NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या 'राष्ट्रीय दर्जा'चा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून फेरविचार सुरु असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मंगळवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) जुलै २०१९ मध्येच देशातील इतर राष्ट्रीय पक्षांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्दा पत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना असल्यामुळे त्या पत्रावर कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्यावतीने मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनाही 2019 मध्ये नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीचा लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये, असा सवाल त्यामध्ये उपस्थित करण्यात आला होता.
यावर बोलताना महेश तपासे यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची आणि निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली. पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अबाधित राहणार असल्याचा विश्वास त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पाच खासदार आहेत. त्याच प्रमाणे अनेक राज्यात राष्ट्रवादीने निवडणुका लढवल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष आहे. तसेच नागालँड, केरळ आणि झारखंड या राज्यात आमदार आहेत. निवडणूक आयोगाने घातलेल्या अटी शर्थी पूर्ण करत असल्यामुळे आम्हांला अडचण नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. मात्र, निवडणूक आयोग काय निर्णय घेतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्याचे निकष काय असतात?
लोकसभा निवडणुकीत किमान ३ राज्यांमध्ये २ टक्के जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. लोकसभेत किमान चार जागा आणि किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजे. पक्षाला ४ किंवा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. किमान चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे गरजेचे असे. यातील एक निकष पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला की पक्षाला देशभरात एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येते. तसेच, राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते. त्यामुळे, प्रत्येक पक्ष हा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.