनुभव, स्पष्टता आणि समजूतदारपणा हा पक्षाच्या दृष्टीने एक मोठे भांडवल आहे. नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. त्यासाठी अलीकडेच नागपुरात बैठक झाली. आम्ही दोघांनी इतर सहकाऱ्यांसह या बैठकीत भाग घेऊन राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर अनेक निर्णय घेतले.
देवेंद्र यांच्याशी माझा संबंध केवळ पक्षाच्या चौकटीतला नाही, आपुलकीचा, विश्वासाचा आणि सहकार्याचा आहे. त्याला कौटुंबिक ऋणानुबंधांचे स्वरूपही आहेच. कारण देवेंद्रजींचे वडील (स्व.) गंगाधरराव फडणवीस यांच्याशी माझा अत्यंत आत्मीय संबंध होता. आमचा स्नेह अकृत्रिम होता आणि देवेंद्रजी यांनीही तशाच प्रकारचे कौटुंबिक संबंध कायम ठेवले आहेत. गंगाधरराव फडणवीस हे आमचे नेते आणि मार्गदर्शक होते. गंगाधररावांनी कधीही आपल्या मुलाला राजकारणात आणा, असा आग्रह धरला नाही.
एकदा पक्षांतर्गत चर्चा सुरू असताना आम्ही काही प्रमुख लोकांनी देवेंद्रजींना नगरसेवक म्हणून निवडणूक लढवायला सांगण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ते 22-23 वर्षांचे होते. हा तरुण अत्यंत धडपडा आहे आणि त्यांच्या राजकारण-समाजकारणाला आता पाठबळ व दिशा मिळाली तर त्यातून मोठे नेतृत्व आकाराला येऊ शकते, हा आमचा विश्वास होता. आज त्या विश्वासाचे फळ आपण पाहतो आहोत आणि आम्हा सर्वांना त्या निर्णयाचा सार्थ आनंद आहे.
राजकारण हे केवळ पदांसाठी नसते, तर ते समाजाच्या कल्याणासाठी असते, ही विचारधारा ज्यांच्या अंगी पूर्णपणे बिंबलेली आहे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. फडणवीस यांचा प्रवास मी अगदी जवळून पाहिला आहे. नागपूर शहर, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून भरपूर काम केले, अजूनही करीत आहोत. फडणवीस यांच्या कार्यक्षमतेची, सातत्याची आणि ध्येयवादी भूमिकेची प्रचिती मी अनेक वेळा घेतली आहे.
नागपूरच्या विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून अनेक महत्त्वाकांक्षी योजनांसाठी काम केले. मिहान प्रकल्प, एम्स, आयआयएम, मेट्रो रेल्वे, आयटी हब, नवीन रस्ते आणि उड्डाण पूल अशा अनेक प्रकल्पांमध्ये आम्ही एकत्र होतो व आहोत. एवढ्या व्यापातसुद्धा त्यांनी त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही, याचे मला कौतुक वाटते. या भागातील विविध समस्यांवर तोडगे काढण्यासाठी त्यांनी केवळ निधी मिळवूनच नव्हे, तर काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा केला आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण केला.
2014 ते 2019 ही पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने राज्य चालवले. आता त्यांची दुसरी कारकीर्द सुरू आहे. जलयुक्त शिवार योजना, पोलिस भरतीतील पारदर्शकता, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, महिलांसाठी योजना, महाराष्ट्रात गुतवणूक वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न व निर्णय फार प्रभावी होते व आहेत. अटल सेतू, हार्बर रोड, समृद्धी महामार्ग यासारख्या भव्य योजनांचे प्रत्यक्ष स्वरूपात कार्यान्वयन हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे उदाहरण आहे.
समृद्धी महामार्गाचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना अनेक अडथळे आले. शासकीय प्रक्रिया, शेतकऱ्यांचे मुद्दे, भूसपादनातील अडचणी अशा सर्व गोष्टी त्यांनी कौशल्याने हाताळल्या, मुंबईपासून नागपूरपर्यंतचा प्रवास 8 ते 9 तासांत पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरलेला हा क्रांतिकारी प्रकल्प एका अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय आहे आणि फडणवीस हे त्याचे लेखक आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशोदेशी दौरे करून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली. महाराष्ट्राच्या विकास योजनांना आंतरराष्ट्रीय उंची दिली. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. राज्यात इलेक्ट्रिक व्हेईकलचे धोरण आणले. महिला सक्षमीकरण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान
देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी केवळ पक्षातील किंवा राजकारणातील सहकारी नाहीत, तर ते माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी त्यांना राजकारणात आणले, तेव्हा माझी जबाबदारी त्यांना पाठबळ देण्याची होती, ते आम्ही दिले आणि त्याचे फळ त्यांच्या रूपाने निर्माण झालेल्या नेतृत्वात दिसत आहे. आज जेव्हा ते महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत, तेव्हा मला त्यांच्या यशाचा अभिमान वाटतो. फडणवीस यांची ज्या पदावर निवड झाली, त्या पदाचे महत्त्व त्यांनी आपल्या कामांतून वाढविले.
महापौर असताना त्यांनी नागपूरच्या शहर विकासात लक्ष घातले. आमदार असताना मतदारसंघासह राज्यातील जनतेच्या अनेक प्रश्नांवर ते खंबीरपणे उभे राहिले. मुख्यमंत्री असताना त्यांनी शिस्तबद्ध, पारदर्शक आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिले. आजही त्यांच्या प्रशासकीय कुशलतेमुळे महाराष्ट्राची विकासातील घोडदौड सुरू आहेच. त्यांच्या मेहनतीचा, चिकाटीचा आणि कार्यकुशलतेचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांच्यात नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि सामाजिक भान आहे. माझ्या दृष्टिकोनातून सांगायचे झाले, तर देवेंद्रजी यांच्यासारखा धडपड्या, कर्तबगार आणि निष्ठावान नेता हा महाराष्ट्रासाठी एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे भविष्यातील राजकीय आणि सामाजिक योगदान आणखी समृद्ध होवो, हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.