P. V. Narasimha Rao : विनम्र, विनयशील पी. व्ही. नरसिंह राव!

Political Special Article : नरसिंह राव बहुभाषिक होते. त्यांना नऊ भारतीय आणि तीन परदेशी भाषा येत. संस्कृतचेही ज्ञान त्यांचे चांगले होते. मराठी साहित्य आणि संस्कृतीचाही त्यांचा अभ्यास होता. हरी नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’, या कादंबरीचा त्यांनी तेलगू भाषेतही अनुवाद केला होता.
Former PM P V Narasimha Rao
Former PM P V Narasimha RaoSarkarnama
Published on
Updated on

उल्हास पवार-

P.V. Narsinha Rao News : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव म्हणजे अफलातून व्यक्तिमत्त्व होते. नम्रता, विनयशील, बहुभाषिकता, विद्वत्ता, विविध विषयांचे सखोल ज्ञान त्यांच्या ठायीठायी होते. ते मूळचे आंध्र प्रदेशातील असले तरी, महाराष्ट्राशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले होते, त्यांच्यातील सदगुणांचे दर्शन घडले आणि ती आठवण माझ्यासाठी आयुष्यभरासाठी ठेवा ठरली.

साधारणतः 1985-86 ची गोष्ट आहे. राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान होते. त्यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दीचा सोहळा होता. त्यासाठी नरसिंह रावांना ( P. V. Narasimha Rao) प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ते मानव संसाधन मंत्री होते. त्यामुळे उच्चशिक्षण विभाग त्यांच्या अखत्यारित होता. नरसिंह राव यांचा त्यावेळी दबदबा मोठा होता. आंध्र प्रदेशाचे ते दोन वेळा मुख्यमंत्री होते.

केंद्रात मंत्री होण्यापूर्वी इंदिरा गांधी यांनी त्यांना कॉँग्रेसचे (Congress) सरचिटणीस केले होते. त्यावेळी त्यांच्याकडे युवक कॉँग्रेससह आणखी दोन विभागांची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 1972 ते 80 या कालावधीत मी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्यामुळे तेव्हा आमचा संपर्क वाढला. मी महाराष्ट्रातून असल्यामुळे ते माझ्याशी मराठीतून गप्पा मारत.

फर्ग्युसन कॉलेजचा कार्यक्रम निश्चित झाल्यावर केंद्र सरकारच्या कार्यालयाकडून तसेच पक्ष संघटनेकडून आम्हाला कळविण्यात आले. ठरलेल्या दिवशी ते लोहगाव विमानतळावर आले. त्यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री प्रा. राम मेघे होते. त्यांच्यासह मी, मोहन जोशी, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य बाळ गाडगीळ आणि काही मान्यवर स्वागतासाठी गेलो. तेथून त्यांच्यासमवेत मी जुन्या शासकीय विश्रामगृहात आलो.

येताना त्यांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी फर्ग्युसनच्या कार्यक्रमापूर्वी मला दुपारी दोन ते अडीच तास वेळ आहे. त्यावेळेत भावगीते किंवा सतारवादन ऐकता येतील का, अशी त्यांनी विचारणा केली. ‘करतो काही तरी,’ असे मी सांगितले. त्यानंतर काही वेळातच जुळवाजुळव सुरू केली. प्रसिद्ध गायिका शशिकला शिरधोपेकर, सतारवादक अतुल केसकर आणि ज्ञानप्रबोधिनीमधून एक युवती, असे उपलब्ध झाले.

दुसऱ्या दिवशी जुन्या शासकीय विश्रामगृहात दुपारी दीड- दोन तासांची मैफल झाली. त्यावेळी नरसिंह राव अगदी तल्लीन झाले होते. आम्ही मोजकेच म्हणजे मी, धनंजय थोरात, मोहन जोशी आणि आणखी दोन पदाधिकारी उपस्थित होतो. मैफल झाल्यावर नरसिंह राव यांनी विचारणा केली की, ज्योस्त्नाताई भोळे यांची भेट होऊ शकेल का? ते ऐकल्यावर मी चाटच पडलो. त्यांना दबकतच विचारले की, तुम्ही ज्योस्त्नाताईंना कसे ओळखता.

