Suhas Babar News: निवडणुका, राजकीय पदे येतात आणि जातात. आपल्या सोबत राहते ती आपली प्रकृती. ती उत्तम राहिली पाहिजे आणि त्यासाठी आपणच आपल्या जीवनशैलीत बदल केले पाहिजेत, असा विचार खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी कृतीत उतरवला आहे. ४४ वर्षांच्या सुहास यांनी गेल्या काही काळापासून साखर पूर्ण वर्ज्य केली आहे. अत्यंत प्रिय असलेल्या आईस्क्रीमचा त्याग केला आहे. रोज दहा हजार पावले चालणे; एक तास जीम; वेळ, संधी मिळाली की क्रिकेट, बॅडमिंटन खेळणे आणि आहारावर नियंत्रण यामुळे फिटनेस उत्तम राखण्यात त्यांना यश आले आहे.
शाळा, महाविद्यालयातील माझा बहुतांश वेळ हा मैदानातच गेला. मी प्रचंड क्रिकेट खेळलो. अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यावेळी प्रोफेशनल क्रिकेटबाबत योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाले असते तर कदाचित मी रणजी संघापर्यंत मजल मारली असती, असे आमदार सुहास बाबर सांगतात. गेल्यावर्षी आमदार होण्याआधी त्यांनी वेटनर्स क्रिकेट संघटनेच्या (४० वर्षांवरील खेळाडू) स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली होता. जिल्हा परिषद सभापती असतानाही ते वेळात वेळ काढून क्रिकेट सामन्यांत सहभागी व्हायचे.
उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करायचे. आता आमदार झाल्यानंतरही क्रिकेटवेड काही कमी झालेले नाही. जिथे कुठे क्रिकेटचा सराव सुरु असेल, सामना सुरु असेल तेथे बॅट पाहिली की हात शिवशिवतात, असे ते सांगतात.
आमदार सुहास बाबर यांचे वडील दिवंगत माजी आमदार अनिल बाबर हेही स्वतःच्या तब्येतीची उत्तम काळजी घेत. हलक्या व्यायामावर त्यांचा भर असायचा. मतदार संघात असताना कितीही प्रवास करावा लागो, दुपारचे जेवण हे घरूनच यायचे. रात्री उशीर झाला तरी घरी येऊनच जेवायचे, हा त्यांचा शिरस्ता होता. तशा पद्धतीनेच आहार नियोजन करण्याचा सुहास यांचा प्रयत्न असतो, मात्र युवा पिढीतील मित्र आणि कार्यकर्ते सोबत भोजनाचा आग्रह करतात तेंव्हा तो मोडता येत नाही. तेंव्हा मोजके खातो, जास्त खाणे झाले तर पुढच्या दिवशी थोडा व्यायाम अधिक करतो, असे ते सांगतात.
रोज दोन आईस्क्रीम न चुकता खाण्याची सुहास यांना सवयच लागली होती. रात्री जेवण झाले की ते आवडीने आईस्क्रीम खायचे. अगदी परवा निवडणुकीतदेखील हे रुटीन चुकले नाही. आता मात्र त्यांनी आईस्क्रीमसह गोड पदार्थ पूर्ण वर्ज्य केले आहेत. ‘एवढेच कशाला, मी चपाती खाऊन दोन महिने झाले. फक्त भाकरी खातोय. राजकीय जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, या स्थितीत स्वतःच्या जीवनशैलीत बदल गरजेचा होता, तो मी केलाय’, असंही त्यांनी सांगितलं.
राजकीय जबाबदाऱ्या आल्यानंतर सुहास यांचा मैदानावरील नियमित वावर कमी झाला. त्यानंतर त्यांनी जीममध्ये व्यायामकडे लक्ष केंद्रीत केले. विटा येथे विटा फिटनेस क्लबच्या जीममध्ये रोज सकाळी एक तास ते घाम गाळतात. जीममध्ये कोणता व्यायाम किती वेळ करायचा, याची व्यवस्थित काळजी घेतात. कशाचाही अतिरेक होता कामा नये, याची स्वतः काळजी घेतात. आमदार झाल्यानंतर आठवड्यातून दोन दिवस मुंबईला जावे लागते, तेंव्हा जीम चुकते, पाच दिवस मात्र न चुकता व्यायाम करतो, असे त्यांनी सांगितले. दुपारी झोपाची सवय नाही, रात्रीही झोपायला उशीर होतो, मात्र किमान सहा तास झोप घेतो, असं ते सांगतात. फास्ट फूड आणि बाटलीबंद शीतपेये टाळा, साखर टाळा, असा सल्ला ते देतात.
- नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर पहिल्यांदाच खानापूर (जि.सांगली) मतदारसंघातून शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकिटावर आमदार झाले. त्यांचे वडील दिवंगत अनिल बाबर हेही आमदार होते.
- बाबर यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वैभव पाटील यांचा ७८,१८१ मतांच्या मताधिक्क्याने पराभव केला होता.
- २०१७ ला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात पदार्पण केले. नंतर ते जिल्हा परिषदेचे सभापतीही झाले.
- एमबीए, बीएसस्सी, एलएलबी पदव्या घेऊन ते उच्चविद्याविभूषित झाले आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.