Maharashtra Politics News LIVE Updates : पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार

Maharashtra Politics Breaking News Top Headline LIVE Updates : स्थानिक, राज्य, देशातील महत्त्वाच्या राजकीय, प्रशासकीय बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

पुणे पोलीस 'ॲक्शन मोड'मध्ये; जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 

वादग्रस्त माजी आयएएस व प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्यांचं अटकेपासून असलेलं संरक्षण देखील काढून घेण्यात आलं आहे. यानंतर बाणेर येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी पुणे पोलिसांचे एक पथक दाखल झाले होते. त्यावेळी ती घरी नसल्याचे माहिती समोर येत आहे. तिचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची दाट शक्यता आहे.

Policeman shoots family : राज्य राखीव दलातील जवानाचा कुटुंबावर गोळीबार

हिंगोलीमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या संपूर्ण कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी जागीच ठार झाली तर दीड वर्षाचा चिमुकला सासू यासह आणखी एक नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने पळ काढला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत

Latur Truck Accident News : मद्यधुंद चालकाने ट्रक भरवस्तीत घुसवला; चार ते पाच दुचाकींना चिरडलं, सात गंभीर जखमी

लातूर शहरातल्या गाव भागातील भरवस्तीत मद्यधुंद चालकाने रिकामा ट्रक घुसवला. हा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. ट्रक चालवत एकप्रकारे त्याने धुमाकूळ घातला. वस्तीत घुसताना समोर येणाऱ्या पाच ते सात दुचाकीस्वारांना देखील उडवले. यात सुमारे सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. भर दिवसा हा ट्रक चालकाने, असा प्रकार केल्याने वस्तीत गोंधळ उडाला. ट्रक चालकाला थांबवण्यासाठी जमावाने त्याच्यावर दगडफेक केली. दरम्यान, आता या ट्रक चालकाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे.

Sanjay Rathod : मंत्री संजय राठोडांची पालकमंत्रीपदावर मोठी प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील (Shivsena) मंत्री संजय राठोड यांनी पालकमंत्रीपदावरून मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "राज्यात 36 जिल्हे आहेत. त्यापेक्षा जास्त मंत्री महायुती सरकारमध्ये आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी वरिष्ठ निर्णय घेईल तोच निर्णय मान्य असेल. आलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू". माझ्याकडे यापूर्वी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि जलसंधारण पद होते. आता माझ्याकडे पुन्हा जलसंधारण मंत्रीपद कायम आहे. त्यामुळेच वरिष्ठ निर्णय घेतीलच, असेही संजय राठोड यांनी म्हटले आहे.

Rajkumar Patel : DCM शिंदेंच्या शिलेदाराचे CM फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'पोलिस संरक्षण काढून घ्या'

राज्यात अचानक सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्तेत सहभागी सर्व आमदारांना पोलिस संरक्षण दिले होते. यात मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनाही दोन पोलिस व्हॅनसह सुरक्षा दिली होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकुमार पटेल यांचा पराभव झाला. माझा पराभव झाल्याने आपल्याला आता पोलिस संरक्षण नको, असे पत्र राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. पराभवानंतर सुद्धा राजकुमार पटेल यांना पोलिस सुरक्षा आहे. मात्र आता माजी आमदार पटेल यांनी स्वतःहून आपली सुरक्षा काढून घ्यावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

Shirdi Maharashtra Temple Trust Council : हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा; शिर्डीतील महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठराव

शिर्डी (Shirdi) इथं महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे झाली. या परिषदेला राज्यातील 750 हून अधिक निमंत्रित होते. अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही. परंतु हिंदूंची मंदिरे ताब्यात का आहेत? असा सवाल सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केला. हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हिंदू मंदिरांमध्ये आठवड्यातून एक सामुहिक आरती, आरती आणि हिंदू धर्माबद्दल प्रबोधन आदी ठराव या परिषदेत करण्यात आले. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संयोजक सुनील घनवट, काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदी परिषदेत सहभागी झाले होते.

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला 'मोठा' इशारा

बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली असून, त्यांच्या कुटुंबियांच्या न्यायाच्या लढाईत ते एकटे नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. 'महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज देशमुख कुटुंबियांच्या मागे उभा आहे. बीड जिल्ह्यातील एका पोलिस अधीक्षकांच्या बदलीने गुन्हेगारीला आळा बसणार नाही. एका माहिन्यात सर्व पोलिस अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करा. बीड शांत ठेवायचा असेल, तर मास्टरमाईंडला दोन दिवसात अटक करा. वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे का?', असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी केला.

