
ते हाडाचे कम्युनिस्ट होते. भांडवलशाही पद्धतीला त्यांचा प्रखर विरोध होता. असं सांगितलं जातं, की नियती त्यांच्या बाजूनं असती, त्यांच्या पक्षानं दुराग्रही भूमिका घेतली नसती तर १९९६ मध्ये ते देशाचे पतंप्रधान झाले असते आणि कदाचित आज वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. अनेक पक्षांच्या आघाडीच्या सरकारचं नेतृत्व करायचं नाही, या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दुराग्रही भूमिकेमुळं त्यांची पंतप्रधान बनण्याची संधी हुकली आणि त्यामुळं देशातील डाव्या चळवळीची हानी झाली. होय, बरोबर ओळखलात, ज्योती बसू! पश्चिम बंगालचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले महान कम्युनिस्ट नेते ज्योती बसू.
सलग 23 वर्षे पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या ज्योती बसू यांचा जन्म 8 जुलै 1914 रोजी आता बांगलादेशात असलेल्या त्यावेळच्या पूर्व बंगालमध्ये एका मध्यमवर्गीय उच्चशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. निशिकांत बसू हे प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक होते. आता बांगलादेशात असलेल्या ढाका जिल्ह्यातील बार्दी गावात ते वैद्यकीय व्यवसाय करत असत. ज्योती बसू यांच्या मातुःश्री हेमलता या गृहिणी होत्या. ज्योती बसू यांचं नाव ज्योती किरण बसू असं होतं, ते ज्योती बसू असं छोटं करण्यात आलं. कोलकात्याच्या धरमतल्ला येथील लोरेटो स्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण झालं. सेंट झेवियर्स स्कूलमध्येही त्यांच महाविद्यालयीन शिक्षण झालं. त्यापूर्वी हिंदू कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी साहित्यात बीए केलं. उच्च शिक्षणासाठी 1935 मध्ये ते इंग्लंडला गेले.
ज्योती बसू 1940 मध्ये मिडल टेंपलमधून बॅरिस्टर झाले. त्याचवर्षी ते भारतात परतले. इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेत असताना तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या ते संपर्कात आले. त्यांच्यावर तेथील प्रख्यात कम्युनिस्ट नेते, विचारवंत आणि लेखक रजनी पाम दत्त यांचा प्रभाव पडला. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर ज्योती बसू यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. भारतीय कम्यनिस्ट पक्षानं त्यांना 1944 मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी दिली. बी.एन. रेल्वे कर्मचारी संघटना आणि बी. डी. रेल रोड कर्मचारी संघटनेचं विलीनीकरण झाल्यानंतर बसू त्या संघटनेचे सरचिटणीस बनले.
हळहळू त्यांचा कल राजकारणाकडं झुकू लागला होता. त्यातूनच ते 1930 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बनले होते. त्यांची राजकीय समज अत्यंत प्रगल्भ होती. त्यामुळंच ते एकेक पायरी चढत गेले, लोकांच्या समस्यांसाठी प्रभावी आंदोलनं केल्यामुळं त्यांना यश मिळत गेलं. लोकांच्या समस्यांना त्यांनी आवाज मिळवून दिला. त्यामुळं राजकारणात त्यांची उंचीही वाढली. देशातील एक महान राजकीय नेत्याचा उदय होण्याची मुहूर्तमेढ अशा पद्धतीनं रोवली गेली होती.
