Bihar Politics : किलकिल्या दाराआड रंगतेय राजकारण

Nitishkumar News : नितीशकुमार यांचे हेच वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे. त्यांची भाजपला जितकी गरज असते तितकीच लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलालाही असते. हेच नितीशकुमारांच्या राजकारणाचे सूत्र आहे.
Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav, Nitish Kumar
Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Nitishkumar, BJP and Lalu Prasad Yadav : बिहारची निवडणूक या वर्षी होत आहे. नोव्हेंबरमध्ये होणार असलेल्या या निवडणुकीचे पडघम आतापासून राजकीय वर्तुळात ऐकू येऊ लागले आहेत. उलटसुलट वक्तव्ये आणि त्याचे पडसाद उमटत आहेत. लालूप्रसाद यांनी नितीशकुमार यांना आपल्यासोबत येण्यासाठी खुले आवाहन केले आहे. आपले दरवाजे खुले असल्याची ग्वाही त्यांनी नितीशकुमारांना दिली. त्यांचे पुत्र मात्र नितीशकुमारांना राष्ट्रीय जनता दलाचे दरवाजे बंद असल्याचे ठामपणे सांगत आहेत.

भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी भाजपचे(BJP) बिहारमध्ये स्वबळावर सरकार स्थापन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर नितीशकुमार आणि त्यांचे संयुक्त जनता दल नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपची साथ आपण सोडणार नसल्याची ग्वाही नितीश यांनी दिली असली तरी त्यांची राजकीय विश्वासार्हता लयाला गेल्याने त्यांच्याभोवती संशयाचे धुके दाट झाले आहे. त्यामुळे या राज्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले असून, जनतेचेही मनोरंजन होत आहे.

हिंदीतील प्रख्यात लेखक आणि प्रहसनकार हरिशंकर परसाई यांनी एके ठिकाणी लिहिलंय, की एखादी लज्जास्पद बाब जर कौतुकास्पद म्हणून मिरवणे सुरू झाले, तर तिथे लोकशाही चांगली चालली आहे, असे समजावे. बिहारमध्येच नव्हे तर अन्य राज्यांतही लोकशाही अशाच उत्‍तमप्रकारे राबवली जात आहे. याच विरोधाभासामुळे बिहार पुन्हा चर्चेत आला आहे. येथे अशा पद्धतीने रुजलेल्या लोकशाहीचे बिहारवासीय साक्षीदार आहेत.

आता मुख्य प्रश्न आहे की नितीशकुमार(Nitish Kumar) पुन्हा राजकीय कोलांटउडी मारणार का? हा प्रश्न आता चव्हाट्यावर जनसामान्यांकडून विचारला जात आहे. पाटलीपुत्रपासून (पाटणा) ते हस्तिनापूरपर्यंत या एकेकाळच्या मगध राज्यातील आधुनिक चाणक्य या लोकशाही यंत्रणेतील विदूषक बनून मजेत कारभार करत आहे. परंतु नितीशकुमार यांचे हेच वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे. त्यांची भाजपला जितकी गरज असते तितकीच लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलालाही असते. हेच नितीशकुमारांच्या राजकारणाचे सूत्र आहे.

Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav, Nitish Kumar
Bangladesh Yunus government News : युनूस सरकारने मान्य केली मोठी चूक! सात हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूबाबत म्हटले की...

मध्यवर्ती आकर्षण नितीशकुमारच -

नितीशकुमार २००० मध्ये सर्वप्रथम आठवडाभरासाठी मुख्यमंत्री बनले होते. मात्र, विधानसभेत बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना आपले राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी भाजपने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. परंतु नोव्हेंबर २००५ मध्ये त्यांना बिहारचा राज्यकारभाराची सूत्रे पुन्हा हाती घेण्याची संधी मिळाली अन् त्यानंतर ते बिहारचे मुख्यमंत्रिपद सलगपणे भूषवत आहात. आतापर्यंत त्यांनी नऊ वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या काळात त्यांनी भाजपसह सहा वेळा आणि राजदसमवेत दोनदा एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. २०१५ आणि २०२२ मध्ये नितीश यांनी भाजपसोबतचे संबंध अचानक तोडून लालूप्रसाद यादव(Lalu Yadav) यांच्या राजदच्या पाठिंब्यावर आपले सरकार स्थापन केले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना(Narendra Modi) जेव्हा भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले तेव्हा नितीशकुमार नाराज झाले होते. भाजपकडून मोदींचे नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवडण्यात येईल हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यांना राजकीय क्षितिजावर मोठी भरारी घ्यायची होती. पण मोदींच्या निवडीमुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षांना लगाम बसला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही मात्र, त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांना चांगले यश मिळाले. या घटनाक्रमानंतर दहा वर्षानंतर आता पाटण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चेला एकच तोंड फुटले आहे, की नितीशकुमार आता पुन्हा राजकीय कोलांटउडी मारणार का?

Lalu Prasad Yadav, Tejashwi Yadav, Nitish Kumar
Chief Election Commissioner Election : ... म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची परंपरा खंडीत होणार?

नितीशच प्रश्न आणि नितीशच उत्तर -

नितीशकुमारांच्या संभाव्य भूमिकेविषयी थेट, सरळसोट, सहजसोपे उत्तर कुणाकडेही नाही. खुद्द नितीशकुमार यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले होतो, की या बाबी सोडून द्या आता. त्याच वेळी त्यांनी लालूप्रसाद पुत्र तेजस्वी यादव नितीशकुमार यांच्या पाया पडले तेव्हा नितीश यांनी त्च्या खांद्यावर हात ठेवला होता. नितीशकुमार यांच्या या कृतीमुळे भाजपचा तणावग्रस्त झाला नसता तर नवल ठरले असते. ते स्वाभाविकही होते.