Santosh Deshmukh Murder Case : थोरातांची मस्साजोग गावाला भेट; म्हणाले, 'माणुसकीला काळीमा फासणारी घटना, मास्टरमाईंडला पकडा'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बीडमधील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. थोरात म्हणाले, "संतोष देशमुख यांना ज्या प्रकारे निर्घृणपणे मारण्यात आले आहे, हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. कायद्याचे राज्य राहिले की नाही, असं वाटू लागलं आहे. महाराष्ट्र नाही, तर देशाला काळजी लावणारी ही घटना आहे. घटनेतील गुन्हेगार कितीही मास्टरमाईंड असला, तरी पकडले पाहिजे". कायद्याचा धाक असला पाहिजे, छोट्या गोष्टीतून मोठ्या घटना घडतात. बीडमध्ये जिल्ह्यात राजकीय हस्तक्षेपांचा अतिरेक झाला आहे. एखादा FRI किंवा NC दाखल करायची असेल, तर ती दाखल होत नाही. बीडमध्ये 28 तारखेला निघत असलेल्या मोर्चात सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन थोरात यांनी केले.

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा फेक नॅरेटीव्ह तोडला; CM फडणवीसांनी महायुती सरकारच्या वाटचालीची दिशा सांगितली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर (Nagpur) इथं पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राची पुढची वाटचाल कशी असेल, यावर भाष्य केले. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत आम्ही विरोधकांचा फेक नॅरेटीव्ह तोडू शकलो. आता काम करायचे आहे. ऊर्जा विभागाचा पुढील 25 वर्षांचा रोड मॅप तयार आहे. विदर्भात सहा नद्यांचे जोडप्रकल्प सुरू आहे. यामुळे परिवर्तन होईल. विदर्भाला औद्योगिक इकोसिस्टम क्षेत्र उभारण्यावर भर असणार आहे. तसेच गडचिरोलीसारखे क्षेत्र बदलण्याचे काम आपण करणार आहोत. योजनांचा भार तिजोरीत पडणार आहे, याची कल्पना आम्हाला आहे. परंतु त्याचे नियोजन देखील आम्ही केले आहे". लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देखील जमा करण्यास सुरवात केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला गतीने पुढे नेणार आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला 20 लाख घरं मिळणार आहेत. सत्ता कधीही डोक्यात जाणार नाही आणि महाराष्ट्रात पारदर्शकतेने कारभार करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Kalyan Crime Update : कल्याण पूर्वमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अन् हत्या; मुख्य आरोपीला शेगावमधून अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर कल्याण पूर्वेमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Police) काल एकाला ताब्यात घेतलं होतं. मुख्य आरोपी विशाल गवळी हा पसार झाला होता. कोळशेवाडी पोलिसांनी त्याच्या शोधासाठी सहा पथकं नेमली होती. बुलढाणाच्या शेगाव येथून विशाल गवळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या घरात लपून बसला होता. पोलिसांना माहिती मिळतच त्याला पत्नीच्या घरातून अटक केली. या घटनेनंतर कल्याण पूर्वेत संतापाची लाट उसळली असून, विशाल गवळीला कठोरातील कठोर शिक्षा, म्हणजेच त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण पूर्वेतील नागरिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला.

Dhananjay Sawant : धनंजय सावंत यांचे समर्थक आक्रमक; राज्य मार्गावर टायर जाळून फेकलं

माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांची चिठ्ठीवर नावे लिहून तुमचा 'संतोष देशमुख मस्साजोग करू', अशी धमकी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाला आहे. या दोन्ही घटनांच तपास झालेला नाही. धनंजय सावंत यांना आलेली चिठ्ठी म्हणजे, त्यांनी जीवे मारण्याची धमकी आहे. धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज परांडा, भूम शहर बंद ठेवण्यात आले असून, सोनारी-परांडा-पाथरूड राज्य मार्गावर रोडवर समर्थकांनी सावंत यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. दरम्यान, आज भूम आणि परांडा बंदची हाक देण्यात आली असल्याने व्यापारावर आणि रोजच्या कामांवर परिणाम झाला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील पोलिसांच्या कारभारावर खासदार बजरंग सोनवणे यांना संशय