ज्योती बसू हे 1946 मध्ये पहिल्यांदा बंगाल विधानसभेत पोहोचले. काँग्रेसचे डॉ. बिधान चंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ज्योती बसू यांना अनेक वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या चमकदार कामगिरीने डॉ. बिधान चंद्र रॉय यांचं लक्ष वेधून घेतलं. विरोधक असले तरी डॉ. रॉय यांचा ज्योती बसू यांच्याशी स्नेह निर्माण झाला. राज्य सरकारच्या विरोधात ज्योती बसू यांनी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलनं केली. त्यामुळं विशेषतः विद्यार्थी, तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं 1964 मध्ये विभाजन झालं. त्यातून सीपीएम म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात आला. सीपीएमच्या पहिल्या पॉलिट ब्यूरोमध्ये 9 सदस्य होते. त्यात ज्योती बसू यांचा समावेश होता. 1967 आणि 1969 मध्ये पश्चिम बंगालमध्ये आघाडीच्या सरकारांमध्ये बसू यांना काम करण्याची संधी मिळाली. 1972 मध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं. त्या निवडणुकीत ज्योती बसू यांचा पराभव झाला होता. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची तक्रार सीपीएमनं केली होती. त्यामुळं 1977 ची निवडणूक होईपर्यंत सीपीएमनं विधानसभेवर बहिष्कार घातला होता.
1977 च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये सीपीएमच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांची सत्ता आली. 21 जून 1977 रोजी ज्योती बसू पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर सलग 23 वर्षे ते मुख्यमंत्रिपदावर राहिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्योती बसू यांनी 2000 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बुद्धदेव भट्टाचार्य हे त्यांचे उत्तराधिकारी बनले. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्यांच्या यादीत ज्योती बसू यांचं नाव आहे. मुख्यमंत्रिपदापासून दूर झाल्यानंतर ते पक्षाच्या कार्यात सक्रिय राहिले.
ज्योती बसू यांची 1957 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली. डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आल्यानंतर 1967 मध्ये ते गृहमंत्री बनले. त्या काळात पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी चळवळीनं जोर धरला होता. नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवायांमुळं पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करण्यात आलं आणि राष्ट्रपती राजवट लागू कऱण्यात आली. 1977 च्या निवडणुकीसाठी जनता पार्टी आणि सीपीएमधील बोलणी फिस्कटली. त्यामुळं त्यावेळच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. डाव्या पक्षांच्या आघाडीला घवघवीत यश मिळालं. डाव्या आघाडीनं 290 पैकी 230 जागा जिंकल्या होत्या. सीपीएमनं सरकार स्थापन केलं आणि ज्योती बसू मुख्यमंत्री बनले. तेव्हापासून सलग 23 वर्षे ते मुख्यमंत्रिपदावर राहिले.
ज्योती बसून यांनी 1977 ते 2001 पर्यंत सतगछिया या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्याआधी त्यांनी बारानगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. या मतदारसंघातून 1972 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. मुख्यमंत्री म्हणून पश्चिम बंगालमध्ये त्यांनी अनेक सुधारणा केल्या. नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घालत राजकीय अस्थिरता संपवली. जमीन सुधारणा कायदा केला. गरीबी दूर करण्यासाठी योजना राबवल्या. देशात नक्षलवादाचा उदय पश्चिम बंगालमधूनच झाला होता, तो अन्य राज्यांत फैलावला, मात्र ज्योती बसू यांनी नक्षलवादाला पश्चिम बंगालमध्ये थारा मिळू दिला नाही.
1980 च्या दशकात नक्षलवाद्यांना पश्चिम बंगालमध्ये थारा मिळाला असता तर आज चित्र छत्तीसगडसारखं दिसलं असतं. 1960 आणि 70 च्या दशकात पश्चिम बंगालची जी अवस्था होती, त्याच्या तुलनेत ज्योती बसू यांनी केलेली विकासाची कामं, राबवलेल्या लोकहिताच्या योजनांमुळं मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ पसंती दिली. त्यांची लोकप्रियता कायम राहिली. त्यांना आव्हान देईल, असा नेता विरोधी पक्षांतच नव्हे तर त्यांच्या पक्षातही तयार झाला नव्हता. राजकारणात सक्रिय असेपर्यंत, ते हयात असेपर्यंत त्यांचं राजकारणातील हे स्थान कायम राहिलं होतं.
