
अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये माजी नगरसेविका उषा वाघेरे यांची भेट घेतली.
या भेटीनंतर संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरे गटाला या घडामोडीमुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 'राष्ट्रवादी परिवार मिलन' कार्यक्रमाद्वारे कार्यकर्त्यांच्या थेट घरी भेटी देऊन पक्ष बळकट करण्यावर भर दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः पुण्यात पक्षाच्या नेत्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत, जिथे कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, तिथे पुन्हा ताकद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नुकतेच अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक नेत्यांच्या घरी भेटी घेतल्या. यातील एक भेट विशेष चर्चेत आहे. अजित पवारांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि मावळ लोकसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवलेले नेते संजोग वाघेरे यांच्या पत्नी, माजी नगरसेविका उषा वाघेरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजोग वाघेरे राष्ट्रवादीत 'घरवापसी' करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
ही भेट बी. टी. अदवाणी धर्मशाळा, पिंपरी येथे झाली. यावेळी पिंपरी परिसरातील विकासकामे, स्थानिकांच्या अडचणी आणि आगामी संधींवर सविस्तर चर्चा झाली. या भेटीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरसेविका उषा वाघेरे-पाटील, नगरसेवक डब्बू असवानी आणि प्रभाकर वाघेरे उपस्थित होते.
संजोग वाघेरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, "मी सध्या शिवसेनेत आहे, पण माझ्या पत्नी उषा वाघेरे राष्ट्रवादीतच आहेत. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर पुढील निर्णय घेऊ." यातून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, अजित पवारांनी आपल्या खास मिश्किल शैलीत म्हटले, "संजोग वाघेरे ठाकरे गटात आहेत, तर त्यांच्या पत्नी आमच्यासोबत आहेत. अशी अनेक उदाहरणे घरोघरी दिसतात."
गेल्या चार दशकांपासून संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. मात्र, डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव झाला. आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजोग वाघेरे पुन्हा राष्ट्रवादीत परतणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
1. अजित पवारांनी कोणाची भेट घेतली?
पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका उषा वाघेरे यांची.
2. या भेटीचे राजकीय महत्त्व काय आहे?
या भेटीनंतर संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
3. संजोग वाघेरे कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाशी संबंधित आहेत.
4. मावळ लोकसभेत त्यांनी काय केले होते?
संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवली होती.
5. या घडामोडींचा परिणाम कुणावर होणार?
शिवसेना (UBT) गटावर दबाव वाढेल आणि राष्ट्रवादीला बळ मिळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.