

Sangali Maha Aghadi politics : ‘टप्प्यात आला की कार्यक्रमच’ अशी ज्यांची ओळख असलेल्या आमदार जयंत पाटील यांनी महापालिका निवडणुकीत घेतलेली अभूतपूर्व माघारीची भूमिका अनेकांसाठी धक्कादायक ठरली. खासदार विशाल पाटील यांचा ‘काँग्रेसचा डीएनए असलेले नेते’ असा उल्लेख करीत त्यांनी जणू महापालिका निवडणुकीची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकली.
जयंत पाटील यांनी ‘काँग्रेस’ला केवळ मदतच केली नाही, तर आपले उमेदवार हाताच्या चिन्हावर लढायला दिले. आघाडी जुळविण्यासाठी त्यांनी पडती बाजू घेतली. शिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत ‘अंडरस्टँडिंग’ करत आघाडी घडवताना संयम दाखवला. टांग मारून गेलेल्या शिलेदारांना माफच केले नाही, तर त्यांचा विजय सुकर व्हावा, अशी फिल्डिंग लावली. आता प्रश्न हा की, एवढं सारं जयंतरावांनी का गमावलं; काय कमावलं?
महापालिकेच्या स्थापनेपासून असलेली मदन पाटील यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी महाआघाडीची मोट बांधत विरोधकांना थेट सत्तेत आणणाऱ्या जयंत पाटील यांनी यावेळी 78 पैकी केवळ 22 जागा लढविल्या. जिंकल्या फक्त 3. आकड्यातील माहीर अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप 55 जागांवर, तर आमदार सुधीर गाडगीळ यांनी 45 ते 50 जागांचे भाकीत केले होते. भाजपचा अश्वमेध कोण रोखतो, असा सूर होता. महापालिकेवर निरंकुश सत्ता गाजवणारा मदन पाटील यांचा अख्खा गट आणि लगेच दोन वेळा विधानसभेला भाजपला झुंजविणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांना सामील करीत भाजपने काँग्रेस रिकामी केली.
त्यात खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी शहर काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष निवडीत तीन महिने घोळ घातला. काँग्रेस ओस आणि पाठापोठ राष्ट्रवादीच नव्हे, तर काँग्रेसमधील मातब्बर किशोर जामदारांसह 17 आजी-माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आसरा शोधला. ज्यांना महापौर करण्यासाठी महाआघाडीच्या सत्ता काळात जयंत पाटील यांनी भाजपची सत्ता उलटवली त्या दिग्विजय सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीत फूट पडताच पहिल्यांदा उडी मारली होती.
पुढे मिरज दंगलीसारख्या आरोपात ज्यांची पाठराखण केली, त्या मैन्नुद्दीन बागवान यांनी अजितदादांची राष्ट्रवादी गाठली होती. महाआघाडीच्या सत्ता काळात महापौरपद सोडण्यास नकार देत जयंतरावांनाच खुले आव्हान देणारे इद्रिस नायकवडी, तसेच या तिघांनाही मिरजेत ‘बाय’ दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 22 जागांवर बाय देण्याची भूमिका घेताना त्यांनी विशाल, विश्वजित यांच्यासोबत ठाम भूमिका घेतली.
सांगलीतील अभिजित भोसले, रज्जाक नाईक, जमीर रंगरेज, किरण सूर्यवंशी यांच्या उमेदवारांना घड्याळ-हातावर लढण्याची मुभा दिली. सांगलीवाडीत दिलीप पाटील यांच्या सौभाग्यवतींना उमेदवारी देण्यासाठी हरिदास पाटील यांना थांबविले. इथे एकच जागा घेऊन ‘दानत’ दाखविली. जिथे गेल्यावेळी त्यांनी मैत्रिपूर्ण लढत केली होती. फौजदार गल्लीत सावर्डेकरांनाही ‘हात’ दिला. त्यासाठी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात समेट घडवून आणली.
एकूणच संपूर्ण महापालिका क्षेत्रात जयंतरावांनी काँग्रेस आघाडी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला उमेदवार दिले. आघाडीचे राष्ट्रवादीशी ‘अंडरस्टँडिंग’ घडविताना स्वतः माघार घेतली. त्यातून महापालिका निवडणूक उभी राहिली. आघाडीत सर्वाधिक प्रचार सभा घेतल्या. त्यातल्या बहुतांशी सभा त्यांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी घेतल्या. त्यांची ही कृती आजवरच्या एकूण प्रतिमेशी उलटी राहिली. विशाल पाटील यांना दोन लोकसभा निवडणुकांना तिकीट मिळणार नाही, असा ‘कार्यक्रम’ लावणाऱ्या जयंतरावांनी आश्चर्यकारकरीत्या कमालीचे जुळवून घेतले. साहजिक असे त्यांनी का केले? त्याची कारणे येत्या काळात शोधली जातील.
त्यातला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आता जिल्ह्यातील राजकारण कूस बदलतेय. कधीकाळी जतपासून शिराळ्यापर्यंतच्या भाजपच्या जिल्ह्यातील विस्तारात त्यांचाच वाटा होता. आता ते त्याच भाजपला रोखण्यासाठी खरेच ताकदीने उलटा प्रवास करणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल. जयंतरावांनी फक्त 3 जागा कमावल्या, असा ढोबळ अर्थ काढण्यासारखी ही निवडणूक नव्हती. त्यांच्या या पटाची मांडणी नगरपालिका निवडणुकीत सुरू झाली. आता हा पट दीर्घ पल्ल्याचा दिसत आहे.
आष्टा- ईश्वरपूरच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या मदतीची परतफेड
भाजपच्या सुसाट गतीला रोखतानाच जिल्हा परिषदेची पट मांडणी
भाजप प्रवेशाच्या चर्चेला प्रथमच त्यांच्याकडून कृतिशील ब्रेक
दोन्ही काँग्रेसभोवतीचे राजकारण बदलल्याच्या जाणिवेचा स्वीकार
जिल्हास्तरावर दादा-बापू संघर्षाला पूर्णविराम; नव्या मांडणीस सुरुवात
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.