सलग 23 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ज्योती बसू यांनी अनेक ऐतिहासिक कामं केली. नक्षलवादी चळवळीमुळं निर्माण झालेल्या अस्थैर्याला त्यांनी राजकीय स्थैर्यात परावर्तित केलं. जमीन सुधारणा हे त्यांच्या सरकारचं सर्वात मोठं आणि महत्वाचं काम ठरलं. अन्य राज्यांना अशी सुधारणा करता आलेली नाही. जमीनदार आणि सरकारच्या ताब्यात असलेल्या जमिनींचा मालकी हक्क त्यांनी 10 लाख भूमिहीन शेतकऱ्यांना मिळवून दिला. याद्वारे ज्योती बसू यांच्या सरकारनं ग्रामीण भागातील गरीबी दूर करण्यात मोठं यश मिळवलं. अशा प्रकारची जमीन सुधारणा अन्य राज्यांसाठी स्वप्नवतच आहे.
अशी एेतिहासिक कामगिरी करणाऱ्या ज्योती बसू सरकारचे काही कमकुवत दुवेही राहिले. सतत संप, बंद पुकारणाऱ्या कामगार संघटनांवर नियंत्रण ठेवणं त्यांना शक्य झालं नाही. ज्योती बसू हे कामगार चळवळीतून पुढं आलेले असल्यामुळं कदाचित असं झालं असावं, मात्र त्याचा एक दूरगामी विपरित परिणाम झाला. कामगार संघटनांच्या सततच्या संपांमुळं पश्चिम बंगालमध्ये उद्योगांची भरभराट झाली नाही. विदेशी गुंतवणूक येऊ शकली नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटकप्रमाणे आयटी हबही पश्चिम बंगालमध्ये उभे राहू शकले नाहीत.
देशात 1996 ची लोकसभा निवडणूक लागली होती. त्या निवडणुकीच्या आधीच ज्योती बसू एक दिवस अवश्य पंतप्रधान होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. देशातील तीन राज्यांत प्रभाव असलेल्या डाव्या पक्षाचे ते दीर्घकाळ मुख्यमंत्री होते, राष्ट्रीय राजकारणात त्यांची भूमिकी सीपीएमचे पॉलिट ब्यूरो आणि केंद्रीय समितीच्या बैठकांपर्यंतच मर्यादित होती. यामुळं नव्हे तर अन्य कारणांमुळं त्यांच नाव चर्चेत आलं होतं. देशाच्या राजकारणात स्पर्धा वाढत होती. काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय होण्याचा तो काळ होता. काही नेत्यांचा उदय झालेला होता. डावे पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या आघाड्या व्हायला लागल्या होत्या. त्यातून पंतप्रधानपदासाठी ज्योती बसू यांचं नाव समोर आलं होतं.
पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांना एकत्र ठेवण्याचा, त्यांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव ज्योती बसू यांच्याकडं होता. बसू यांचं नाव चर्चेत आलं त्यावेळी म्हणजे 1996 मध्ये केंद्रातही आघाड्यांचे सरकारचे दिवस होते. केंद्रात अस्थिर आघाडीला बांधून ठेवणं अवघड काम होतं. अनुभवाच्या बळावर ज्योती बसू ते करू शकतील, असं सर्वांना वाटत होतं. त्यांच्या पक्षाला म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मात्र वेगळंच वाटत होतं. आघाडी सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाही, बाहेरून पाठिंबा द्यायचा, असा निर्णय पक्षानं घेतला. त्यामुळं ज्योती बसू पंतप्रधान बनू शकले नाहीत. पक्षाचा हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक चूक होती, असं ते नंतर म्हणाले होते.
ज्योती बसू यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातही पक्षातील अंतर्विरोधाचा सामना करावा लागला. विदेशी गुंतकवणुकीच्या शेकडो सामंजस्य करारांवर त्यांनी सह्या केल्या, मात्र त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कामगार संघटनांचा विरोध, हे त्याचं कारण होतं. असं सांगितलं जातं की ज्योती बसू यांनी यासाठी मंत्रमंडळाच्या बैठकांमध्ये अखेरपर्यंत संघर्ष केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळं एक कट्टर कम्युनिस्ट नेत्याएेवजी आदरणीय समाजवादी नेता म्हणून ज्योती बसू यांच्याकडे पाहिलं जातं.
