
- संतोष शेंडकर
NCP Vs BJP : भाजपाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे हे पुन्हा एकदा आपल्या हातावर 'घड्याळ' बांधणार असल्याचे निश्चित झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून कामठे यांच्या या स्वगृही परतण्याने पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला ताकद मिळणार असून भाजपाला मात्र जिल्ह्यातील पहिला धक्का ठरणार आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपाकडे नेतेमंडळींचा ओढा आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप दोन बडे नेते मागील काही महिन्यात भाजपाच्या गळाला लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपाने आपली ताकद जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये वाढविण्यास सुरवात केल्याचेच ते द्योतक होते.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ताकद विभागली गेली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला आपली सत्ता पुणे जिल्हा परिषदेत राखणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. अशात पुरंदरमध्येही राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर ताकद प्रचंड घटल्याने विधानसभा निवडणुकीत घड्याळाची टीकटीक तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती.
संभाव्य अडचणी ओळखून राष्ट्रवादीने हातपाय हलवायला सुरवात केली असून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्याचा सपाटा लावला आहे. यासोबतच आता भाजपाकडे मोर्चा वळविला असून जालिदंर कामठे या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यास गळाला लावले आहे.
येत्या शुक्रवारी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कामठे यांनी घड्याळाचा झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय निश्चित केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपासाठी हा फार मोठा भूकंप नसला तरी भाजपाच्या गळतीला सुरवात झाल्याने लक्षण मात्र निश्चित आहे. त्यांच्या प्रवेशाने पुरंदरसोबत पुणे शहरातील कोंढवा परिसरातही घड्याळाची ताकद वाढणार आहे.
१९८६ पासून कामठे हे शरद पवार आणि रामकृष्ण मोरे यांच्यासोबत काँग्रेस पक्षाच्या कामात आले. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि ५५ पैकी ५३ जिल्हा परिषद सदस्य पक्षासोबत आणण्यात त्यांचाही काही वाटा होता. त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषदेला सभापती राहिल्या आहेत. त्यांची वसंतदादा पाटील शिक्षणसंस्थादेखील मोठी आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही होते.
मात्र आमदारकीच्या उमेदवारीच्या इच्छेने भाजपात गेल्यानंतर त्यांच्यावर जुने कार्यकर्ते नाराज होते. आमदारकीची उमेदवारीही मिळाली नाही. तीन वर्षांपूर्वीच त्यांना स्वगृही परतण्याचे वेध लागले होते. परंतु भाजपाने पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी करून त्यांना रोखून धरले होते. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर मात्र त्यांनी स्वगृही परतण्याचे निश्चित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.