
नाशिकमध्ये शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसे यांनी धक्का दिला आहे. नाशिकमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना एसटी कामगार पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या कामांच्या स्टाईलवर प्रभावित होत हा प्रवेश केल्याची भावना पक्षप्रवेश करताना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
बोईसर तारापूर एमआयडीसीतील यु. के. ॲरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला आग लागली. या कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली. यामुळे आगीचा भडका उडाला. या आगीत दोन कंपन्या जळून खाक झाल्या. आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ होते. अग्निशमन दलाकडून पाणी शिंपडून आग आटोक्यात आणली जात आहे. आग लागताच सुदैवाने कंपनीतील कामगारांनी पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार अडकले नसल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून, स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बीडमधीव मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी आयोजित केलेल्या कालच्या मोर्चावरून आता राजकारण रंगू लागले आहे. या मोर्चात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी केलेल्या भाषणातील असभ्य विधानांवर आणि त्याबरोबर केलेल्या हातवाऱ्यांवर मंत्री मुंडेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याबाबत बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करत आहेत. जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही, गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका मंत्री मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
भाजप (BJP) आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "कला क्षेत्रातील महिलांना अपमानित करणे, त्यांची खिल्ली उडवणे चुकीचं आहे. यामुळे सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागावी. रश्मिका मंदाना किंवा प्राजक्ता माळी या अभिनेत्रींनी अल्पवधीत चांगलं काम करून, अभिनय क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलं आहे. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणाला भेटायचं, कोणाला नाही भेटायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र इथं जाणून-बुजून कलाकारांचा अपमान केला गेला आहे". सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप करताना आता कुठेही राजेशाही आणि पाटीलकी चालणार नाही. प्रशासन आणि पोलिस या धमक्यांची योग्य ती दखल घेतील, कारवाई होईल, असा इशारा सदावर्ते यांनी दिला.
सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांना संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात पसार असलेल्या तीन आरोपींच्या मृतदेह कर्नाटक बॉर्डर रोडवर सापडल्याची माहिती, एका व्यक्तीने व्हाईस मेसेजवर पाठवली होती. परंतु या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असून त्यांना ज्या व्यक्तीने, असा मेसेज केला होता, ती व्यक्ती दारूच्या नशेमध्ये होती, अशी माहिती समोर आली आहे. पसार तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेविषयी कोणतीही माहिती कोणाकडे असल्यास त्याने पोलिस अधिकाऱ्यास किंवा स्थानिक पोलिसांनी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाल्मिक कराड याची पत्नी मंजली कराड यांची बीडच्या केज पोलिस (Police) ठाण्यात 'सीआयडी'कडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. केज पोलिस ठाण्यातीव खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर याच पोलिस ठाण्यात संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण ऍट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल आहे. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केज पोलिस ठाण्यातच मंजली कराड यांची जवळपास एक तास चौकशी केली आहे.
परभणी (Parbhani) इथं पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा विषय सत्ताधारी आणि विरोधकांकडून राजकीय दृष्ट्या चगळला जातो आहे. हे प्रकरण वेगळ्याच तऱ्हेने हाताळलं जात आहे, असा आरोप अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी केला. अडसूळ बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना, त्यांनी माध्यमांनी ही प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे नेते सथीश प्रधान यांचे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांची मोलाची भूमिका राहिली. ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठीही ते सातत्याने झटले.
अहिल्यानगर-पुणे (PUNE) या 125 किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खासदार लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू झाल्यास निःसंशयपणे दोन्ही शहरांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या विविध श्रेणीतील प्रवशांना फायदा होईल. याशिवाय माल वाहतूक, बोगी वाहतुकीच्या उद्देशाने रेल्वेला जोडल्यास त्यातून रेल्वेस उत्पन्न मिळले, असे खासदार लंके यांनी म्हटले.
राज्याच्या परिवहन कार्यालयावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्याऐवजी महापालिका स्तरावर स्वतंत्र प्रादेशिक परिवहन केंद्र उभारले जाणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती दिली. राज्यात जवळपास ५७ प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आठ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या कार्यालयामध्ये कामाचा प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्यातील महापालिका स्तरावर स्वतंत्र कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील काही दिवसांत सरकारी आदेश होऊन कार्यवाही सुरू होणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
धाराशिवचे (Dharashiv) मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन सुरू केले आहे. नामदेव निकम यांच्यावर गुरूवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. अंगावर ज्वलनशील पदार्भ टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निकम यांनी केला. पवनचक्की प्रकरणातून निकम यांच्यावर हल्ला झाला होता. घटना घडून तीन दिवस उलटले तरी, आरोपींचा छडा लागत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन करत असल्याचे सरपंच निकम यांचा दावा आहे. सरपंच निकम यांनी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. घटनास्थळी गावकरी मोठ्या संख्येने दाखल, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत खाली न उतरण्याचा निकम आणि सहकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.
बीडमध्ये (BEED) आम्ही सत्यशोधक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दिली. धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराड याला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही. रोज सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही थांबणार आहोत. मुंडे आणि कराड यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींवर आम्ही काम करणार आहोत, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी अंजली दमानिया यांनी केली.
परभणी प्रकरणातील पोलिस (Police) कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भरपाई म्हणून एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याबरोबरच, एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांची भेट घे निवेदन दिले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. आज दुपारी दोन वाजता सुकळी (ता. साकोली, जि. भंडारा) इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
आमदार उत्तम जानकर यांनी बारामती इथं येत शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना, विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड झाल्याचा दावा केला. अजित पवार (Ajit Pawar) 20 हजार मतांनी पराभव झाला आहे, असा दावा करत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासमवेत लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहे, असे आमदार जानकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे 13, तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे, असे 107 मतदार निवडून आले आहेत.जयकुमार गोरे यांनी 30 हजार मते चोरली आहे. यानुसार 13 हजार मतांनी गोरे पडले आहेत. दिल्लीत आम्ही सगळे मिळून आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे देखील लवकरच मारकडवाडीला जाणार आहेत. हे सरकार चार महिन्यात जमीनदोस्त होईल, असा घणाघात आमदार उत्तम जानकर यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीवरून रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गु्न्हा दाखल झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे या प्रवक्त्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने आलेले फाॅरवर्ड चॅट ट्विट केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. कर नाही और डर कशाला? फाॅरवर्ड चॅट हा गुन्हा होऊ शकतो, हे माझ्याविरुद्ध आरोप करणाऱ्यांना माहीत नाही, हे दुर्दैव आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. फाॅरवर्ड करण्यात आलेले चॅट हा खोटा, माॅर्फ केलेला आहे, याची संपूर्ण माहिती जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना दिली. आता पोलिसांना फक्त कारवाई करायची आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
बीडमधील (BEED) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना भाजप आमदार सुरेश धस यांनी कालच्या मोर्चानंतर गंभीर आरोप केले. आमदार धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करताना काही अभिनेत्रींचीही नाव घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे देखील नावाचा उल्लेख केला. आमदार धस यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतल्याचे पडसाद मराठी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये उमटलेत. यावर प्राजक्त माळी आक्रमक झाल्या असून, जाहीर माफी अशी मागणी करताना महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे माळी यांनी म्हटले आहे. दरम्यान, आमदार धस यांना भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहे. ते म्हणाले, "आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.