ज्योती बसू यांचं वर्णन अनेकांनी विविध पद्धतीनं केलं आहे. ज्योती बसू यांनी साम्यवादाला देशात आदराचं स्थान मिळवून दिलं, असंही त्यांच्याबाबतीत सांगितलं जातं. ज्योती बसू हे कम्युनिस्ट कमी आणि व्यावहारिक, सामाजिक लोकशाहीवादी अधिक होते. त्यांच्या या यशानं आणखी एक शिखरं गाठलं असतं जर त्यांच्या पक्षानं 1996६ मध्ये ऐतिहासिक चूक केली नसती तर. केंद्रातील आघाडीच्या सरकारचं नेतृत्व करण्याची परवानगी पक्षानं दिली असती तर ज्योती बसू 1996 मध्ये पंतप्रधान झाले असते.
आपल्या कामगिरीद्वारे देशाला दिशा दाखवणाऱ्या नेत्यांमध्ये ज्योती बसू यांचा समावेश होतो. ते भारतातील डाव्या चळवळीतील उत्तुंग व्यक्तिमत्व होते. सामाजिक, आर्थिक विषमता संपवण्याचं, गरबी दूर करण्याचं एेतिहासिक काम त्यांनी केलं. ज्योती बसू यांच्यावर विरोधी पक्षांतील नेत्यांचाही विश्वास होता, स्नेह होता. ते बसू यांचा आदर करायचे. बसू आणि त्यांच्या आधी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रॉय यांच्यात राजकीय स्पर्धा होती, मात्र त्यांच्यात स्नेह होता, गाढ मैत्री होती.
सिद्धार्थ शंकर रॉय हे नेहमी ज्योती बसू यांच्या घरी जात असत. घरी गेल्यानंतर ते किचनमध्ये जायचे आणि खाण्यासाठी काही आहे का, हे पाहत असत. बसू यांच्या घरी अत्यंत साधं जेवण असायचं, जसे की दाळ -भात आणि फ्राय केलेली वांगी. आमदार म्हणून त्यावेळी मिळणाऱ्या मासिक वेतनातील बहुतांश रक्कम ते पक्षाकार्यासाठी द्यायचे. ज्योती बसू यांच्या पत्नी कमला बसू या नेहमीच रॉय यांच्याकडे तक्रार करायच्या, संपूर्ण वेतन ते पक्षाला देतात, घर कसं चालवायचं? मित्राला समजून सांगा. दोन वेळचे जेवण बनवण्यासाठीही मला कसरत करावी लागते, असं त्या रॉय यांना सांगत असत.
बांगलादेश युद्धाच्या आधी रॉय यांनी बसू यांची इंदिरा गांधी यांच्याशी भेट घडवून आणली होती. इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी तासभर ही भेट झाली होती. कोणालाही याची माहिती होऊ नये, यासाठी रात्री 11 वाजता रॉय यांनी आपल्या कारमधून त्यांना नेलं होतं. भेटीनंतर ते बाहेर पडले आणि रॉय रस्ता विसरले. त्यामुळं त्यांनी दिल्लीत अनेक गोल गोल चकरा मारल्या होत्या. एखाद्या पोलिस ठाण्यात जाऊन पत्ता विचारू, असं रॉय म्हणाले होते, मात्र त्यामुळे आपण इंदिरा गांधी यांना भेटलो, हे बाहेर कळेल, असं बसू यांना वाटलं होतं. त्याचवेळी रॉय यांना रस्ता सापडला, असा एक किस्सा सांगितला जातो.
प्रकृती अस्वास्थ्यामुळं बसू यांनी 2000 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तरीही पक्षकार्यात ते सक्रिय होते. बरे वाटत नसल्याने 1 जानेवारी 2010 रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांनी 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली. 17 जानेवारी 2010 रोजी ज्योती बसू यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी कमल बसू यांनी जगाचा निरोप घेतला होता. चंदन बसू हे त्यांचे पुत्र आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.