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत पोलिसांच्या (Police) कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय व्यक्त केला. सहा आणि नऊ डिसेंबरचा पोलिसांचा कारभार हा संशयास्पद आहे. पहिल्या तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर चौथा आरोपीला अटक केली की, सरेंडर झाला हे पोलिसांकडून समजत नाही. नेमका तपास कोणत्या दिशेने चालला आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे, असे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Sanjay Raut : बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी, अशी परिस्थिती; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी, अशी परिस्थिती आहे. परंतु एखाद्या जिल्ह्यात, अशी राजवट लावण्याची तरतूद आपल्या घटनेत नाही. पण तिथली परिस्थिती चिंताजनक आहे. गुन्हेगारी वाढली आहे. जनतेला असुरक्षित वाटते आहे. बीडच्या जनतेचा तिथल्या प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. बीडमधील आरोपी मंत्रिमंडळात आहे. परभणीचा आरोपी सेल्यूट करतो. मुख्यमंत्री या दोन्ही जिल्ह्यात जायला हवे. परंतु सत्ताधारी माणुसकी शून्य झाली आहे, अशी गंभीर टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

Ajit Pawar Finance And Planning : महसूल वाढीसाठी मद्यविक्रीचे नवीन परवाने द्यावे; DCM पवारांसमोर 'राज्य उत्पादन' अधिकाऱ्यांचा प्रस्ताव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यभार स्वीकरताच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वित्त आणि नियोजन विभागाची बैठकीत त्यांनी उत्पन्न वाढीसाठी प्रस्ताव मागवले होते. उत्पन्न आणि खर्च यात, दोन हजार कोटी रुपयांची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी राज्य उत्पादन अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मद्यविक्रीचे नवीन परवाने देण्यास सुरवात करावी, असा प्रस्ताव ठेवला. यातून महसूल वाढेल, तसेच अवैध मद्यविक्रीला देखील चाप बसेल, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली. राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Dhananjay Sawant : धनंजय सावंत धमकी प्रकरणाच्या तपासासाठी आज भूम आणि परांडा बंदची हाक

राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. बेदम मारहाण करून सरपंच देशमुख यांची हत्या झाली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशीच हत्या करण्याची धमकी धाराशिवचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आली. धनंजय सावंत आणि केशव सावंत हे धाराशिवचे शिवसेनेचे (Shivsena) नेते माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे आहे. धनंजय सावंत धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहे. या धमकीप्रकरणी ते लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. दरम्यान स्थानिक पोलिसांनी पूर्वीच्या आणि आताच्या धमकी प्रकरणाच्या तपासासाठी पथके तैनात करण्यात आली असून धनंजय सावंत यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आल्याचे सांगितले.

Gopichand Padalkar : महाराष्ट्रात प्रचंड जातीवाद; आमदार गोपीचंद पडळकर

भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रात प्रचंड जातीवाद आहे आणि जातीच्या भींती तोडण्यासाठी प्रचंड काम करावे लागणार आहे, असे विधान केले आहे. आमदार पडळकर म्हणाले, "महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, हे थोतांड आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे, हे फक्त भाषणापुरते मर्यादीत आहे. परंतु हे राज्य प्रचंड जातीवादी आहे. हे बदलावे लागेल. यासाठी काम करावे लागणार आहे". गावागावात एकत्र यावे लागणार आहे. जातीवादाच्या भींती तोडावे लागणार आहे. एकत्र येऊन आपल्याला काम करावे लागणा आहे. त्यामुळे अपने तो अपने होते हैं, पराये पराये होते है, हे लक्षात घ्या आणि एकत्र येण्याच्या कामाला लागा, असे भाजप आमदार पडळकर यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे आज बीड आणि परभणी दौऱ्यावर; मयत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आज बीड आणि परभणी दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तसेच 28 तारखेला निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या ते आढावा देखील घेणार आहेत. यानंतर ते परभणी इथं मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. दरम्यान, परभणी इथं येत राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली होती. परंतु बीडमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली नसल्याने मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांच्यावर यावरून मनोज जरांगे यांनी टीका केली.

Santosh Deshmukh Murder Case : खासदार बजरंग सोनवणे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांची आज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यात गाजत आहे. याप्रकरणी 28 डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सोनवणे यांची पत्रकार परिषद होत असून, ते काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.

CM Ladki Bahin Yojana : 67 लाख 'लाडक्या बहि‍णीं'च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा; मंत्री आदिती तटकरे यांची 'मोठी' प्रतिक्रिया

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरवात झाली. एकूण 2 कोटी 34 लाख लाभार्थींपैकी 67 लाख बहि‍णींना दीड हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान आॅक्टोबरमध्ये वाटण्यात आले होते. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरची रक्कम जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com