Jitendra Awhad resign : वर्षभरापूर्वी एका कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतप्त झालेल्या आव्हाड यांनी त्यांच्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप करीत त्यांनी राजीनामा दिला होता. आव्हाडांच्या या निर्णयामुळे राजकारण चांगलेच तापले होते. मात्र आव्हाड यांनी या कटकारस्थानावर मात करीत राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्याशिवाय मे २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा शरद पवार यांनी राजनीमा दिल्यानंतरही त्यांनी पक्षाच्या सर्वच पदाचा राजीनामा दिला होता. दोन्ही वेळा त्यांनी दिलेला राजीनामा मागे घेतला होता.
वर्षभरापूर्वी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या खाडी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. या प्रकरणी एका ४० वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, तर त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे अशा स्वरूपाच्या आरोपाने व्यथित झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता.
ट्विट करीत दिला राजीनामा
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, की पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
अजित पवार यांनी दिली साथ
यामुळे आव्हाड यांनी अजिबात राजीनामा देऊ नये, सरकार येत असतात जात असतात; पण असं डगमगून जायचं नसतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठामपणे भूमिका मांडली होती. राजकीय मतभेद असू शकतात; पण अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर खपवून घेणार नाही. दिवस बदलत असतात हे त्यांनीही लक्षात ठेवावं, असा इशाराही पवार यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली होती.
या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्यामुळे हा विषय त्यावेळी चांगलाच गाजला होता. शेवटी तक्रारदार महिलेने राजकीय हेतूने प्रेरित होऊन तक्रार दिल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणावर पडदा पडला होता.
पक्षाच्या पदाचा दिला राजीनामा
त्यानंतर २ मे २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला होता.
जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचा राजीनामा देत म्हटलंय, आपण लोक जी भूमिका घेतात त्या सोबत राहिलं पाहिजे, असा आग्रह शरद पवार यांचा असतो. आमचा ही तोच आग्रह आहे. शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये, जनमताचा आदर केला पाहिजे. शरद पवार हे राजकारणातील भीष्मपितामह आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये, आमचा प्रवास शरद पवार यांच्यामुळे सुरू होतो तेथेच थांबतो. त्यांनी राजीनाम्याचे पाऊल मागे घ्यावं ही अपेक्षा आहे. या कारणामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्या वेळेस पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, शरद पावर यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे मागे घेतले होते.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.