संदीप चव्हाण
Maharashtra Lok Sabha Election 2024 : शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) नाशिक लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर आता साधू , महंत, महाराजही उतरले लोकसभेच्या आखाड्यात, अशी चर्चा सुरू झाली. पण या साधू , महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. महाराष्ट्रात 2004 ते 2019 या 15 वर्षांच्या काळात तब्बल 08 साधू , महंत, महाराजांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे.
भाजपकडून 2019 मध्ये सोलापुरातून निवडणूक लढवलेल्या श्री जय सिद्धेश्वर स्वामींनी तर मोठ्या फरकानं विजय मिळवत थेट दिल्ली गाठली होती. त्यांना 5,24,985 इतकी मतं मिळाली होती.
त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनाही पराभूत व्हावं लागलं होतं. याच निवडणुकीत श्री वेंकटेश्वर महास्वामीजी अपक्ष म्हणून लढले होते मात्र त्यांना अवघी 1830 मतं मिळाली होती.
केवळ भारतीय जनता पक्षानंच नव्हे तर बहुजन समाज पक्षानंदेखील साधू , महंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. बसपकडून 2009 मध्ये श्री महंत सुधीरदास महाराज यांनी नाशिकमधून निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत त्यांना 17, 980 इतकी चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. 2014 मध्ये नगर येथून बहुजन मुक्ती पार्टीकडून निवडणूक लढलेल्या ह.भ.प. अजय बारसकर महाराजांना 6003 इतकी मतं मिळाली होती.
2019 मध्ये जळगाव येथून हिंदुस्थान निर्माण दल या पक्षाकडून निवडणूक लढलेल्या संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटलांना 1295 इतकी मतं मिळाली होती. 2004 मध्ये मुंबई उत्तर येथून अखिल भारत हिंदू महासभा या पक्षाकडून निवडणूक लढलेल्या महंत श्रीराम स्वरूपदास महाराज अयोध्यावाले यांना 1249 इतकी मतं मिळाली होती. 2014 मध्ये मावळ येथून अपक्ष लढलेल्या ह.भ.प. आर. के. पाटलांना 2336 इतकी मतं मिळाली होती.
शांतिगिरी मौनगिरी महाराज पहिल्यांदाच नव्हे तर दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी त्यांनी 2009 मध्ये तेव्हाचं औरंगाबाद म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शांतिगिरी महाराजांनी 1 लाख 48 हजार 26 इतकी मतं मिळवली होती.
या वेळी शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढत आहेत. त्यांनी अर्जदेखील भरला आहे मात्र केवळ शांतिगिरी महाराजच नव्हे तर आणखी काही साधू, महंत नाशिकच्या आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. स्वामी कंठानंद, स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे, सिद्धेश्वरानंद सरस्वती अशी कितीतरी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचं दिसून येत आहे. निवडणूक लढण्यास कायम इच्छुक असलेल्या या साधू, महंत, महाराजांकडं पाहून इतकंच म्हणावंसं वाटतं...
जाण्या लोकसभेच्या दारी | साधू - महंतांची मांदियाळी ||
भक्तीचा फुलविता मळा | लागला लोकसभेचा लळा ||
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.