Bhaskar Jadhav Vs Brahman : ब्राह्मण समाज भास्कर जाधव यांच्या 'डोक्यात' का गेला? पडद्यामागे नेमकं काय सुरु आहे?

Bhaskar Jadhav Vs Brahman : कोकणात आमदार भास्कर जाधव यांच्या ब्राह्मण समाजाशी संबंधित वक्तव्यावरून वाद चिघळला आहे. हेदवतड येथील सभेत केलेल्या विधानानंतर दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया देत संघर्ष तीव्र झाला आहे.
MLA Bhaskar Jadhav’s remarks at Hedevattad spark a political clash with the Brahmin community, fueling protests and intensifying tensions in Konkan.
MLA Bhaskar Jadhav’s remarks at Hedevattad spark a political clash with the Brahmin community, fueling protests and intensifying tensions in Konkan.sarkarnama
Published on
Updated on

- राजेश कळंबटे

Bhaskar Jadhav Vs Brahman : गेल्या काही दिवसांपासून कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण समाज असा वाद धुमसत आहे. गुहागर तालुक्यातील हेदवतड येथील जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यानंतर या वादाची ठिणगी पडली. ब्राह्मण सहाय्यक संघ भास्कर जाधव यांच्या विरोधात आक्रमक झाला. याला आमदार जाधव यांनीदेखील तितकेच जहाल प्रत्युत्तर दिल्यामुळे नव्या संघर्षाला सुरुवात झाली.

खरंतर शिवसेना हा जातीय वादात न पडणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यानंतरही आमदार जाधव यांनी जातीय वाद ताणल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पण राजकीयदृष्या या वादाकडे बघितल्यास त्यात भविष्यातील निवडणुकांचे राजकारण स्पष्टपणे दिसून येते. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सध्या सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप हे गुहागर विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण विरुद्ध बहुजन व अन्य सर्व जातीचे एकीकरण करून मतपेटी मजबूत ठेवण्याचा सुरू असलेला प्रयत्न असच म्हणता येईल.

वाद नेमका कुठून सुरु झाला?

आमदार भास्कर जाधव यांनी हेदवतड येथील कार्यकर्ता मेळावा सभेत काही दिवसांपूर्वी माजी आमदार डॉ. विनय नातू व शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर गुहागर तालुक्यात राजकीय कल्लोळ सुरु झाला. मी या तालुक्यात आल्यानंतर गुहागरला वैभव आले. इकडची खोतकी मी संपवली, लेखणीचा दहशतवाद मी संपवलाय. पत्रव्यवहार करून लोकांना छळलं जायचं. ते मी बंद केलं, असे विधान भास्कर जाधव यांनी केले होते.

खोतकी शब्दामुळेच ब्राह्मण समाज नाराज :

कोकणात 'खोतकी' म्हणजे ब्राह्मण समजातील गावातील प्रमुख माणूस असतो, ज्याच्या सल्ल्याने गाव चालतो. भास्कर जाधव यांची हीच टीका ब्राह्मण समाजाच्या जिव्हारी लागली. भास्कर जाधव स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा ब्राह्मण सहाय्यक संघाचा जाधव यांच्यावर आरोप केला. राजकीय प्रवासात जाधवांनी ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची आठवणही संघाने जाधव यांना पत्राद्वारे करून दिली होती.

MLA Bhaskar Jadhav’s remarks at Hedevattad spark a political clash with the Brahmin community, fueling protests and intensifying tensions in Konkan.
Bhaskar Jadhav : 'माझा रोख ब्राह्मण समाजावरच, ते पाताळयंत्री, अनाजीपंत..., माफी मागायचा प्रश्नच येत नाही : भास्कर जाधवांचा बाणा कायम!

जाधव यांचेही आक्रमक प्रत्युत्तर :

जाधव यांनीही या पत्राला तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून पराचा कावळा केला, असे म्हणत ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशी यांच्यावर जाधव यांनी टीका केली. तसेच हे पत्र कुठल्या आनाजी पंतांकडून लिहून घेतलं असं म्हणत कट्टर विरोधक आणि भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यावर जाधवांनी टीका केली. इथून हा वाद आणखी पेटला. भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी होऊ लागली.

त्यावर "मी कोणाची माफी मागावी आणि कशासाठी...? मी काय केलं? मी समाजचं नाव घेतलेलं नाही... समाजाविषयी काहीही बोललेलो नाही, माझा रोख हा गुहागरमधील ब्राम्हण समाजावर होता, असे भास्कर जाधवांनी मंगळवारी म्हटले होते. समाजात द्वेष पसरवण्याचे काम ब्राह्मण सहाय्यक संघ करत असून राजकीय वादात ब्राह्मण समाजाने पत्र द्यायची काय गरज? निलेश राणे यांनी माझ्या कुटुंबातील महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तेव्हा विनय नातू टाळ्या वाजवत होते. त्यावेळी ब्राह्मण समाजाने निषेध व्यक्त का केला नाही, असा सवालही त्यांनी विचारला होता.