त्यावेळी त्यांनी सांगितले की, महाविद्यालयीन शिक्षण मी पुण्यातच फर्ग्युसन महाविद्यालयातच केले आहे. तेथे गणित या विषयातून शास्त्र शाखेची पदवी घेतली. त्यावेळी मला घरून दरमहा तीन रुपये येत. त्यातील पैसे वाचवून, मी ज्योस्त्नाताईंच्या कार्यक्रमांना जात असे. तेव्हापासून त्या माझ्या लक्षात आहेत. खूप प्रयत्न केले, पण काही कारणामुळे ती भेट तेव्हा झाली नाही. नंतर ती भेट झाली. परंतु, मराठी साहित्य, कला- संस्कृतीची नरसिंह राव यांनी किती सखोल माहिती आहे, हे तेव्हा लक्षात आले.

दुसऱ्या दिवशी आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयात कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. नरसिंह राव यांच्याबरोबर आलो म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी मला दुसऱ्या रांगेतील खुर्चीवर बसविण्यात आले. माझ्या शेजारी टिळक पद्धतीची पगडी आणि पांढऱ्या रंगाची शेरवाणी घातलेले एक वयस्कर गृहस्थ बसले होते. त्यांचे वय सुमारे ९० वर्षे असावे. त्यांच्याकडे बघून मी औपचारिक स्मितहास्य केले. परंतु, आमचा परिचय काही झाला नव्हता.

कार्यक्रमाच्या सोपस्कारांनुसार तो सुरू झाला. त्यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी प्राचार्य बाळ गाडगीळ उभे राहिले. त्यांचे बोलणे सुरू झाले. त्याचवेळी पी. व्ही. नरसिंह राव जागेवर उभे राहिले. त्यांनी खुर्ची मागे सरकावली आणि व्यासपीठावरून ते डावीकडे आले. तेथील पायऱ्यांवरून खाली उतरले.

गाडगीळ प्रास्ताविक करताना त्यांचेही लक्ष विचलित झाले. सभागृहातील उपस्थितांनाही समजेना काय सुरू झाले आहे ते... नरसिंह राव व्यासपीठावरून खाली उतरल्यावर दुसऱ्या रांगेत आले. माझ्या शेजारी बसलेल्या ज्येष्ठ गृहस्थ बसले होते. त्यांच्याकडे ते आले आणि वाकून त्यांच्या पाया पडले. नरसिंह राव यांनी त्यांना विचारले की, ‘सर, ओळखले का मला. तुम्ही माझा गणिताचे शिक्षक होता,’ त्या सरांनीही दुजोरा देत नरसिंह राव यांना आशीर्वाद दिले.

पुढे भाषणात नरसिंह राव यांनी त्याचा उलगडा केला. त्यांनी सांगितले की, याच महाविद्यालयात समोर बसलेल्या चंद्रात्रे सरांनी मला गणिताचे धडे दिले होते. इतक्या वर्षांनंतर ते आज दिसल्यावर मला राहवले नाही म्हणून मी त्यांच्या पाया पडलो. ही आठवण सांगताच, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. इतका मोठा मंत्री, एवढा विनयशील, हे उपस्थितांना भावले

तसेच गुरुजनांबद्दल त्यांच्यात असलेली आदराची भावनाही दिसून आली. कार्यक्रम झाल्यावर नरसिंह राव दिल्लीला रवाना झाले. पण त्यानंतरही दोन-तीन दिवस त्यांच्या विनम्रतेची आठवण पुणेकरांमध्ये चर्चेची झाली होती.

नरसिंह राव बहुभाषिक होते. त्यांना नऊ भारतीय आणि तीन परदेशी भाषा येत. संस्कृतचेही ज्ञान त्यांचे चांगले होते. मराठी साहित्य आणि संस्कृतीचाही त्यांचा अभ्यास होता. हरी नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’, या कादंबरीचा त्यांनी तेलगू भाषेतही अनुवाद केला होता. पुढे पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी पुण्याशी, पुण्यातील मंडळींशी स्नेह कायम ठेवला, त्याची अनुभूती आम्हाला वारंवार येत गेली. माणूस मोठा का असतो, हे नरसिंह यांना जवळून अनुभवयाला मिळाल्यावर उमगले आणि आयुष्यभरासाठी ते लक्षात राहिले.

(लेखक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार आहेत)

(शब्दांकन : मंगेश कोळपकर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com