
19 ऑक्टोबर 1970....शिवसेनेच्या दृष्टीने हा ऐतिहासिक दिवस ठरला होता. कारण या दिवशी शिवसेनेचा पहिला नेता आमदार म्हणून विधानसभेवर निवडला गेला. या नेत्याचं नांव होतं वामनराव महाडिक.
1970 मध्ये मुंबईच्या परळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते कॉम्रेड कृष्णा देसाई. परळ ही कापड गिरण्यांची भूमी. या ठिकाणी कापड गिरण्यांतल्या कामगार संघटनांमुळे कम्युनिस्टांचा वरचष्मा होता. त्यावेळी मुंबईत शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यात संघर्ष सुरु होता.
त्यातच 5 जून 1970 रोजी कृष्णा देसाई यांचा खून झाला आणि परळ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. कम्युनिस्टांनी या ठिकाणी कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेने त्यांच्या विरोधात वामनराव महाडिकांना उभे केले. वामनराव महाडिक त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक आणि मुंबई महापालिकेच्या सुधारणा समितीचे चेअरमन होते.
त्यापूर्वी सेनेने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इथल्या महापालिका आणि पालिकांच्या निवडणुका लढवल्या होत्या. आता पहिल्यांदाच शिवसेना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती.
कम्युनिस्टांनी या निवडणुकीत प्रचाराची राळ उठवली होती. केरळमध्ये एकमेकांविरोधात उभे ठाकणारे उजवे कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी इथे एकत्र येऊ प्रचार करत होते. श्रीमती सरोजिनी यांना काँग्रेस प्रजासमाजवादी पक्ष, संयुक्त समाजवदी, शेतकरी कामगार पक्ष यांनीही पाठिंबा दिला होता.
या ठिकाणी आपणच निवडून येणार याची कम्युनिस्टांना खात्री होती. पण त्यांना पराभव चाखावा लागला. त्यावेळी परळ मतदारसंघ महापालिकेचे पाच वॉर्ड मिळून बनलेला होता. पोटनिवडणुकीपूर्वी अडीच वर्षांआधी झालेल्या महापालिका निवडणुकीत या पाचही जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यात शिवसेनेला जनसंघ आणि पारशी समाजाचीही मते मिळाली होती.
या निवडणुकीत महाडिकांनी 1679 एवढ्याच मतांनी कम्युनिस्ट उमेदवाराचा पराभव केला. पण तरीही हा शिवसेनेचा पहिला विजय होता. 'देशाच्या शत्रूविरोधात राष्ट्रवादी शक्तींनी मिळवलेला विजय,' अशी प्रतिक्रिया स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी दिली होती.
1781: अमेरिकेतील वसाहतीतील ब्रिटिश सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांची अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचे सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापुढे शरणागती. त्यांनीच पुढे भारतात गव्हर्नर म्हणून काम केले.
1871: क्ष किरणांचा वैद्यकीय चिकित्सेसाठी सर्वप्रथम उपयोग करणारे डॉ. वॉल्टर कॅनन यांचा जन्म.
1910 : जन्माने भारतीय असलेले नोबेल पारितोषिकविजेते खगोलशास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रह्मण्यम यांचा जन्म.
1920 : "स्वाध्याय परिवार'चे संस्थापक व कृतिशील विचारवंत पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवार "मनुष्य गौरव दिन' म्हणून साजरा करतो. न्याय, वेदांत, व्याकरण आदी शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या 20 सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी "स्वाध्याय परिवार' सुरू केला.
1937 : इंग्लंडमधील अणुसंशोधनाचे जनक अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन.
1970 : भारतीय बनावटीचे पहिले मिग विमान हवाई दलाच्या ताफ्यात दाखल.
1993 : पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण प्रकल्पाचे जनक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. गोविंदस्वरूप यांना रेडिओ खगोलशास्त्र आणि अंतराळातील रेडिओ स्रोतांबाबत केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
2005 : इराकचे तेव्हाचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या विरोधात मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठीचा खटला सुरु झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.