
केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत, असे ट्विट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे
खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. पोलीस अधीक्षक यांना बीड जिल्हा विषयी माहिती सांगितली. सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करा. यासाठी काय करता येईल, ते प्रयत्न करा. यासाठी मदत करू, असे खासदार सोनवणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाची गती समाधानकारक नसल्याची खंत खासदार सोनवणे यांनी व्यक्त केली.
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सात जानेवारीला हिंदू मेंढपाळ बांधवांसाठी वाडा आंदोलनाची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. चराई छत्र चराईसाठी जागा नाही. त्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान होत आहे. आपत्तीमध्ये काही मेंढपाळ मृत्युमुखी पडले असून त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही. परप्रांतातील मेंढपाळ रोगराई घेऊन येतात. त्यामुळे प्रचंड रोगराई पसरून जनावरांचा मृत्यू होत आहेत. त्यामुळे मेंढपाळ बांधवांच्या मागण्यांसाठी सात जानेवारीला अमरावतीत मेंढपाळ वाडा आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. या आंदोलनात महादेव जानकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी वाल्मिक कराड याला देण्यात आलेल्या पोलिस संरक्षणावर प्रशासनाला घेरलं. वाल्मिक कराड याच्यावर 15 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला. मात्र त्याच्याबरोबर असलेला बॉडीगार्ड वापस कधी घेतला? आणि तो कशापद्धतीने घेतला? हा जो बॉडीगार्ड होता, तो पेड होता की, कमिटीने डिसाईड केलेला होता? याची माहिती पोलिस अधीक्षकांकडे मागितल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.
भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आमदार सुरेश धस यांचे कान टोचले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासात अडथळे येणार नाही, अशी भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. बावनकुळे यांनी एकप्रकारे आमदार धस यांना कानपिचक्याच दिल्या आहेत. तसेच सर्व राजकीय पक्षांना देखील यात सहकार्य करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेत स्वतः लक्ष ठेवून असून, कोणताही आरोपी सुटणार नाही, याची काळजी घेत आहेत. तसेच सरकारवर विश्वास ठेवावा, असेही मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे. मंत्री बावनकुळे यांच्या निवेदनावर आमदार धस यांनी प्रतिक्रिया दिली असून, माझ्याकडून कोणताही असा अडथळा येणार नाही, याची ग्वाही दिली. तसेच बावनकुळे हे आमचे नेते आहे, त्यांचा आदेश मी मानणारा कार्यकर्ता आहे, असेही आमदार धस यांनी म्हटले आहे.
भाजपचे (BJP) आमदार सुरेश धस यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होत असून, तत्पूर्वी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. आमदार धस यांची ही भेट चर्चेत आली आहे. आमदार धस यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, याची उत्सुकता आहे. आमदार धस यांच्यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील भेट घेतली होती. त्यामुळे या दोघांच्या भेटी चर्चेत आल्या आहेत.
आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या अटकेची मागणी केली आहे. रोहिंग्यांच्या वास्तव्याचा ठिकाणं, त्यांचा सर्व डाटा हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट केला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना रोहिग्यांना कसे आणि कोठे आहेत, याची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे रोज-रोज या मुद्यावर राजकीय नाटक करण्याची गरज पडणार नाही, असा टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.
भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर जात आहेत. त्यांनी नाशिकमधील मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्यांचे वास्तव्य आहे, असा आरोप करताना त्यांच्या वास्तव्याचे आपल्याकडे पुरावे आहेत, असा खळबळजनक दावा केला आहे. याबाबत नाशिक महापालिका आयुक्त, तहसीलदार, पोलिस यांना भेटणार असून त्यांची भेट घेऊन ते दाखवणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. बीडमध्ये महादेव घोटाळा झाला आहे, त्याची माहिती मिळाली असून त्यात देखील लक्ष घालणार असल्याचेही किरीट सोमया यांनी म्हटले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी बीडमधील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मंत्री आठवले म्हणाले, "संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. जे खंडणी मागण्यासाठी गेले होते, त्यांना एका दलित समाजातील वॉचमनने अडवलं, मात्र त्याला देखील मारहाण केली. माणुसकीला कलंक लावणारी, अशी ही हत्याची घटना घडली आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. आतापर्यंत जणांना पोलिस पकडले असून, अद्याप तीन आरोपी पसार आहेत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिस ॲक्टिव्ह आहेत. मात्र अद्याप आरोपींना अटक नाही. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे". या घटनेबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आपण कुणालाही पाठीशी घालू नये, जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करा, ही मागणी करणार आहे. तसेच बीड जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली जावी. महाराष्ट्र गृहविभागाला यात कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृहविभागाने याचा तपास केला पाहिजे, अशी देखील रामदास आठवले यांनी म्हटले.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ओबीसी (OBC) व्यक्तीला किंवा समाजाला टार्गेट करण्याचे काम करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या निषेधार्थ आहे. त्यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा, असा वाद निर्माण करू नये. आता तो वाद काहीप्रमाणात शांत झाला आहे. मंत्री मुंडे यात दोषी सापडल्यास त्यावर कारवाई करा. परंतु विनाकारण टार्गेट केल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला.
शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेश द्वाराजवळ हा अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ गाडीचा अपघात झाला असून, खासदार वायकर हे अपघातावेळी गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. वायकरांच्या गाडीला झालेल्या अपघातात कुठली जीवितहानी झाली का, किंवा कोणी जखमी आहे का, याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.आयशर टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची धडक झाली. यावेळी गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांच्या निषेधार्थ आज 30 डिसेंबरला एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात म्हाडातील कर्मचारी संघटना समर्थनात उतरणार आहे. लेखणी बंद आंदोलनाला म्हाडा कार्यालयातील सर्व कर्मचारी संघटनांचा पाठिंबा असणार आहे. गेल्या आठवड्यात म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि निवृत्त पोलिस (Police) अधिकारी यांच्यात वाद झाला होता. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल आणि महिला कर्मचाऱ्यांबद्दल निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने अपशब्द वापरले होते. म्हाडाकडून निवृत्त पोलिस अधिकाऱ्याविरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
महायुतीच्या (Mahayuti) राज्य सरकारमधील भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी केरळला मिनी पाकिस्तान म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अतिरेकीच मतदान करतात. त्यामुळे ते निवडणूक येतात. अतिरेकींना धरून ते खासदार झाले आहेत, असेही मंत्री राणे यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजप महायुती आणि मतदारांमध्ये समन्वयकाची भूमिका बजावली होती. त्याचपद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत RSSची भूमिका असेल, अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे 288 पैकी 234 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीने केवळ 50 जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपला 132, शिवसेनेला (शिंदे) 57, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) 20, काँग्रेसला 16 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 10 जागा जिंकल्या आहेत.
शिवसेनेचे (Shivsena) नेते ठाणे महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि माजी खासदार सतीश प्रधान यांचे पार्थिव थोड्याच वेळात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय या ठिकाणी आणण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर अनेक मान्यवर दर्शन घेणार आहेत. यानंतर 11 वाजता ठाण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मानवी हक्क आयोगाकडे 2022-2023 या वर्षात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तब्बल 23 हजार 850 प्रकरणे प्रलंबित आहेत. वाढत्या तक्रारींची संख्या कमी करण्यासाठी कार्यक्षम उपायांची आवश्यकता आहे, असे आयोगाच्या 22व्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मध्ये अस्तित्वात आला आहे. अहवालातील तपशीलानुसार 2022-23 या वर्षात, त्यापूर्वीचे प्रलंबित प्रकरणांची संख्या 22 हजार 297 होती. नव्याने 6 हजार 157 प्रकरणे आयोगाकडे दाखल झाली आहेत. ती मिळून एकूण संख्या 28 हजार 454 होते.
CM Ladki Bahin Yojana योजनेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी मोठे भाकीत वर्तवले आहे. महायुती सरकारने जाहीर केलेल्या काही सरकारी योजनांमुळे तिरोजीने तळ गाठला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी देखील पैसा नाही. सरकारचा गाढा चालवण्यासाठी आणखी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. सीएम लाडकी बहीण मतांवर डोळा ठेवून करण्यात आली. ती राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर बंद केली जाईल, असे भाकीत विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.