Killari Earthquake 31 Years: 'त्या' काळरात्रीची आठवण आजही लोकांच्या जिवाचा थरकाप उडवते...!

Marathwada News Killari Earthquake Sharad Pawar: लातूर, धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी दरवर्षी 30 सप्टेंबरची सकाळ अनामिक भीती, वेदना घेऊन येते. गेल्या 30 वर्षांपासून हा सिलसिला सुरू आहे.
Killari Earthquake
Killari Earthquake Sarkarnama
Published on
Updated on

गणरायाचे विसर्जन करून लोक नुकतेच झोपलेले होते. काहीजणांना अद्याप डोळा लागायचा होता. त्याच पहाटे मोठी आपत्ती येणार होती, याची कल्पना कोणाला आली असती तर...? असे होणे केवळ अशक्य होते, मात्र आजही अनेकांना तसे वाटून जाते. तो दिवस होता 30 सप्टेंबर 1993, वेळ होती पहाटे 3.56 ची. 6.3 रिश्टर स्केलच्या भूकपांच्या धक्क्याने सास्तूर (ता. लोहारा, जि. धाराशिव) आणि किल्लारी (Killari Earthquake) (ता. औसा, जि. धाराशिव) या गावांसह परिसरातील अनेक गावे भुईसपाट झाली होती.

नुसत्या इमारतीच नव्हे तर अनेकांचे जीवनही भुईसपाट झाले होते. 10 हजारांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला, 30 हजारांपेक्षा अधिक जखमी झाले. त्या प्रलयंकारी भूकंपाला आज, म्हणजे 30 सप्टेंबर रोजी 31 वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यावेळी संवादाच्या यंत्रणा आजच्या इतक्या सुधारलेल्या नव्हत्या. तरीही ही माहिती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. आपत्ती इतकी मोठी होती की करावे काय हे कोणालाही कळत नव्हते. आप्त, नातेवाईकांच्या ओढीने लोक विविध गावांत पोहोचले, पण समोरचे दृश्य पाहून सर्वांचे अवसान गळाले. ढिगाऱ्यांखाली दबून मृत्युमुखी पडलेल्या लोकांकडे पाहण्यासाठी कोणालाही सवड नव्हती. जखमींवर उपचार करणे, गंभीर जखमींना तातडीने मदत मिळवून देणे, यालाच सर्वांनीच प्राधान्य दिले होते. सर्व लोकांधील माणुसकी जागी झाली होती. जात, धर्म, गरीब, श्रीमंत आदी भेद झटक्यात गळून पडले होते. जखमींना मदत कशी होईल, याकडेच सर्वांचे लक्ष होते.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसह उमरगा, लातूर आदी ठिकाणचे खासगी डॉक्टरही मदतीला धावून आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे सकाळी लवकरच भूकंपग्रस्त भागात दाखल झाले होते. अनेक गावांची पाहणी करून मदतकार्याची सूत्रे त्यांनी हाती घेतली. त्यावेळी मंत्री असलेले डॉ. पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुख यांच्यावर अनुक्रमे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांची जबाबदारी त्यांनी सोपवली. परिस्थिती इतकी विदारक होती, तरीही जखमींच्या खाण्यापिण्याची सोय करणे क्रमप्राप्त होते. शेजारच्या कर्नाटकमधील शहरांतून डॉ. पद्सिंह पाटील यांनी अनेक ट्रक भरून केळी मागवल्या. पाण्याचे टँकरही मागवण्यात आले. मृतदेह झाकण्यासाठी कापड उपलब्ध होत नव्हते, कारण भूकंप झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यांना दुकाने उघडायला लावून कापड उपलब्ध करण्यात आले होते, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार सांगतात.

सगळीकडे काळजाचा थरकाप उडणारी दृश्ये दिसत होती. मृतदेहांचे ढिग आणि मदतीसाठी याचना करणाऱ्यांना पाहून मदतकार्य करणाऱ्यांचे काळीच तीळ तीळ तुटत होते. मदतकार्य करणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर अनेकांचा जीव जात होता, पण ते हतबल होते. दगड-मातीच्या ढिगाऱ्यांखाली दबलेले अनेकजण, आम्हाला वाचवा, अशी आर्त हाक मारत होते. इतकी मोठी आपत्ती आणि सुरुवातीला साधनांच्या कमतरतेमुळे मदतकार्य करणाऱ्यांवरही मर्यादा पडत होत्या. रुग्णालयांमध्ये जखमींच्या रांगा होत्या. रुग्णालयांची आवारे मृतदेहांनी व्यापली होती. वेळ जाईल तसे शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांचे लोक मदतीसाठी आले आणि त्या कामाला नंतर शिस्त लागत गेली.

दिवस पुढे जातील तशी संकटे कमी होतील, अशी अपेक्षा होती, मात्र त्याकाळात एकामागून एक संकटे येत होती. अंत्यसंस्कारांसाठी लाकडांची कमतरता भासू लागली. नागपूर, चंद्रपूर येथून लाकडे मागवण्यात आली. वाहतुकीच्या नियोजनासाठी मुंबईतून पोलिसांची कुमक मागवण्यात आली होती. तोपर्यंत लष्कराचे जवानही आले होते. मुख्यमंत्री शरद पवार यांनी आपले कार्यालय सोलापुरातच थाटले होते.

Killari Earthquake
Ranjitsinh Mohite Patil: पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदार काँग्रेसच्या वाटेवर; दिल्लीत घेतली पक्षश्रेष्ठींची भेट

एक पिढी पोरकी झाली...

शरद पवार यांनी लोकांचे भौतिकच नव्हे तर मानसिक पुनवर्सन करण्याचेही काम केले होते. गावागावांत जाऊन त्यांनी लोकांशी संपर्क साधला. अगदी जमिनीवर बसून त्यांनी लोकांना, मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही दिली होती. मी राज्यातील अन्य कामे बाजूला ठेवीन पण तुमचे पुनर्वसन आधी करणार, अशा शब्दांत त्यांनी लोकांना धीर दिला होता. भूकपांच्या 24 व्या दिवशी पाच गावांतील घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. घरांचे पुनर्वसन झाले, हळहळू लोकांचे मानसिक पुनर्वसनही झाले. भूकंपामुळे एक पिढी आई-वडिल आणि अन्य नातेवाईकांपासून पोरकी झाली. त्यांना आधार देण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ आला. बालवयातच पोरकी झालेली पिढी आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. असे असले तरी 30 सप्टेंबरचा दिवस काळ्याकुट्ट आठवणी घेऊन येतो, नागरिकांच्या जिवाचा थरकाप उडवून जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com