स्टेटसमधून सोडलं नाही :

आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरही साने गुरुजी यांच्या चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला. यात शाळकरी वयातील साने गुरुजी अत्यंत प्रभावीपणे वर्गातील शिक्षकांसमोर मुद्दे मांडताना दिसले. "छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीने उभारलेले आणि कान्होजी आंग्रे यांनी जिवापाड सांभाळलेले मराठा आरमार पेशव्यांनी इंग्रजांशी संगनमत करून समुद्रात बुडवले. पेशव्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी परकीय शक्ती असलेल्या इंग्रजांशी हातमिळवणी करून स्वराज्याच्या नौदलाचा घात केला," असे सांगताना ते इतिहासाचा दाखला देतात. साने गुरुजींच्या मते, ही इतिहासातील एक मोठी चूक होती, ज्यामुळे भारताच्या सागरी सार्वभौमत्वाला मोठा धक्का बसला.

ब्राह्मण समाज भास्कर जाधव यांच्या डोक्यात का गेला?

काही दिवसांमध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार फोडून पक्ष कमकुवत करण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले. दोन महत्त्वाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय यांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. एकीकडे राजकीय पातळीवर पक्ष कमकुवत करण्यासाठी सुरू असलेले विरोधकांचे प्रयत्न मोडीत काढण्यासाठी भास्कर जाधवांकडूनही आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. तोडीस तोड प्रतिउत्तर देण्यासाठी आमदार जाधव यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहनही केलं होतं.

MLA Bhaskar Jadhav’s remarks at Hedevattad spark a political clash with the Brahmin community, fueling protests and intensifying tensions in Konkan.
'मला डिवचल्यानंतर माझ्यातला खरा कार्यकर्ता काय आहे तो मी दाखवतो"Bhaskar Jadhav यांचा थेट इशारा

त्या पाठोपाठ वेळणेश्वरसह ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करत आपल्या आक्रमक शैलीत कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश बेंडल यांच्या रूपाने कुणबी चेहरा रिंगणात उतरवून महायुतीने आमदार जाधव यांना शह देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यावेळी माजी आमदार नातू यांनी गावांमध्ये जात भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगली फिल्डिंग लावली होती. परंतु आमदार जाधव थोडक्या मताने निवडून आले.

प्रचारामध्ये बहुजन समाजाच्या मतांचे विभागीकरण करण्यात त्यावेळी मोठे यश मिळाले. हाच समाज भास्कर जाधव यांची आतापर्यंतची मोठी ताकद राहिला होता. ही मतपेटी आपल्याकडे फिरवण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये विरोधकांकडून म्हणजेच महायुतीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कुठेतरी अंकुश लावणे आवश्यक असल्यामुळे आमदार जाधव आक्रमक झालेले आहेत. यामधूनच मराठा समाजाला काही मान-सन्मान नाही का? अशी सतत आक्रमक वक्तव्य करत मतपेटी सांभाळण्याचा मोठा प्रयत्न जाधव यांच्याकडून सुरू झाला आहे.

भास्कर जाधव काय साध्य करु इच्छितात?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, तळातील कार्यकर्त्याला जपून ठेवण्यासाठी बहुजन समाजाचा कार्ड पुढे केले जात आहे. संपूर्ण गुहागर मतदारसंघांमध्ये बहुजन समाज वाडी वस्तीवर विखुरला गेलेला आहे. त्यात कुणबी समाजाचं प्राबल्य अधिक दिसून येतं. मात्र शहरी भागामध्ये ब्राह्मण समाजाचं वर्चस्व गेल्या अनेक वर्षापासून आहे. हा समाज पूर्वीपासून भाजपची व्होट बँक राहिला आहे. तात्यासाहेब नातू, विनय नातू यांच्यासोबत हा समाज राहिला.

हेदवतड येथील सभेत आमदार जाधव यांनी केलेल्या आक्रमक भाषणानंतर ब्राह्मण समाजाने काढलेल्या पत्राचा राजकीय फायदा उठवण्याची एक मोठी संधी आमदार भास्कर जाधव यांनी उचललेली दिसते. ब्राह्मण महासंघाने काढलेल्या त्या पत्राचा आधार घेऊन ब्राह्मण समाज बहुजन समाजावर वरचढ होत असल्याचे आमदार जाधव यांच्याकडून वारंवार दाखवून दिले जात आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका मेळाव्यातही आमदार जाधव यांनी ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले आहे. पण बहुजन आणि ब्राह्मणेतर समाजाची मोट बांधून मतपेटी कायम राखण्याचा हा मानस किती यशस्वी ठरणार काळच ठरवणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com