भाजपवर दबाव आणण्यासाठी नितीशकुमारांनी हे दबावतंत्र अवलंबले आहे का? संयुक्त जनता दलाच्या राजकारणाचे अभ्यासक पत्रकार अमरनाथ तिवारी म्हणतात, की नितीशकुमार यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. परंतु ते भाजपची साथ सोडतील असे वाटत नाही. त्यांनी लालूप्रसाद यांच्या पक्षासह सरकार चालवून पाहिलं आहे. सरकारमध्ये असताना ते ज्या पद्धतीने भाजपवर हुकूमत गाजवू शकतात, तसे लालूंच्या बाबतीत त्याना करता येत नाही. सध्या ते भाजपवर मानसिक दबाव आणत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या पक्षाला ४४ जागाच मिळू शकल्या. मात्र, यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपसह किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) ते मोठ्या भावाच्या भूमिका मिळावी, अशी नितीश यांची इच्छा आहे.

लालूंकडून दरवाजे खुले, तेजस्वी प्रतिकूल -

राजकारणातील निष्णात खेळाडू असलेले लालूप्रसाद नितीश आणि भाजपमधील अंतर कसे वाढेल, यावर लालूंचे लक्ष आहे. जेणेकरून सत्तेवर येण्याची संधी ते शोधत आहेत. नितीशकुमार यांच्यासाठी माझे दरवाजे खुले आहेत. फक्त नितीशकुमार यांनीही आपले दरवाजे खुले ठेवले पाहिजेत, असे वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केले. त्यावरून नितीशकुमार यांच्या राजकीय कोलांटउडीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. परंतु लालूंचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते नितीशकुमार यांच्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) दरवाजे बंद असल्याचे जाहीर केले. या दोघांच्या विरोधाभासी वक्तव्यावरून या पिता-पुत्रांनी राजकीय डावपेचाचा खेळ मांडला आहे, असा राजकीय तज्ज्ञांनी कयास मांडला.

भाजपचे मौन, जेडीयूची प्रतिक्रिया -

यात भर पडली ती भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या वक्तव्याची. त्यामुळे नितीशकुमार भाजपसोबत राहतील की त्यांची साथ सोडतील, याबाबत संशयाचे धुके अधिक दाट झाले. अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात सिन्हा म्हणाले, की बिहारमध्ये भाजपचे सरकार स्थापन व्हायला हवे. तीच खरी वाजपेयींनी वाहिलेली आदरांजली असेल. या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाचे सर्वोच्च नेतृत्व खूपच दुखावल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, नितीशकुमार यांच्या पक्षाचे खासदार राजीव रंजन ऊर्फ ​लालन सिंह यांनी सांगितले, की नितीशजी कुठेही जाणार नाहीत. आम्ही भाजपसोबतच आहोत अन् भावी काळातही भाजपसोबत राहणार आहोत. पण समस्या ही आहे, की नितीशकुमार यांनी वारंवार स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत.

कारण आपली राजकीय विश्वासार्हता नितीशकुमार यांनी आपल्या आचरणातून गमावलेली आहे. त्यांनी नुकतेच म्हटले, की भाजपसोबतच राहणार आहेत. ते दोनदा राजदसोबत गेले परंतु आता पुन्हा जाण्याची चूक पुन्हा करणार नाहीत. पण नितीशकुमार यांच्या वक्तव्यावर भाजपचाही विश्वास बसत नाही आणि राजदने नितीशकुमार यांना आपल्यासोबत घेण्याबाबतच्या आपल्या आशा सोडलेल्या नाहीत. भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले, की लालूप्रसाद पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण हे कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होणार नाहीत. लोकसभा आणि विधानसभेच्या चार जागांवर झालेल्या पराभवानंतर धीर सुटल्यामुळे लालूप्रसाद अशी वक्तव्ये करत आहेत. सत्ता मिळण्याची शक्यता धूसर होत चालल्याने लालूप्रसाद असे वागत आहेत.

बिहारमधील त्रिकोणाचे राजकारण -

बिहारच्या राजकारणाचा त्रिकोण आहे. त्याचे नितीशकुमार, लालूप्रसाद आणि भाजप हे तीन कोन आहेत. तिघेही परस्परांवर बारीक लक्ष ठेवून असतात. नितीश यांना कमकुवत करण्यासाठी भाजप काय राजकारण करते, याकडे संयुक्त जनता दलाचे बारकाईने लक्ष असते. तर लालू नितीश यांना भाजपपासून कसे दूर करायचे यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे. नितीश यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची घोषणा भाजपने आधीच केली आहे. पण एकट्याच्या बळावर किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी बिहारची धुरा सांभाळावी, अशी भाजपची महत्त्वाकांक्षा आहे.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापले जाईल, हे बहुतांशी प्रत्येक पक्षाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर अवलंबून असेल. तसेच भाजपची स्वबळाची कितीही महत्त्वाकांक्षा असली, तरी केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारला नितीशकुमारांचा बहुमोल पाठिंबा आहे. केंद्रातील हे गणितही भाजपला विचारात घ्यावे लागेल. बिहारच्या २४३ जागांसाठीच्या मतदारसंघांतील मतदार सध्या पडलेल्या थंडीत राजकीय प्रहसनाने करमणुकीचा आनंद लुटत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com